हालती कशा या लाटा
फुलतो शरीरी काटा
का हो दूर रहाता?
प्रेमगंगा ही वहाता
घ्या उडी घ्या, का पाहता? चला ना !
बहुमोल अशी ही वेळ, अरसिका का दवडिता?
गीत | - | प्र. के. अत्रे |
संगीत | - | दादा चांदेकर |
स्वर | - | मीनाक्षी शिरोडकर |
चित्रपट | - | ब्रह्मचारी |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
'ब्रह्मचारी'च्या निर्मितीच्यासंबंधी नटवर्य बाबूराव पेंढारकर ह्यांनी आपल्या 'चित्र आणि चरित्र'मध्ये म्हटले आहे की,
'ब्रह्मचारीच्या मुहूर्ताचा दिवस दि. १.६.१९३८ हा ठरला. मुहूर्तासाठी कोणीतरी कथानकातल्या एका प्रसंगातले एक वाक्य शोधून काढले. 'आज जे हसतील, ते उद्या रडतील' हे वाक्य ऐकताच माझ्या डोक्यात मेथॉलचे बोट घातल्यासारखे झाले. कोणत्याही नवीन चित्रपटाचा मुहूर्त म्हणजे आनंदाचा मंगल प्रसंग. त्या प्रसंगी असले वाक्य बोलून सुरवात करणार्याच्या अकलेची मला कीवच आली. मुहूर्तासाठी 'हे वाक्य रद्द करून दूसरे वाक्य काढा' असे मी बजावले आणि मग विनायकाने हनुमंताच्या फोटोसमोर उभे राहून हनुमान स्त्रोत्र म्हणत असल्याच्या प्रसंगाने मुहूर्त केला. 'ब्रह्मचारी'साठी नव्या नायिकेची जरूरी असल्यामुळे तिचा शोध सुरू झाला. मीनाक्षीबाईंचे रूप डोळ्यात भरण्यासारखे नसले तरी त्यांचा आवाज अतिशय मधुर व मनोवेधक होता, बुद्धीनेही त्या हुशार.
पहिल्या बैठकीत आम्ही त्यांच्याशी दरमहा अडीचशे रूपयांचा करार केला. 'ब्रह्मचारी' १९३८ च्या सप्टेंबरमध्ये प्रकाशित झाला. 'ब्रह्मचारी'तील सर्व गाणी अत्र्यांनी एका दिवसात लिहिली होती.
'यमुनाजळी खेळू खेळ' हे 'ब्रह्मचारी'तील गाणे फार गाजले. अगदी आजही 'अवघे पाऊणशे वयमान' च्या रेंजमधील तरूण भूतकाळात जाऊन या गाण्याच्या रम्य स्मृती जागवतात आणि त्या 'ओलेत्या' विषयावर चर्चा करतात. अनेकांचे आजही म्हणणे आहे की 'यमुनाजळी' सारखे गाणे पडद्यावर आल्यावरही, या गायिका-नायिकेला प्रेक्षकांनी सुसंस्कृत अभिनेत्रीचेच पद बहाल केले. काळाच्या खूप आधी चित्रपटात दाखवलेल्या त्या मॉडर्न दृश्यात मीनाक्षी थिल्लर किंवा 'स्वस्त' (हे 'चीप' चे मराठी भाषांतर) दिसली नाही. केवळ पोहण्याच्या वेषात त्या गाण्याचे चित्रीकरण तिने होऊ दिले म्हणूनच ती पुढे गाजली, असेही म्हणता येणार नाही. (काळाच्या खूप पुढे जाऊन) एक मराठी मुलगी असे दृश्य आपल्यावर चित्रित करू देते हा नैतिकतेचा पराभव आहे, असे काहींना वाटले. (मात्र या काहींपैकी काहींनी याच दृश्यासाठी हा चित्रपट तर पुन्हा पाहिला आहे.) अत्र्यांच्या भाषेत सांगायचे तर 'यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया' ह्या मीनाक्षीच्या एका गाण्याने 'ब्रह्मचारी'च्या लोकप्रियतेवर सुवर्ण कळस चढवला. ह्या गाण्याच्या हजारो ध्वनिमुद्रिका खपल्या. त्याकाळी घरोघर ह्या गाण्याचे पालुपद ऐकू येत असे. मीनाक्षीचे रूपेरी पडद्यावरील ते पहिलेच पदार्पण होते. तिचा आवाज अत्यंत मधुर असल्याने तिची गाणी ह्या चित्रपटाचे एक महत्वाचे वैशिष्टच ठरेल, अशी जी आरंभी आमची कल्पना होती, ती यशस्वी ठरली. विनायकाचे पार्श्वगायन एरिक जाधव ह्या कंपनीतल्या एका गायक कलाकाराने दिले होते. तथापि विष्णु जोग ह्यांच्या चढया आणि सुरेल गायनाने खूपच बहार उडवून दिली. म्हणून गाण्याच्या दृष्टीनेही हा चित्रपट असाधारण यश मिळवणार हे पहिल्याच दिवशी आमच्या ध्यानात येऊन चुकले. 'ब्रह्मचारी'चे संगीत दिग्दर्शन आपल्याला करायला मिळणार याचा संगीतकार दादा चांदेकर यांना आनंद झाला. याचे पहिले मुख्य कारण म्हणजे 'साष्टांग नमस्कार' पासून 'लग्नाची बेडी' पर्यंतच्या बालमोहन नाटक कंपनीने रंगभूमीवर आणलेल्या अत्र्यांच्या नाटकांची कमालीची लोकप्रियता.
