सुजलाम् सुफलाम् मलयजशीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम् ।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीम्
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुर भाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम् ॥
वन्दे मातरम् ।
कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले,
कोटि-कोटि-भुजैधृत-खरकरवाले,
अबला केन मा एत बले ।
बहुबलधारिणीम् नमामि तारिणीम्
रिपुदलवारिणीम् मातरम् ॥
वन्दे मातरम् ।
तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वम् हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति
हृदये तुमि मा भक्ति
तोमारइ प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे मातरम् ॥
वन्दे मातरम् ।
त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी, नामामि त्वाम्
कमलाम् अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम् ॥
वन्दे मातरम् ।
श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम् भूषिताम्
धरणीम् भरणीम् मातरम् ॥
वन्दे मातरम् ।
गीत | - | बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय |
संगीत | - | पं. वि. दि. पलुस्कर |
स्वराविष्कार | - | ∙ पं. ओमकारनाथ ठाकूर ∙ आकाशवाणी गायकवृंद ∙ मास्टर कृष्णराव ∙ केशवराव भोळे ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
टीप - • তোমার (तोमार) या बंगाली शब्दाचा इंग्रजीत अर्थ 'yours' असा आहे. • এত (एत) या बंगाली शब्दाचा इंग्रजीत अर्थ so much' असा आहे. • स्वर- मास्टर कृष्णराव, राग- मिश्र झिंझोटी. |
अमला | - | देवता लक्ष्मीचे एक नाव / शुद्ध. |
कमला | - | लक्ष्मी. |
कुसुमित | - | सुगंधित. |
खर | - | कठिण (संस्कृत) / गाढव (मराठी). |
ज्योत्स्ना | - | चांदणे. |
द्रुम | - | वृक्ष, झाड. |
धृत | - | धरलेले. |
प्रहरण | - | प्रहार, हल्ला / शस्त्र, आयुध. |
पुलकित | - | आनंदित. |
फुल्ल | - | विकसित. |
यामिनी | - | रात्र. |
रिपु | - | शत्रु. |
वारणे | - | दूर करणे / हाकणे. |
सस्य (शस्य) | - | धान्य. |
∙ ७ नोव्हेंबर १८७६ रोजी श्री. बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय यांनी 'वन्दे मातरम्' या पदाची रचना केली.
∙ १८८२ मध्ये श्री. बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय लिखित 'आनन्दमठ' या कादंबरीत या पदाचा सामावेश करण्यात आला.
∙ १८९६ मध्ये गुरुदेव श्री. रबीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांनी 'वन्दे मातरम्'ला बंगाली शैली, लय आणि संगीतात बद्ध करून कलकत्ता येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात गायले.
∙ हे पद संस्कृत-बाँग्ला मिश्र भाषेत आहे.
∙ 'वन्दे मातरम्'चा इंग्रजीत अनुवाद सर्वात प्रथम श्री. अरविंद घोष यांनी केला.
∙ वंग-भंग आंदोलात 'वन्दे मातरम्' हे घोषवाक्य / प्रेरणागीत झाले होते.
∙ १९०६ मध्ये 'वन्दे मातरम्' देवनागरी लिपीत प्रस्तुत करण्यात आले व कलकत्ता येथील कॉंग्रेसच्या अधिवेशनात गुरुदेव रबीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांनी ते संशोधित रूपात सादर केले.
∙ १९२३ च्या कॉंग्रेसच्या अधिवेशनात 'वन्दे मातरम्' या पदाच्या विरोधात सूर उठले.
∙ १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री संविधान सभेची बैठक 'वन्दे मातरम्'ने सुरू होऊन 'जन गण मन'ने समाप्त करण्यात आली.
∙ 'वन्दे मातरम्' हे भारताचे 'राष्ट्रीय गीत' (National Song) आहे तर 'जन गण मन' हे भारताचे 'राष्ट्रीय गान' (National Anthem) आहे.
