A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वाजवी मुरली श्यामसुंदरा

वाजवी मुरली श्यामसुंदरा
तुझ्या मंदिरी नाचे मीरा !

करिं करताळा, पायी घुंगुर
जन्म तुडविते हा क्षणभंगूर
देह नव्हे हा मोरपिसारा !

कसले कलियुग?- मी द्वापारी
गोपवधू मी, तू कंसारी
कालिंदीचा रम्य किनारा

गोपीनाथ तू, मी तर गोपी
पुण्यशील तुज, जगास पापी
आले, आले मी अभिसारा !

मिठीत मिटले विश्व मुकुंदा
मी आपणिले ब्रह्मानंदा
तू मी दोघे- अमृतधारा !