A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सांग मजला सारिके तू

सांग मजला सारिके तू, प्रिय किती त्या माहिती
सांग कुठल्या विविध रूपे मजसी असतील पाहती

कल्पिते या अंतरी मी रोज त्यांना मीलना
दूर जाता प्रियसखा हा एक चाळा स्त्रीमना
नाथ तेथे एकटे, मी या इथे ही एकटी

भिजुनी वीणा होय ओली, अश्रू नयनी दाटता
पुसत ती मी मलिनवसना, गीत त्यांचे गुंफिता
कल्पिते मी शाप सरता तेच वेणी बांधती

पूजिते मी देवतांना, विरहकृश त्या चित्रिते
अंग टाकी भूमिवरती, तरीही मजला वाटते
दूत येइल सुखविण्या कुणि शब्द घेऊन संप्रती
गीत - वसंतराव पटवर्धन
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर- आशा खाडिलकर
गीत प्रकार - गीत मेघ, मालिका गीत, कविता
  
टीप -
• गीत क्रमांक ७
• 'गीत मेघ' - अनुवादित 'मेघदूत'मधून
• वाहिनी- सह्याद्री, कार्यक्रम - 'प्रतिभा आणि प्रतिमा' (१९८०)
• निवेदन- ज्योत्‍स्‍ना किरपेकर
• सादरकर्ते- अरुण काकतकर
• ध्वनीफीत सौजन्य- डॉ. वसंतराव पटवर्धन
संप्रती - सध्या.
सारिका - मैना.
संपूर्ण कविता

सांग मजला सारिके तू, प्रिय किती त्या माहिती
सांग कुठल्या विविध रूपे मजसी असतील पाहती

मोजिते मी उंबर्‍यावर मांडिलेली ही फुले
गणित असते शाप सरण्या दिवस किती गे राहिले
काळ कंठी मी कसा, हे तूच असशील जाणती

कल्पिते या अंतरी मी रोज त्यांना मीलना
दूर जाता प्रियसखा हा एक चाळा स्त्रीमना
नाथ तेथे एकटे, मी या इथे ही एकटी

भिजुनी वीणा होय ओली, अश्रू नयनी दाटता
पुसत ती मी मलिनवसना, गीत त्यांचे गुंफिता
हीच यावी काय त्यांच्या पुढति माझी आकृती

बांधले मी केस, सुमने त्यांत नाही माळली
स्‍नेह नसता राठ झाले, ही नखेही वाढली
कल्पिते मी शाप सरता तेच वेणी बांधती

पूजिते मी देवतांना, विरहकृश त्या चित्रिते
अंग टाकी भूमिवरती, तरीही मजला वाटते
दूत येइल सुखविण्या कुणि शब्द घेऊन संप्रती

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.