'यमुनाजळी' हे गाणे अत्र्यांनी मा. विनायकांना दिले आणि त्याचं चित्रण कसे करावे याचा आराखडा मनाशी आखत ते दादांकडे आले. दादांनी निरागस चेहर्याने 'यमुनाजळी' गाणं वाचायला सुरूवात केली. त्यांच्या चेहर्याकडे पाहात विनायक नुसते हसत होते. 'मला हासू येत नाही. पण प्रेक्षकांना आपल्या स्वरात हसवायचा मी प्रयत्न करतो' असं म्हणून दादांनी बघता बघता त्या गाण्याला चाल लावली. 'हेच. हेच.' मा. विनायक आनंदाने ओरडले. आणि मग मा. विनायकांनी ते गीत चित्रीत केले.
पुरू बेर्डे आपल्या एका लेखात म्हणतात,
'यमुनाजळी' लोकप्रिय होण्याचे कारण त्याचे चित्रण सिनेमॅटिक होते, हे देखील एक आहे. पोहण्याच्या कपड्यातील नायिका प्रथमच पडद्यावर आलेली पाहताच प्रेक्षकांनी डोळे विस्फरले असतील. या गाण्यालाही त्रितालातील संथ लय वापरलेली आहे व यातून शृंगार व्यक्त केला आहे.
'यमुनाजळी'च्या संदर्भात आचार्य अत्रे यांनी आपल्या 'मी कसा झालो आणि 'कर्हेचे पाणी' या पुस्तकात म्हटले आहे. 'आजपर्यंत कोणत्याही चित्रपटातील गाण्याला एवढी लोकप्रियता लाभलेली नाही. घरोघर आंघोळ करताना नवविवाहित जोडपी या गाण्यांचे स्वर गुणगुणू लागली. चित्रपटातील या दृश्याची संगीत नक्कल करण्यासाठी नदीच्या डोहात उतरलेले एक नाशिकचे जोडपे तर बुडून गेले आणि एक मरता मरता वाचले. लोकांच्या मनावर झालेल्या विलक्षण परिणामाच्या अशा कितीतरी चमत्कारिक गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत.
येरवड्याच्या वेड्याच्या इस्पितळाच्या नियंत्रण समितीवर पुणे नगरपालिकेतर्फे (तेव्हाच्या) माझी नेमणूक झाली. एकदा तपासणीसाठी मी त्या इस्पितळातून फिरत असता दोन वेडे 'ब्रह्मचारी' चित्रपटातील गाणी तालस्वरात गात बसलेले पाहून मी थक्क झालो. 'ब्रह्मचारी' चित्रपट बघून त्यांचे डोके फिरल्याचे मला सांगण्यात आले. ते ऐकून मला हसावे की रडावे ते कळेना. आचार्य अत्र्यांनी या गाण्याच्या संदर्भात अशीही माहिती दिली आहे की किशोरी ज्या स्नानवेषात औदुंबराशी शृंगार करताना हे गाणे म्हणते, त्या वेषात अनेक प्रणयीजनांनी जलविहार करताना आपली छायाचित्रे काढून घेतली होती. पुण्याच्या 'प्रभात'मध्ये यमुनाजळीची शीळवादन स्पर्धा झाली त्यात साने नावाचे गृहस्थ पहिले आले होते.
'यमुनाजळी'च्या चित्रीकरणाच्या आधीची आणि नंतरची नेमकी परिस्थिती काय होती त्याबद्दलची मुलाखत देताना मीनाक्षीनी जी माहिती दिली ती संजीवनी खेर ह्यांच्या 'मायादर्पण'मध्ये वाचायला मिळते.