भारताचा स्वातंत्र्य लढा १८५७ च्या सशस्त्र क्रांतीपासून सुरू झाला. ही क्रांती यशस्वी झाली नसली, तरी याने पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल पुढे अखंडितपणे निरनिराळ्या रूपांत प्रकट होत राहिली. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब हे सशस्त्र क्रांतीचे केंद्र बनले. परंतु ही क्रांती वैयक्तिक पातळीवर किवा छोट्या समूहापर्यंत मर्यादित होती. अठराशे सत्तरच्या दशकात एका वेगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या, म्हणजे १८८५ पूर्वीचा, तो काळ होता. इंग्रजांचे कुटिल कारस्थान आणि जुलमी राजवटीमुळे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत होऊ लागली. अशा या वातावरणात 'वन्दे मातरम्' या गीताचा जन्म झाला.
बंगाली लिपी
मराठी रुपांतर - श्री. नरेंद्र गोळे
(दिनांक - ८ ऑगस्ट २००६)
বন্দে মাতরম্
आई तुला प्रणाम
সুজলাং সুফলাং
सुजल तू, सुफल तू
মলয়জশীতলাম্
मलयानिलशीत तू
শস্যশ্যামলাং মাতরম্
हरीतशस्यावृत्त तू, तुला प्रणाम
শুভ্র-জ্যোত্স্না-পুলকিত-যামিনীম্
चांद्रज्योत्सनापुलकित यामिनी
ফুল্লকুসুমিত-দ্রুমদলশোভিনীম্
उदितपुष्प-लता-वनांनी विभूषिते
সুহাসিনীং সুমধুরভাষিণীম্
सुहासिनी, सुमधूर भाषिणी
সুখদাং বরদাং মাতরম্
सुखदा वरदायिनी, तुला प्रणाम
সপ্তকোটীকন্ঠ-কল-কল-নিনাদকরালে
कोटी कोटी मुखांनी अभिव्यक्त तू
দ্বিসপ্তকোটীভুজৈধৃতখরকরবালে
कोटी कोटी बाहूंचे बल प्राप्त तू
অবলা কেন মা এত বলে
अबला कशी? महाशक्ती तू
বহুবলধারিণীং
अतुलबलधारिणी
নমামি তরিণীং
प्रणितो तुज तारिणी
রিপুদলবারিণীং, মাতরম্
शत्रुदलसंहारिणी, तुला प्रणाम
তুমি বিদ্যা তুমি ধর্ম্ম
तू विद्या, तू धर्म
তুমি হৃদি তুমি মর্ম্ম
तू हृदय, तू मर्म
ত্বং হি প্রাণাঃ শরীরে৷
तूच प्राण अन् कुडीही
বাহুতে তুমি মা শক্তি
तूच मम बाहूशक्ती
হৃদয়ে তুমি মা ভক্তি
तूची अंतरीची भक्ती
তোমারই প্রতিমা গড়ি মন্দিরে মন্দিরে
মাতরম্
तुझीच प्रतिमा वसे, हर मंदिरी, मंदिरी
तुला प्रणाम
ত্বং হি দুর্গা দশপ্রহরণধারিণী
तूची दुर्गा, दशप्रहरणधारिणी
কমলা কমল-দলবিহারিণী
कमला, कमलदल विहारिणी
বাণী বিদ্যাদায়িণী
वाणी, विद्यादायिनी
নমামি ত্বাং, নমামি কমলাম্
तुला प्रणाम, कमले तुला प्रणाम
অমলাং অতুলাম্, সুজলাং সুফলাং
মাতরম্
अमले अतुले, सुजले सुफले
तुला प्रणाम
শ্যামলাং সরলাং, সুস্মিতাং ভূষিতাম্
श्यामले सरले, सुस्मिते, भूषिते
ধরণীং ভরণীম্, মাতরম্
तूच घडवी, पोषी तू, तुला प्रणाम
বন্দে মাতরম্
आई तुला प्रणाम
बंगाली भाषेचा विचार करता, 'बन्दे मातरम्' असे असायाला हवे. कारण बंगाली लिपीत 'व' हे अक्षर नाही. श्री. बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय यांनी हे पद बंगाली लिपीत लिहिले. देवनागरीत लिपीत हे पद आणताना 'बन्दे' या शब्दास संस्कृत अथवा हिंदीत काहीच अर्थ नसल्याने, त्याचे 'वन्दे' असे संस्करण करण्यात आले.
