पाहिजेस तू जवळी !
दिवस जाय बुडुन पार
ललित नभी मेघ चार
पुसट त्यास जरिकिनार
उसवी तीच सांज खुळी !
शेष तेज वलय वलय
पावे तमी सहज विलय
कसले तरी दाटे भय
येई तूच तम उजळी !
येई बैस, ये समीप
अधरे हे नयन टीप
दोन ज्योती एक दीप
मंद प्रभा मग पिवळी !
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | सुधीर फडके |
स्वर | - | आशा भोसले |
चित्रपट | - | ऊन पाऊस |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
अधर | - | ओठ. |
तम | - | अंधकार. |
प्रभा | - | तेज / प्रकाश. |
ललित | - | मोहक / रमणीय. |
शेष | - | बाकी, अवशिष्ट. |
हे गीत म्हणजे ग. दि. माडगूळकरांच्या काव्यप्रतिभेचा उत्युत्तम नमुना आहे. त्यांच्याकडे असलेली ही दिव्य शैली आठवली की आजही माझे मन भरून येते.
अशा गीतांना चाली देताना संगीताकारास कवितेची उत्तम जाण असावी लागते. फडकेसाहेबांकडे ती होती. त्यामुळे या गाण्यातील 'वलय वलय'ला त्याच्या अर्थास अगदी साजेशी अशी, 'वलय' शब्दातला गोलकार समोर आणणारी चाल त्यांनी बांधली आहे.
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.