A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उगवला चंद्र पुनवेचा

उगवला चंद्र पुनवेचा !
मम हृदयीं दरिया ! उसळला प्रीतिचा !

दाहि दिशा कशा खुलल्या
वनिंवनीं कुमुदिनी फुलल्या
नववधु अधीर मनीं जाहल्या !
प्रणयरस हा चहुंकडे ! वितळला स्वर्गिचा?
कुमुदिनी - श्वेतकमळाची वेल.
मी पूर्वी लिहिलेल्या एका चित्रपटाच्या कथानकाचा थोडासा उपयोग या नाटकात केलेला आहे. प्रेम की पैसा, हा या नाटकाचा विषय आहे. तो इतका साधा आणि मामुली आहे, आणि आजपर्यंत तो इतक्या लोकांनी हाताळलेला आहे की, नाविन्याचा अभिमान वाहणार्‍या माझ्यासारख्या चोखंदळ लेखकाने तो चिमट्याने देखील उचलण्याच्या लायकीचा नाही, असेच कोणीही म्हणेल. मला हे मान्य आहे.

मग असे असता मी हा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा का बरे उपद्व्याप केला? त्याचे उत्तर म्हणजे हे नाटक प्रत्यक्ष वाचून पहावे. परिचित विषयही पुन्हा किती सुरस, मनोरंजक आणि नाट्यपूर्ण करून दाखविता येतो, हे दाखविण्याचा हा प्रयत्‍न आहे. तो यशस्वी झाला आहे, असे निदान मला तरी वाटते.

(या नाटकाचा पहिला प्रयोग दि. ११ ऑक्टोबर १९४६ रोजी रात्री पुणे येथे 'भानुविलास' नाट्यगृहात झाला. तो प्रयोग 'बालमोहन'च्या कुशल नटवर्गाकडून श्री. दामुअण्णा जोशी ह्यांनी बसवून घेतला. पदांच्या चाली श्री. बबनराव कुलकर्णी यांनी दिल्या होत्या व प्रयोगाची सर्व व्यवस्था श्री. बाबुराव जोशी यांनी केली होती.)
(संपादित)

प्रल्हाद केशव अत्रे
दि. १० ऑक्टोबर १९४६
'पाणिग्रहण' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- कृष्णाजी नारायण सापळे (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.