मी धरिन चरण त्याचे । अग सखये ॥
बहु आप्त बंधु बांधवां प्रार्थिलें कथुनि दुःख मनिंचें ।
तें विफल होय साचें । अग सखये ॥
मम तात जननि मात्र तीं बघुनि कष्टती हाल ईचे ।
न चालेचि कांहिं त्यांचें । अग सखये ॥
जे कर जोडुनि मजपुढें नाचले थवे यादवांचे ।
प्रतिकूल होति साचे । अग सखये ॥
गीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
संगीत | - | अण्णासाहेब किर्लोस्कर |
स्वराविष्कार | - | ∙ बालगंधर्व ∙ सवाई गंधर्व ∙ मधुवंती दांडेकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | सौभद्र |
राग | - | जोगिया |
चाल | - | जो चिदानंदकंद |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
साच | - | खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज. |
आतां या तिसर्या वर्षी आमच्या आर्यबंधूंची सेवा करण्यास कोणतें साधन मिळवावें या विवंचनेंत असतां दुसरीं प्राचीन नाटकें पुष्कळ पुढें येऊन उभीं राहिलीं. परंतु आपल्यापाशीं अनुकूल असलेल्या मंडळीकडे पहातां तीं सर्व नाटकें माझ्या दृष्टीनें असाध्यशीं वाटूं लागलीं. या कारणामुळें आपल्या पुराणांतील एखादा इतिहास घेऊन त्यावर स्वकपोलकल्पित नाटकाची रचना करून हें वर्ष साजरें करावें, असा विचार मनांत ठसला. नंतर तसे इतिहास पुष्कळ मनांत येऊन हा अर्जुन-सुभद्राविवाहाचा इतिहास सर्व प्रकारें ठीकसा वाटल्यानें यथामति त्यास नाटकरूप देऊन हें 'संगीत सौभद्र' नाटक तयार केलें.
नाटकाचे निबंध पुष्कळ आहेत; तिकडे जितकें देववेल तितकें लक्ष देऊन याची रचना केली आहे. किती एक ठिकाणीं इंग्लिश पद्धतीवरही यांत रस आले आहेत. सारांश, हें नाटक स्वतंत्र रीतीनें तयार न होता अनुकूल असलेल्या मंडळीकडे पाहून रचिलें असल्यामुळें सुज्ञ रसिक यांतील दोषांकडे दृष्टि न देतां, अल्प गुणांचा बहुमान करतील अशी आशा करतों.
(संपादित)
अण्णासाहेब किर्लोस्कर
'संगीत सौभद्र' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- अनंत विनायक पटवर्धन (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
संगीत शाकुंतलापेक्षांही या नाटकांत ग्रंथकर्त्यांच्या कवित्वशक्तीचे तेज विशेष चमकतें. रा. रा. अण्णासाहेबांच्या कल्पना-चातुर्याची झांक यांत बरीच दिसून येत आहे. पात्रांच्या अनुरोधानें या नाटकांतील विषयाची योजना झाल्यानें, या नाटकाचा प्रयोग उत्तम वठतो, व त्यांतील रसाचा आस्वाद कितीही घेतला तरी वीट आणीत नाहीं- या गोष्टी साधारणतः सर्वांना मान्य आहेत.
सुभद्राहरण हें चरित्रच आमच्या स्त्रीपुरुषसमाजाच्या प्रीतींतलें आहे. त्यांत रा. रा. अण्णासाहेबांनीं तें 'पुनर्बुभुक्षाकरणी' आपल्या कल्पनाशक्तीनें नवीन गोष्टींचा मालमसाला घालून 'तिखटची केलें.' मग तें लोकांना कां प्रिय होऊं नये? सुभद्रेचीं करुणरसप्रधान पद्यें अबालवृद्धांच्या तोंडून, तालसुरांच्या नियमांवर विशेषसा जुलूम न होतां ऐकूं येऊं लागली आहेत. तेव्हां हें एक नवीनच करमणुकीचें साधन रा. रा. किर्लोसकरांच्या कृपेनें आम्हांस मिळालें याबद्दल त्यांचे उपकार मानणें वाजवी आहे.
संगीत वगैरे जनमनआल्हादनाचीं जीं साधनें, त्यांचा आजपर्यंत असभ्यतेशीं नित्यसंबंध जडल्यासारखें दिसत होतें, तीं पुनः शुद्ध होऊन सभ्य समाजाला लाधतील, असें दिसत आहे.
असल्या प्रकारच्या सदानंद देणार्या साधनांचा फैलाव जितका जास्ती होईल तितका चांगला; म्हणून पुस्तकाच्या वरचेवर नव्या आवृत्ती काढाव्या लागत आहेत, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. मागील आवृती लोकांचा आश्रय चांगला मिळाला तसाच याही आवृत्तीस मिळेल अशी उमेद आहे.
(संपादित)
पुस्तक प्रकाशक
'संगीत सौभद्र' या नाटकाच्या पुस्तकाच्या द्वितीयावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- अनंत विनायक पटवर्धन (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.