A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
युगामागुनी चालली रे

युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतिची याचना

दिमाखात तारे नटोनी थटोनी
शिरी टाकिती दिव्य उल्का-फुले
परंतू तुझ्या मूर्तिवाचूनी देवा,
मला वाटते विश्व अंधारले !

तुवा सांडलेले कुठे अंतराळात
वेचूनिया दिव्य तेज:कण
मला मोहवाया बघे हा सुधांशु
तपाचार स्वीकारूनी दारूण.

पिसारा प्रभेचा उभारून दारी
पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी याचना प्रीतिची लाजुनी लाल-
होऊनिया लाजरा मंगळ.

निराशेत संन्यस्त होऊन बैसे
ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव
पिसाटापरी केस पिंजारूनी हा
करी धूमकेतू कधी आर्जव !

परि भव्य ते तेज पाहून पूजून
घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे !