A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
खबरदार जर टाच मारुनी

( 'मी परत येईपर्यंत या शिवेवरून तूं कोणाही स्वारास जाऊं देऊं नकोस' ही शिवबापासून मोठ्या कष्टानें मिळवलेली कामगिरी सावळ्या बजावीत आहे. )

सावळ्या :
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढें, चिंधड्या-
उडविन राइ राइ एवढ्या !
कुण्या गांवचे पाटिल आपण कुठे चालला असें
शीव ही ओलांडुनि तीरसे?
लगाम खेचा हा घोडीचा राव टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणीं !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेउं ही
मला कां ओळखलें हो तुम्ही?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे,
हें हाडहि माझें लेचेपेचें नसे
या नसानसांतुन हिंमतबाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढें, चिंधड्या-
उडविन राइ राइ एवढ्या !

लालभडक तें वदन जाहलें बाळाचें मग कसें
( स्वार परि मनी हळूं कां हसे? )
त्या बाळाच्या नयनीं चमके पाणी त्वेषामुळें
स्वार परि सौम्य दृष्टीनें खुले.
चंद्र दिसे एक जणूं दूसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर-
"आहेस इमानी माझा चेला खरा
चल इनाम घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या पुन्हां बोल एकदां
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढें, चिंधड्या-
उडविन राइ राइ एवढ्या ! "