'यमुनाजळीने इतिहास घडविला' या मीनाक्षीवरील परिचय लेखात म्हटले आहे की 'ब्रह्मचारीतील यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया का लाजता?' असा बोल्ड प्रश्न विचारणारी स्वीमिंग कॉस्ट्यूममधील नायिका मीनाक्षी, त्यानी हा सीन मोठ्या मिनतवारींन केला होता. तो सीन करायची धास्ती बाईच्या मनानं घेतली होती. तो सीन टाळण्यासाठी त्यांनी दिग्दर्शकाशी वादही घातला. त्या सीनच्यामागं बरंच रामायण घडलं होतं. एक दिवस नेहमीसारख्या त्या स्टुडिओत गेल्या. हजेरीपटात सही केली व कपडेपटात जाऊन बाईंनी त्या दिवसाच्या शूटिंगसाठी कपड्यांची व्यवस्था विचारली तर एक तोकडा पोशाख त्यांच्यासमोर ठेवण्यात आला व हाच तुमचा आजचा पोषाख असं सांगण्यात आलं. तो पोशाख पाहून बाईंना काही सुचेना त्या रागावून एका कोपर्यात जाऊन बसल्या.
मा. विनायक शुटिंगच्यावेळी आले तर बाई तयार नव्हत्या. बाईंनी स्पष्ट सांगितले, 'मी असला पोषाख घालून काम करणार नाही. यावर मा. विनायकांनी त्यांना बजावलं, तुम्हाला असं करता येणार नाही. तुम्ही माझ्याशी करार केला आहे. मी सांगेन तसं तुम्हाला करावंच लागेल. पण बाई अडून बसल्या होत्या. बाबूराव पेंढारकरांनीही समजावलं पण बाई तयार होईनात. त्या बाबूरावांना म्हणाल्या, 'मला लाज वाटतेय असला पोशाख घालायला. त्यातून हा जो पोहायचा सीन आहे नं त्याबाबतीत सांगायचं झालं तर मला अजिबात पोहायला येत नाही."
एवढ्यात आचार्य अत्रे तिथे आले अन् गर्जत म्हणाले, "असा पोशाख घातल्याबद्दल तुला कुणीही काही बोलणार नाही, मी पाहिन कुणी तुला बोललं तर. मी त्याला पाहून घेईन. माझ्यावर ती जबाबदारी, मग तर झालं. सगळ्यांना सेटवरून बाहेर काढा पाहू. अन शिरोडकरांना बोलावून आणा."
(त्यावेळी बाई कोल्हापूरात रहात होत्या. तिथे त्या दोघांना कंपनीनं बंगला घेऊन दिला होता.) त्या सीनसाठी शिरोडकरांना बोलावून आणलं गेलं. आचार्य अत्र्यांनी बाईंना करार न मोडण्याबद्दल समजावलं, केस वगैरे होण्याची शक्यता सांगितली, करार पाळण्यातच बाईच हित असल्याचं त्यांच्या मनावर बिंबवलं. बाई नाईलाजानं तयार झाल्या. बाईची अट होती. सीन त्याच दिवशी पुरा झाला पाहिजे. त्या तो पोशाख पुन्हा घालणार नाहीत. दुसर्या दिवशी साडेआठ वाजेपर्यंत सगळा सीन पुरा झाला. बाई थंडीनं कुडकुडत होत्या. पण तसेच शुटिंग पार पडले. या चित्रपटानं इतिहास घडवला. पण बाईंना घरच्या लोकांची चिक्कार बोलणी खावी लागली. आई तर चिडून म्हणाली, "हातात भाला असता तर सिनेमाचा पडदा मी टराटर फाडला असता, असले सीन करायला गेलीस काय सिनेमात?" बाईंच एकच उत्तर होतं, "डॉक्टरांनी सांगितलं म्हणून मी केलं."
असा आहे या इतिहास घडवणार्या गीताच्या पाठीमागील इतिहास !
'यमुनाजळी' या गाण्याशी संबंधित अशा अनेक आठवणी काही मान्यवरांनी आपल्या लेखांतून आणि ग्रंथातून सांगितल्या आहेत. त्यातील काहींचा नामनिर्देश करणे आवश्यक वाटते.
सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. यू. म. पठाण ह्यांनी आपल्या 'अजून आठवतं' मध्ये 'ब्रह्मचारी'चा पहिला खेळ आठवताना म्हटले आहे. "त्या काळात आचार्य अत्र्यांच्या चित्रपटांनी मोठी धमाल उडवून दिली होती. मास्टर विनायक नि मीनाक्षी ही त्यावेळची अत्यंत लोकप्रिय जोडी. त्यांच्या चित्रपटांना अक्षरश: तोबा गर्दी होत असे. शनिवारी सायंकाळी 'ब्रह्मचारी'चा पहिला खेळ होता. ज्याचा एवढा गवगवा झाला तो 'ब्रह्मचारी' चित्रपट पाहण्याच्या आनंदाबरोबरच मा. विनायक आणि मीनाक्षी ही लोकप्रिय जोडी पाहण्याचं भाग्य' लाभल्यानं डोळ्यांचं पारणं फिटणार होतं ! 'यमुनाजळी खेळू खेळ कन्हैया' हे त्या काळात गाजलेलं गीतही याच चित्रपटातलं. ते पाहायला आणि ऐकायला मिळणार होत. आम्ही तीनचार जण दोन तीन तास आधी सर्कल टॉकीजवळ गेलो तो तिथं कम्पांऊड उतू जाईल इतकी गर्दी ! त्या भाऊ गर्दीत आमचा काय पाड नि निभाव लागणार होता? शेवटी हाऊस फुल्लचा बोर्ड झळकल्यावर सार्या आशा मावळल्या. उरली एकच एक आशा. मा. विनायक नि मिनाक्षी या पहिल्या खेळाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहतील, त्यांना लांबून का होईना पाहण्याची आणि तो सोनेरी क्षण चित्रपट सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटांच्या आधी आलाच. त्या दोघांना अगदी जवळून पहाता आलं."
अशीच एक आठवण विद्या माडगूळकर यांच्या 'आकाशाशी जडले नाते' या आत्मचरित्रात आली आहे. "स्टुडिओच्या आवारात गाण्याचे रेकॉडिंग आटोपून सर्व मंडळी, विनायकराव, बाबूराव (पेंढारकर), एच एम व्हीचे रमाकांत रूपजी, वसंतराव कामेरकर, मीनाक्षीबाई या सर्वांची चहापार्टी चालली होती. त्यात त्यांचे म्युझिक डायरेक्टर दादा चांदेकर पण होते. ते आमच्या मावशीच्या घरी भाड्याने जागा घेऊन राहिले होते. त्यांनी मला मावशीकडे पाहिले होते व माझे गाणेही ऐकले होते. त्यामुळे ते मला उभ्या असलेल्या मंडळीच्याकडे घेऊन गेले व विनायकरावांची ओळख करून दिली व "हिचा आवाज ऐका, फार गोड आहे. आपल्या मीनाक्षीबाईसारखा वाटतो. त्यांचे गाणे पण ती सुरेख गाते." 'यमुनाजळी खेळ खेळ कन्हैया का लाजता' हे गाणे त्या सर्वांनी म्हणण्याचा आग्रह केला. आणि मी ते गाणे म्हणून दाखविले. सर्वजण खूश झाले. विनायकरावांनी सांगून पण टाकले, "उद्या हिची टेस्ट घ्या" म्हणून. आनि माझी पहिलीच दोन गीते रेकॉर्ड झाली.
'यमुनाजळी'ने विद्या माडगूळकरांना जसा ध्वनिमुद्रिकांची गायिका होण्याची संधी मिळाली तशीच एके काळी गायक असलेल्या वसंत प्रभूंना संगीत दिग्दर्शक होण्याची संधी मिळली. मुंबईच्या डोंगरी विभागात त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम चालला होता. त्या कार्यक्रमात चांदेकरांनी संगीत दिलेल्या 'ब्रह्मचारी'तील 'यमुनाजळी" हे गाणे त्यांनी उपस्थित रसिकांच्या आग्रहाखातर पंचवीसवेळा म्हटले होते आणि सव्वीसाव्यावेळी ते गाणं म्हणताना त्यांचा आवाज फुटला. आणि रौप्यमहोत्सवी गाण्याबद्दल त्यांना प्रत्येक गाण्याला एक रूपयाप्रमाणे एका रात्रीत पंचवीस रूपये मोबदला मिळाला होता. पण त्या रात्री मात्र ते आपला आवाज गमावून बसले होते. (पूर्वपश्चिम)
अशीच एक आठवण केशवराव भोळे यांच्या केशव स्मरणी'त वाचायला मिळते. ती अशी की, 'ब्रह्मचारी' चित्रपटातील गाजलेले गाणे 'यमुनाजळी' याच चालीवर गांधीजींचे मोठेपणा वर्णन करणारे एक गाणे आचार्य अत्र्यांनी एका मुलीला लिहून दिले होते. 'महात्मा गांधीजी' हे शब्द 'कन्हैया का लाजता' या शब्दांच्या जागी आले होते.
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
आचार्य अत्र्यांची चित्रगीते
सौजन्य- दिलिपराज प्रकाशन प्रा. लि., पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.