A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वार्‍यावरती घेत लकेरी

वार्‍यावरती घेत लकेरी, गात चालल्या जललहरी !

चहू दिशांना प्रेमरसांकित
लकेर घुमवि सुरेल संगीत
अन्‌ संध्येच्या गाली नकळत स्वप्‍न रंगवी निलांबरी !

ताल धरोनी हरित तृणांचे
मोहक पाते मुरडत नाचे
फूल हो‍उनी कुंदकळीचे गंध उधळिते मोदभरी

भेदभाव हे विसरुन सगळे
आनंदाने गायिलेले
सप्त स्वरांचे गीत रंगले सात वेगळ्या सरोवरी
गीत - रमेश अणावकर
संगीत - दशरथ पुजारी
स्वर- सुमन कल्याणपूर
गीत प्रकार - भावगीत
कुंद - एक प्रकारचे सुवासीक, पांढरे फुल / एक प्रकारचे गवत / स्थिर हवा.
मोद - आनंद
चाल बांधण्यापूर्वी मी प्रथम काव्य वाचतो.. अन्‌ खूप वेळा वाचतो. चाल लावण्यापूर्वी त्याचे खूप मनन करावे लागते. एक एक अक्षर र्‍हस्व-दीर्घ आहे का बघावे लागते. समजा 'तू' असा शब्द असेल व तोडताना किंवा चालीच्या ओघात तो 'तु' असा उच्चारावा लागत असेल तर त्याबाबत शब्दाचा व तालाचा विचार करून तो बरोबर जुळवून घ्यावा लागतो. शक्यतो र्‍हस्व-दीर्घ उच्चार बरोबर व्हायला हवा, नाहीतर गाणं ऐकताना ते कानाला खटकल्यासारखं वाटतं. शब्द दीर्घ असला तर एक मात्रा वाढते व र्‍हस्व असेल तर अर्धी मात्रा कमी होते. हे मात्रेचे हिशेब झाले.

गाण्याच्या शब्दांचा विचार, भाव प्रकट करण्याच्या दृष्टीने करावा लागतो.
वार्‍यावरती घेत लकेरी
गात चालल्या जललहरी

यात कवीने काय सांगितले आहे ते कोणाच्याही लक्षात येईल. त्याचा अर्थ मला सांगायचा नाही. तर त्यातील भाव कसे दाखवता येतील याचा विचार करायचाय. "गात चालल्या जललहरी" यातील लहरी गात चालल्या आहेत तर त्या कशा गातील? तो स्वर कसा येईल ऐकायला? गायिकेच्या गळ्यातून येणारे स्वर जललहरीचा भास निर्माण करतील अशी स्वरयोजना करायला पाहिजे. हे सर्व जमलं तर तुमची चाल योग्य आहे. या गोष्टींचा मी खूप विचार करतो. काहीकाही वेळेला चाल पटकन सुचते. तो योग, ती वेळ, तो दिवस चांगला समजायचे. काही चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात त्याचाही आनंद मनात असतो. शिवाय परमेश्वराची कृपा, या सर्व गोष्टी त्या चांगल्या चालीला कारणीभूत असतात.
(संपादित)

अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.