A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
स्वर आले दुरुनी

स्वर आले दुरुनी
जुळल्या सगळ्या त्या आठवणी

निर्जीव उसासे वार्‍यांचे, आकाश फिकटल्या तार्‍यांचे
कुजबुजही नव्हती वेलींची, हितगुजही नव्हते पर्णांचे
ऐशा थकलेल्या उद्यानी

विरहार्त मनाचे स्मित सरले, गालावर आसू ओघळले
होता हृदयाची दो शकले जखमेतून क्रंदन पाझरले
घाली फुंकर हलकेच कुणी

पडसाद कसा आला नकळे, अवसेत कधी का तम उजळे
संजीवन मिळता आशेचे निमिषात पुन्हा जग सावरले
किमया असली का केलि कुणी