कलकत्ता विश्वविद्यालयाच्या स्थापनेनंतर, सुरुवातीच्या काळात श्री. बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय यांनी या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी प्राप्त केली. इंग्रज सरकारने त्यांची नियुक्ती कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून केली. नंतर ते कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट कलेक्टर झाले. बंकिम चन्द्र प्रखर देशभक्त होते. त्यांना मागील शतकातील संन्याशांचे बंड आणि १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यांचे फार आकर्षण होते.
१८५७ साली इंग्रज सरकारने 'गॉड सेव्ह दी क्वीन' हे ब्रिटिशांचे राष्ट्रगीत भारतात रुजू करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे राष्ट्रगीत, भारताचेही राष्ट्रगीत आहे, अशी वातावरण निर्मिती करण्याकरिता कार्यक्रमात, सैन्यात आणि शाळांमध्ये त्यांनी हे गीत रुजवण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे बंकिम चन्द्र खूप संतप्त झाले. सन् १८७६ चा तो काळ होता. भारतीय लोक या ब्रिटिश राष्ट्रगीताचा तिरस्कार करीत होते. बंकिम चन्द्रांनी या विषयावर गहन विचार केला. त्यांच्या लक्षात आले की गेल्या हजार वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारत हा कधीच अखंड असा देश नव्हता आणि भारताचे कोणतेही राष्ट्रगीत नव्हते. म्हणून १८७६ मध्ये ७ नोव्हेंबरला त्यांनी देशभक्तीच्या भावनांनी ओथंबलेले आणि भारत देशाला मातृभूमी असे संबोधित करून तिचे नमन करणारे 'वन्दे मातरम्' हे सहा कडव्यांचे गीत लिहिले. आपल्या मित्रांना हे गीत वाचून दाखवल्यावर ते म्हणाले की, हे भारतीयांचे खरे राष्ट्रगीत असले पाहिजे.
बंकिम चन्द्रांनी मागील शतकातील 'संन्याशांचे बंड' या ऐतिहासिक घटनेवर आधारित 'आनन्दमठ' ही कादंबरी इ.स. १८८२ साली लिहिली. त्यांनी या कादंबरीत 'वन्दे मातरम्' हे गीत समाविष्ट केले. या कादंबरीत देशभक्त संन्यासी 'वन्दे मातरम्' हे गीत सामूहिकपणे गाताना दाखवले आहे.
'आनन्दमठ' या कादंबरीला अभूतपूर्व यश मिळाले. ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली. त्यामुळे 'वन्दे मातरम्' हे देशभक्तीचे अप्रतिम गीत लोकांपर्यंत पोहोचले. १८९६ साली काँग्रेसच्या कलकत्ता येथील राष्ट्रीय अधिवेशनात गुरुदेव श्री. रबीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांनी हे गीत गाऊन, संपूर्ण अधिवेशन राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून टाकले. १९०५ मध्ये इंग्रज सरकारने या गीतावर बंदी आणली. तरीसुद्धा बनारस येथील काँग्रेस अधिवेशनात गुरुदेव श्री. रबीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांची पुतणी श्रीमती सरलादेवी यांनी हे गीत गायले.
१९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालचे विभाजन केले. ही घटना बंग-भंग(वंग-भंग चळवळ) या नावाने इतिहासात नमूद आहे. बंग-भंगच्या विरोधात झालेल्या प्रचंड आंदोलनात 'वन्दे मातरम्' हे गीत प्रेरणादायी ठरले. हिंदू-मुस्लिम सर्वांनी गायन केले. सर्वांनी एकजुटीने केलेल्या या उग्र आंदोलनामुळे इंग्रज सरकार हादरले आणि त्यांना बंगालची फाळणी रद्द करावी लागली.
१९०४ मध्ये मादाम कामा यांनी भारताच्या राष्ट्रीय झेंड्याची पहिली रूपरेषा तयार केली. या झेंड्यात वर हिरवा, मध्य भागात पिवळा आणि खाली केसरी रंग होता. वर हिरव्या रंगावर कमळाची आठ फुले काढली असून, खालच्या केसरी रंगावर सूर्य आणि चंद्राच्या आकृत्या काढल्या होत्या. मध्य भागातील पिवळ्या रंगावर 'वन्दे मातरम्' असे लिहिले. 'वन्दे मातरम्' हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतका प्रेरक बीज मंत्र होता. मादाम कामा यांनी याला नियोजित राष्ट्रीय ध्वजाच्या मध्य भागात ठळकपणे स्थान दिले. २२ ऑगस्त १९०७ रोजी त्यांनी 'वन्दे मातरम्' लिहिलेला हा ध्वज स्टुटगार्ट, जर्मनी येथे फडकविला. ब्रिटिश सरकारने 'वन्दे मातरम्'वर घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ त्यांनी पॅरिस, फ्रान्स येथून याच नावाचे नियतकालिक चालू केले होते.
लाला लजपतराय यांनी त्या काळात लाहोरहून एक पाक्षिक काढले, त्याचे नाव होते 'वन्दे मातरम्.'
हिरालाल जैन यांनी १९०५ मध्ये भारतातील पहिला राजकीय चित्रपट बनवला व त्याचा शेवट 'वन्दे मातरम्' या गीताने केला.
१९१५ पासून काँग्रेसच्या प्रत्येक राष्ट्रीय अधिवेशनात नियमितपणे आग्रहपूर्वक 'वन्दे मातरम्' गायन होऊ लागले. त्यावेळी 'वन्दे मातरम्' इस्लामविरोधी नव्हते की जातीयही नव्हते. हिदू-मुस्लिम सर्वजण सारखेच 'वन्दे मातरम्'चा जयघोष करीत होते. अनेक क्रांतिकारक इंग्रजांचे अत्याचार सहन करत व 'वन्दे मातरम्'चा घोष करत फासावर जात. स्वातंत्र्य आंदोलनात 'वन्दे मातरम्' हा अतिशय लोकप्रिय नारा होता. कोणत्याही मोर्चामध्ये 'भारत माता की जय' आणि 'वन्दे मातरम्' हे असायचेच.
१९२१ मध्ये काँग्रेसने खिलाफत आंदोलनाला पाठिबा दिल्यानंतर मुस्लिम समाजातील धर्मांध व कट्टरतावादी लोकांचे महत्त्व वाढले. याबरोबरच 'वन्दे मातरम्'ला इस्लामविरोधी आणि जातीय ठरवून त्याचा विरोध सुरू झाला. १९२३ मध्ये काकीनाडा येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष महंमद अली यांनी 'वन्दे मातरम्' या गीतात मूर्तिपूजा असल्यामुळे, याला इस्लामविरोधी घोषित केले. मुस्लिमांच्या कट्टर व जातीय नेतृत्वापुढे झुकत काँग्रेसने आपल्या अधिवेशनात 'वन्दे मातरम्'चे गायन करण्याचा आग्रह सोडून दिला.
१९३७ मध्ये राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसने प्रतिपादन केले की 'वन्दे मातरम्'च्या सहा कडव्यांपैकी पहिल्या दोन कडव्यांमध्ये देशाला मातृभूमी म्हणत देशाच्या सृष्टिसौंदर्याचे वर्णन केले असल्यामुळे त्यात मूर्तिपूजेचा काहीही संबंध येत नाही. परंतु शेवटच्या चार कडव्यांमध्ये काही ठिकाणी मातृभूमीचे हिदूंची देवी दुर्गेच्या रूपात वर्णन केले आहे. म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने 'वन्दे मातरम्'' गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना 'राष्ट्रीय गीत' म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला व तो मंजूर पण झाला.
परंतु १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस प्रणीत भारत सरकारने फक्त 'जन गण मन' या गीतालाच 'राष्ट्रीय गीत' म्हणून घोषित केले. ही गोष्ट अनेक नेत्यांना पटली नाही. घटना समिती गठित झाल्यावर 'वन्दे मातरम्' ला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यावर अनेकदा चर्चा झाली. अखेर घटना समितीचे अध्यक्ष देशभक्त डॉ. राजेन्द्र प्रसाद यांनी घटना लागू होण्याच्या दोन दिवसापूर्वी २४ जानेवारी १९५० ला घटना समितीत हा ठराव मान्य करवून घेतला. अशा प्रकारे 'वन्दे मातरम्'ला राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळाला.
