A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उपवनिं गात कोकिळा

उपवनिं गात कोकिळा
ऋतुराजा जिवाचा, दिसला तिज ॥

रसिकराज तिज दिसला
जीव जिवा सांपडला
फुलत चंद्र पाहुनियां कमलाजन ॥
उपवन - बाग, उद्यान.
ओडियन एस.ए. ३०८४ ह्या क्रमांकाची ही ध्वनिमुद्रिका १९३५ च्या सुमारास बाजारात आली व हातोहात खपली. इतकी की पुढे कोलंबिया लेबलवर ती १९४५ च्या आगेमागे पुन्हा वितरित करावी लागली. हिराबाईंना त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या बैठकींमध्ये हे गाणं खास लोकाग्रहास्तव गायला लागत असे. "१९४० च्या सुमारास मराठी घरांमध्ये मुलगी बघण्याचा/दाखविण्याचा कार्यक्रम असला व मुलीला गाणं म्हणायला सांगितलं की ती हमखास हेच गाणं गात असे." अशी आठवण पंडित भीमसेन जोशी ह्यांनी सांगितली आहे.

सौ. हिराबाई बडोदेकर (१९०५ - १९८९) ह्यांनी भावगीत गायनाप्रमाणे अनेक विविध दालनं स्त्रियांसाठी खुली करुन दिली. खानसाहेब अब्दुल करीम खान व ताराबाई माने ह्यांची ही मोठी मुलगी. आईवडिलांची गायनविद्या घेऊनच जन्माला आली. तिनं डॉक्टर व्हावं अशी आईची इच्छा. पण नियतीनं काही वेगळंच योजलं होतं. गाण्याची तालीम बंधू सुरेशबाबू व काका अब्दुल वहिद खान ह्यांचेकडे सुरु झाली. १९२१ साली त्या गांधर्व महाविद्यालयाच्या समारंभात गायल्या. १९२३ साली पहिली ध्वनिमुद्रिका ग्रामोफोन कंपनीकरिता दिली. १९२४ साली लग्‍नं झालं. त्याच साली पुण्यात तिकिट लावून त्यांनी जलसा केला. त्या काळात उभं राहून अदाकारीचं गाणं स्त्रियांना करावं लागत असे. पण हिराबाईंनी एखाद्या उस्तादाप्रमाणे बसून त्यांनी गाणं केलं. हे धाडस करुन त्यांनी कुलीन स्त्रिया व मुलींना अभिजात संगीताचं विशाल दालन उघडून दिलं.

१९२९ साली मराठी संगीत रंगभूमीवर त्यांनी काम करायला सुरुवात केली व बालगंधर्वांचीही वाहवा मिळविली. त्यांच्या नाटक कंपनीचं दिवाळं वाजलं, नादारीची वेळ आली, तरी खचल्या नाहीत. सिनेमात कामं करुन व गायन कलेच्या जोरावर त्यांनी सारं कर्ज फेडलं. भावंडांना आधार दिला. पूर्ण जीवन यशस्वीपणे जगल्या व १९८९ मध्ये हे जग सोडून गेल्या. प्रत्येक गुरुवारी त्यांच्या घरी भजन होत असे व त्याला स्त्रिया आवर्जून येत असत. बायकांच्या समारंभाचं आमंत्रण त्या स्वीकारत व त्यांना आवडतील अशी गाणी म्हणत. त्यात भजन, भावगीत, नाट्यगीत गाऊन अभिजात संगीताची गोडी लावीत असत. त्यांच्या साधेपणामुळे आपली आई, बहिण वा आजी किंवा मावशीच गाते आहे असं श्रोत्यांना वाटे.

१९२५-१९६५ ह्या काळात हिराबाईंनी सुमारे २०० गाणी ७८ आर.पी.एम. ध्वनिमुद्रिकांवर मुद्रित केली. त्यात शास्त्रीय संगीतातील राग-रागिण्या, नाटयगीते, भावगीते, भजने व गज़लसुद्धा आहेत. केवळ तीन साडेतीन मिनिटांची असूनही ही गाणी अवीट गोडीची आहेत. राजा बढे, स. अ. शुक्ल व वसंत शांताराम देसाई ह्यांची मिळून दहा/बारा तरी भावगीतं त्यांनी ध्वनिमुद्रित करुन ठेवली आहेत. त्यातली दोन लोकप्रिय गाणी - 'नंदलाला नाच रे ब्रिजलाला' व 'विनवित शबरी रघुराया' ही मराठी मनांत घर करुन आहेत. ह्या गीतांची चाल व संगीत सुधीर फडके ह्यांनी दिलं होतं. एच.एम.व्ही. कंपनीत असतांना त्यांनी ह्या ध्वनिमुद्रिका बनवून घेतल्या होत्या व खूप खपल्या. 'ही कोण मधुरानना' व 'असाच धावत येई मोहना' ही गीतं स्त्रिया व मुली आवडीनं गात असत.

आज ही सगळी गाणी ध्वनिमुद्रिका संग्राहकांकडेच ऐकावयास मिळू शकतात.
(संपादित)

सुरेश चांदवणकर
सौजन्य- marathiworld.com
(Referenced page was accessed on 28 August 2016)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.