A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
युवतीमना दारुण रण

युवतीमना दारुण रण रुचिर प्रेमसें झालें ।
रणभजना संसारीं असें अमर मीं केलें ॥

रमणिमनहंसा नर साहससरसीं रमवी;
शूर तोचि, विजय तोचि; हें शुभ यश मज आलें ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वराविष्कार- रामदास कामत
आशा भोसले
मास्टर दीनानाथ
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - मानापमान
राग - हंसध्वनी
ताल-दादरा
चाल-'मनसुकरक' या कानडी चालीवर.
गीत प्रकार - नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत
रुचिर - मोहक, सुंदर.
रमणी - सुंदर स्‍त्री / पत्‍नी.
गरिबांना कस्पटाप्रमाणें लेखणारा अविचारी श्रीमंतांना दुरभिमान व अपमान झाल्यामुळें चिडलेल्या गुणी गरिबांचा क्रोध, या मानापमानापा कात्रींत सांपडल्यामुळें दोन वेळां मोडलेलें धैर्यधर व भामिनी यांचें लग्‍न, खर्‍या प्रेमाचा पगडा मनावर बसून निरभिमानी बनलेल्या भामिनीच्या चतुर लीनतेनें अखेरीस कसें घडून आलें, याचें वर्णन या नाटकांत केलें असून, अंगावर दागिन्यांची ओझींच्या ओझीं लादून घेणार्‍या लक्ष्मीधराचा आचरटपणा, आणि गरिबांविषयींचा तिरस्कार अंगी भिनल्यायामुळें गुणी गरिबांचा द्वेष करणार्‍या विलासधराचा अभिमान या दोन तटांमधून, सदर प्रेमाचे प्रवाहास- तो स्पष्ट, जोराचा व मर्यादित दिसावा म्हणून- वाहावयास लाविलें आहे.

बाजाची पेटी वाजविण्यांत अत्यंत कुशल म्हणून महाराष्ट्रांत महशूर असलेले रा. रा. गोविंद सदाशिव टेंबे यांनी या नाटकांतील पदांच्या चाली दिल्या असून पदांची वरमालाहि त्यांनीच तयार केलेली आहे. या कामीं किर्लोस्कर संगीत मंडळींतील गायनपटु रा. नारायण दत्तात्रेय जोगळेकर व रा. नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व आणि माझे गवई मित्र रा. रा. विठ्ठल महादेव ऊर्फ बापूराव फडके यांनी आस्थेनें व हौसेनें मदत केली आहे; या उपकाराबद्दल रा. टेंबे, रा. जोगळेकर, रा. बालगंधर्व व रा. फडके यांचे मानावे तितके आभार कमीच होत.

गद्य नाटकांत गुरफटून राहिलेल्या मनोवृत्ति 'मंडळीच्या' मृदु, गोड गुंगविणार्‍या गायनानें 'संगीताकडे' खेंचून नेल्याबद्दल आणि पुस्तकरूपानें नाटक प्रसिद्ध होण्यापूर्वी त्याचे परिश्रमानें व कळकळीनें बसविलेले प्रयोग करून दाखवून उपयुक्त सूचना केल्याबद्दल 'किर्लोस्कर संगीत नाटक मंडळी'चा मी फार आभारी आहे.
(संपादित)

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
दि. २० एप्रिल १९११
'संगीत मानापमान' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- य. कृ. खाडिलकर (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  रामदास कामत
  आशा भोसले
  मास्टर दीनानाथ