(डॉ. राजेन्द्र प्रसाद यांनी संविधान सभेत केलेले वक्तव्य-
"शब्दों व संगीत की वह रचना जिसे 'जन गण मन' से सम्बोधित किया जाता है, भारत का राष्ट्रीय गान है; बदलाव के ऐसे विषय, अवसर आने पर सरकार अधिकृत करे और 'वन्दे मातरम्' गीत, जिसने कि भारतीय स्वतन्त्रता संग्राम में ऐतिहासिक भूमिका निभायी है; को 'जन गण मन' के समकक्ष सम्मान व पद मिले। (हर्षध्वनि)। मैं आशा करता हूँ कि यह सदस्यों को सन्तुष्ट करेगा ।" (भारतीय संविधान परिषद, द्वादश खण्ड, २४-१-१९५०))
('राष्ट्रीय गान' (National Anthem)चे गायन भारत सरकारच्या सर्व अधिकृत कार्यक्रमांतून होणे अनिवार्य आहे. 'राष्ट्रीय गीत' (National Song) हे असे गीत आहे ज्याच्याशी जनमानसाची देशभक्तीची भावनिक नाळ जोडली आहे.)
∙ 'जन गण मन' या राष्ट्रीय गानाची एकच धून असून, त्याप्रमाणेच याचे गायन होत असते.
∙ परंतु 'वन्दे मातरम्'च्या अनेक धून प्रचलित आहेत.
∙ सर्वप्रथम १८८२ मध्ये 'आनंदमठ' या कादंबरीत 'वन्दे मातरम्' या गीताचा समावेश केल्यावर श्री. बंकिम चन्द्र चट्टोपाध्याय यांनी त्या काळातील बंगाली नाट्य क्षेत्रातील लोकप्रिय संगीतकार जदुनाथ भट्टाचार्य यांच्याकडून 'वन्दे मातरम्'ची चाल बसवून घेतली. ही चाल अनेक वर्षे प्रचलित होती.
∙ विसाव्या शतकामध्ये या गीताच्या ज्या चाली प्रचलित झाल्या, त्यापैकी अनेक चाली भारतीय संगीताच्या रागांवर लावल्या गेल्या. काही चित्रपटांमध्ये निरनिराळ्या चालींवर हे गीत चित्रित केले गेले. यापैकी 'आनंद मठ', 'लीडर' आणि 'अमर आशा' या चित्रपटांच्या चाली लोकप्रिय झाल्या.
∙ 'आनंद मठ' या चित्रपटात 'वन्दे मातरम्' हे गीत लता मंगेशकर यांनी एका प्रसंगात गायिले आहे. दुसर्या एका प्रसंगात हेमंतकुमार यांनी हे गीत गायिले आहे. या चित्रपटाचे संगीत हेमंत कुमार यांचे आहे.
∙ लोकप्रिय संगीतज्ञ रविशंकर यांनी आकाशवाणीकरिता या गीताची जी चाल लावून दिली, ती पण खूप लोकप्रिय झाली.
∙ १५ ऑगस्ट १९४७ रोजी सकाळी साडे सहा वाजता आकाशवाणी वरून 'देस' रागात निबद्ध 'वन्दे मातरम्' पंडित ओंकारनाथ ठाकुर गायन थेट प्रक्षेपित करण्यात आले होते. हे गायन त्यांनी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये या पदास संपूर्ण सन्मान देत, उभे राहून केले. पंडित ओंकारनाथ ठाकुर यांच्या या गायनाचा, 'दि ग्रामोफोन कम्पनी ऑफ इंडिया'चा रेकॉर्ड क्रमांक आहे- STC 048 7102
∙ १९९७ साली भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी लोकप्रिय संगीतकार ए. आर. रहमान यांनी 'वन्दे मातरम्' हे शीर्षक असलेला गीत संग्रह प्रकाशित केला. २००२ मध्ये बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने जगातील ७००० गीते निवडून सर्वात लोकप्रिय अशा पहिल्या १० गीतांकरिता एक सर्वेक्षण केले. त्यात ए. आर. रहमानच्या 'वन्दे मातरम्'ला जगात दुसर्या क्रमांकाचे स्थान लाभले.
∙ २०१८ मधे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका कल्याणी बोंद्रे यांनी 'वन्दे मातरम्' या गीताला नवीन चालीत बांधून हे गीत रसिकांसमोर आणले.
आंतरजालावरून संग्रहित
गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांच्या समृद्ध गायकीचा वारसा चालविणार्या संगीतकलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर उर्फ मास्तर कृष्णराव ('कृष्णा मास्तर' किंवा नुसते 'मास्तर' हे नाव अधिक प्रचलित) यांनी शास्त्रीय संगीताबरोबर नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावसंगीत, देशसंगीत व चित्रपट संगीतक्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेली आहे. परंतु 'वंदे मातरम्' हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे याकरिता मास्तरांनी भारतीय घटना समितीबरोबर अमूल्य कार्य केलेले आहे. मास्तरांच्या ह्या दैदिप्यमान कार्यास उजाळा आणून त्याची नवीन पिढीला ओळख करून देण्याचा या लेखातून केलेला हा प्रपंच.
सन १९३५च्या सुमारास पुणे येथील 'प्रभात फिल्म कंपनी' मध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून कार्यरत असताना मास्तरांनी प्रथम 'झिंझोटी' रागात 'वंदे मातरम्' संगीतबद्ध केले व प्रभातचे दिग्दर्शक व्ही. शांताराम यांची रीतसर परवानगी घेऊन प्रभातच्या स्टुडिओत त्याचे रेकॉर्डिंगही केले. अल्पावधीतच ते गीत लोकप्रिय झाले. मास्तर सच्चे देशभक्त असल्यामुळे आपल्या अनेक गानमैफलींच्या उत्तरार्धात स्वतः संगीतबद्ध केलेल्या त्या गीताचे गायन करून आपल्या संगीत मैफलीचा शेवट करीत असत. मात्र त्याकाळातील ब्रिटिश राजवटीत 'वंदे मातरम्' जाहीरपणे गायला सरकारी पातळीवर बंदी होती. तरीसुद्धा मास्तरांनी आकाशवाणीवरील त्यांच्या एका कार्यक्रमात नाट्यपदाला जोडून अचानक 'वंदे मातरम्'चे गायन सुरू केले. हे लक्षात येताच स्टेशन डायरेक्टर श्री. बुखारी यांनी ध्वनिक्षेपक बंद केले. याचा परिणाम म्हणून मास्तरांनी आकाशवाणीवर गाण्यास पूर्णपणे बहिष्कार टाकला. त्याकाळी दूरदर्शनचे आगमन भारतात झालेले नव्हते म्हणून रेडिओ हेच कलावंतांचे उपजीविकेचे आणि रसिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रमुख साधन होते. मास्तरांना रेडीओवर 'वंदे मातरम्' गाऊ न दिल्याच्या घटनेचा भारतातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमधून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पुढे स्वातंत्र्य दृष्टीक्षेपात असताना १९४७ साली चैत्री पाडव्याला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीमुळे आकाशवाणीने मास्तरांना 'वंदे मातरम्' गायला सन्मानाने आमंत्रित केले. तेव्हा मास्तरांनी आकाशवाणीवर 'वंदे मातरम्' गाऊन बहिष्कार मागे घेत आपल्या रेडिओवरील सांगीतिक कारकिर्दीस पुन्हा प्रारंभ केला. पुढे आकाशवाणीच्या विनंतीनुसार नव्यानेच सुरू झालेल्या पुणे आकाशवाणीचे अधिकृत संगीतकार, शास्त्रीय गायक व सल्लागार म्हणून मास्तरांनी काही काळ कार्य केले.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी राष्ट्रगीत कोणते हे निश्चित झाले नव्हते. त्यामुळे १४ ऑगस्ट १९४७ रोजी रात्रीच्या कार्यक्रमात 'जन गण मन' व 'वंदे मातरम्' ही दोन्ही गीते गायली गेली होती. डिसेंबर १९४७ मध्ये घटना समितीच्या कामास सुरुवात झाली, त्यावेळी मास्तरांनी पंतप्रधान पंडित नेहरूंना- 'वंदे मातरम्' विषयी एक संगीततज्ञ म्हणून माझे मत ऐकावे, अशी दिल्लीला तार केली. तार मिळताच पं. नेहरूंनी मास्तरांना दिल्लीला भेटण्याकरिता व सादरीकरणासाठी निमंत्रण पाठवले. मास्तरांनी दिल्लीत घटना समितीच्या सदस्यांसमोर समूह गायनातील व केवळ वाद्यवृंदातील 'वंदे मातरम्'ची स्वतः कष्टाने तयार केलेली, अशी एकूण दोन ध्वनिमुद्रणे ऐकवली. तसेच स्वतः तिथे प्रत्यक्ष सादरही करून दाखवले. परंतु पं. नेहरूंनी संयुक्त राष्ट्रसंघात किंवा परदेशात सहजगत्या वाजविता येईल, अशा प्रकारची रचना हवी, असे सुचवले.
मग मास्तर मुंबई येथील पोलिस बँडचे प्रमुख सी. आर. गार्डनर, ह्या ब्रिटिश अधिकार्याला या संदर्भात भेटले. मिश्र झिंझोटी रागातील हीच रचना मास्तरांनी श्री. गार्डनर यांच्या मदतीने पाश्चात्य पद्धतीनुसार बँडवर बसवून घेतली. त्याचे पाश्चात्य पद्धतीचे नोटेशन छापून घेतले. या बँडवर 'वंदे मातरम्'च्या सादरीकरणासाठी तीन ध्वनिमुद्रिका तयार केल्या. तसेच नेव्हल बॅंडचे प्रमूख असलेले श्री. स्टॅंले हिल्स यांनी देखील ब्रास बॅंडवरमास्तरांची रचना पाश्चात्य पद्धतीने बसवली. या बरोबरच, श्री गार्डवर व श्री. हिल्स या पाश्चात्य संगीत तज्ञांचे अभिप्राय, बँड नोटेशन व 'वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत होण्यासाठी स्वतःची संगीतकार म्हणून असलेली मते, यांची मास्तरांनी पत्रके छापून घेतली. हे सर्व साहित्य आणि साथीदारांसह मास्तर पुन्हा दिल्लीत पोहोचले. तत्कालीन संसदेमध्ये घटनासमितीच्या सदस्यांसमोर मास्तरांनी 'वंदे मातरम्'ची प्रात्यक्षिके सादर केली. १ मिनीट ५ सेकंदांचे तसेच ध्वजारोहणाच्या वेळी वाजविण्यात येणारे २० सेकंदांचे 'वंदे मातरम्' अशी ध्वनिमुद्रणे ऐकवली.
मास्तरांच्या सर्वच संगीत रचनांमध्ये सहजसुंदरता व माधुर्य दिसून येते. या मिश्र झिंझोटी रागातील 'वंदे मातरम्'ची संगीत रचनासुद्धा सुरेल व सर्व वयातील स्त्री-पुरुषांना सांघिकरित्या गाता येईल, अशी सुलभ होती. या तेजस्वी कार्याबद्दल सर्व संसद सदस्यांनी मास्तरांचा गौरव केला. पं. नेहरूंनी देखील, "आपण देशातील सर्वश्रेष्ठ संगीतकार आहात", अशा शब्दांत त्यांचा गौरव केला. 'वंदे मातरम्' या गीताला राष्ट्रगीताचे स्थान मिळण्याकरता नेहरूंसह काही जणांनी घेतलेले सर्व आक्षेप मास्तरांनी आपल्या संगीत रचनांमधून खोडून काढले होते. अगदी मार्चिंग साँगसारखेही 'वंदे मातरम्'चे गायन-वादन होऊ शकते, अशी प्रात्यक्षिके त्यांनी दिलेली होती. ही सर्व मेहनत मास्तरांनी स्वखर्चाने केलेली होती. त्याकरिता मास्तरांनी खूप पैसा खर्च केला होता. शिवाय अगदी स्वतः पोलीस ग्राउंडवर जाऊन, मार्च साँगसाठी परिश्रम घेतले होते. परंतु स्वातंत्र्यानंतर देशात वाद नकोत, अशी कदाचित राज्यकर्त्यांची भूमिका असावी. स्वातंत्र्य लढ्यातील 'वंदे मातरम्' या शब्दांचे महत्त्व, स्थान आणि मास्तरांचे राष्ट्रगीताकरिताचे अथक प्रयत्न यामुळे 'वंदे मातरम्'ला पूर्णपणे डावलणे राज्यकर्त्यांना अशक्य झाले. विविध राज्यप्रमुखांची मतेही 'वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत व्हावे, या बाजूची होती. स्वतः गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांनी 'वंदे मातरम्'चे पहिले जाहीर गायन सन १८९६ मध्ये केले होते. ते या गीताचे पुरस्कर्ते होते. परंतु दुर्दैवाने सन १९४७ मध्ये ते हयात नव्हते.
शेवटी २४ जानेवारी १९५०च्या घटनासमितीच्या अखेरच्या बैठकीत कोणतेही मतदान न घेता घटनासमितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रबाबू प्रसाद यांनी 'जन गण मन' हे राष्ट्रगीत (National anthem) राहिल आणि 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत (National song) राहिल व त्यास समान राष्ट्रगीताचा दर्जा देण्यात येईल, असे एकतर्फी जाहीर केले. त्यावेळी मास्तर दिल्लीतच होते. त्यांची अर्थातच घोर निराशा झाली होती. त्यांनी 'वंदे मातरम्' हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत असावे, हे स्वप्न उराशी बाळगून, ते गीत राष्ट्रगीत व्हावे हा ध्यास घेतला होता. त्यासाठी अनेक वर्षे अविरत परिश्रम घेतले होते. 'वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत झाले नाही, याचा मास्तरांना जरूर खेद झाला; परंतु त्यातही 'वंदे मातरम्'ला पूर्णपणे न डावलता, त्या गीतास समान राष्ट्रगीताचा बहुमान मिळाला, ही समाधानाची गोष्ट घडली होती. या निर्णयास, इतर कारणांबरोबर मास्तरांनी 'वंदे मातरम्' हे राष्ट्रगीत होण्याकरिता दिलेला हा प्रखर सांगीतिक लढा प्रामुख्याने कारणीभूत होता.
पुढच्या काळातही मास्तर 'वंदे मातरम्'चा प्रचार व प्रसार करितच राहिले. त्यांच्या संगीत मैफलीचा शेवट 'वंदे मातरम्' गायनानेच व्हावा, याकरिता आता संगीत श्रोते आग्रह धरू लागले होते. सन १९५३ च्या सुमारास भारत सरकारतर्फे चीन भेटीवर गेलेल्या कलावंतांच्या सांस्कृतिक पथकामध्ये, एक प्रमुख कलावंत म्हणून मास्तर सहभागी होते. त्या कलावंतांनी चीनमध्ये सादर केलेल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या आरंभीच मास्तरांनी 'वंदे मातरम्'चे गायन केले होते. त्यास त्यांना इतर सहभागी कलावंतांनी गायन साथ दिलेली होती. मास्तरांनी संगीतबद्ध केलेल्या 'वंदे मातरम्'ची रेकॉर्ड महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये अनेक वर्षे (सुमारे सन १९७० पर्यंत) दररोज वाजवली जात असे. तसेच अनेक संस्था व सभांमध्ये कार्यक्रमाच्या वेळी ही रेकॉर्ड वाजवली जायची. शिवाय पुणे येथील महाराष्ट्रीय मंडळ, शिवाजी मंदिर आणि अखिल भारतीय हिंदु महासभा यांसारख्या संस्थांमध्ये संपूर्ण कडव्यांसहित, पूर्ण 'वंदे मातरम्' गायला मास्तरांना सन्मानाने निमंत्रित केले जाई.
आपली कला राष्ट्रहितासाठी अर्पण करणार्या आणि कलेसाठी स्वाभिमान-राष्ट्राभिमान दाखविणार्या मोजक्या बाणेदार कलावंतांमध्ये मास्तर कृष्णरावांचे नाव कायम अग्रणी राहिल.
या तेजस्वी कार्याचा गौरव करताना पु. ल. देशपांडे आपल्या भाषणात म्हणाले होते-
वंदे मातरम् साठी मास्तरांनी घेतलेले परिश्रम पाहून मास्तरांनाच वंदे मास्तरम् म्हणावे, असे वाटते !
श्री. मिलिंद सबनीस, श्रीमती प्रिया फुलंब्रीकर
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.