मज लागले पिसे ग
नकळे मनास आता
या आवरू कसे ग !
ये ऐकण्यास जेव्हा
त्याचा सुरेल पावा
चोहीकडे बघे मी
परि ना कुठे दिसे ग !
हलतो तरूलतात
हा खोडसाळ वात
आलाच वाटते तो
मी सारखी फसे ग !
खुपते तनूस शेज
क्षणही न येत नीज
डोळ्यांस तो दिसावा
हृदयात जो वसे ग !
गीत | - | आत्माराम सावंत |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | माणिक वर्मा |
राग | - | जोग |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
पावा | - | बासरी, वेणु. |
पिसे | - | वेड. |
लता (लतिका) | - | वेली. |
वात | - | वायु. |
शेज | - | अंथरूण. |
गाण्याचं रेकॉर्डिंग नंतर झालं. जेव्हा रेकॉर्डिंग करायचं ठरलं, तेव्हा ठुमरीचा ढंग प्रभावीपणे गाऊ शकणार्या अशा त्या काळातील एकमेव गायिका माणिक वर्मा, त्यांचंच नाव माझ्या डोळ्यांसमोत आलं. त्यांची शास्त्रीय गायनाची तयारी व आवाजाची विशिष्ट लकब यामुळे त्यांनी गायलेलं हे गाणं सहजपणे मनाची पकड घेतं, सुंदर चाल, सुंदर गायन व सुंदत काव्य हा त्रिवेणी संगम या गाण्यात झाला आहे.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
अनेक शास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजवलेल्या, उपशास्त्रीय संगीत प्रकार गायलेल्या आणि सुगम संगीतातली अनेक लोकप्रिय भावगीतं, भक्तीगीते, अभंग ज्यांच्या नावावर आहेत अशा त्यांच्यासारख्या त्याच ! माणसात साधेपणा असावा पण इतकाही नाही की जो त्यांच्यात होता. या साधेपणामुळे कधीकधी असं वाटतं की आपण किती श्रेष्ठ आहोत याची या मोठया लोकांना कल्पनाच नसते बहुतेक. माणिक वर्मांच्या अनेक लोकप्रिय गाण्यातलं एक म्हणजे, 'त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग'. याचे गीतकार आहेत आत्माराम सावंत आणि संगीतकार दशरथ पुजारी.
वसंत वाळुंजकर यांनी शब्दांकित केलेल्या, 'अजून त्या झुडुपांच्या मागे' या दशरथ पुजारींच्या आत्मचरित्रात दशरथ पुजारींनी या गाण्याविषयीची अशी हकीकत सांगितली आहे.
या गीताचे कवी आत्माराम सावंत हे एक नाटककारही होते. त्यांनी त्यांच्याच 'मुलगी' नावाच्या एका नाटकासाठी हे गीत लिहिलं होतं. नाटकाच्या दृश्यातली नायिका तिच्या अदाकारीने हे गीत सादर करते. संगीतकार दशरथ पुजारींनी त्यानुसार उपशास्त्रीय संगीत प्रकारातल्या ठुमरी बाजाची चाल त्या शब्दांना लावली. जेव्हा याच गाण्याची ध्वनिमुद्रिका काढायचं ठरलं तेव्हा अशा ठुमरी बाजातल्या गायिकेचा विचार सुरु झाला. दशरथ पुजारींना अशा बाजासाठी तत्काळ एकच नाव आठवलं, माणिक वर्मा. स्वतः दशरथ पुजारी हे शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना पूर्ण विश्वास होता की अशा ढंगाच्या गायकीला शास्त्रीय बैठक भक्कम असलेल्या परंतु गीताच्या शब्दांना न्याय देणार्या केवळ माणिक वर्माच आहेत. माणिक वर्मांनीही संगीतकाराचा विश्वास सार्थ ठरवला आणि एक गोड भावगीत त्या गायल्या, 'त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग. नकळे मनास आता त्या आवरू कसे ग'
दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर जोडीची जशी सुंदर भावगीते आहेत तशी दशरथ पुजारी–माणिक वर्मा यांचीही अवीट गोडीची भावगीते आहेत. 'जनी नामयाची रंगली कीर्तनी' 'क्षणभर उघड नयन देवा' 'नका विचारू देव कसा' ही त्यातली काही अजरामर गीते. माणिक वर्मांच्या गायकीची एक असामान्य गोष्ट म्हणजे सहजता. त्यांच्या सगळ्या गाण्यांत शास्त्रीय संगीताने सांगितलेले सर्व गायन पैलु, गायकीचे अलंकार आहेत. त्यांत गमक आहे, मींड आहे, खटका आहे, तान आहे, मुरकी तर खूपच आहे. हे सगळं सादर करताना माणिकबाई अतिशय सहजपणे साकारतात, जणू काही त्या आपल्याशी गप्पाच मारताहेत. त्यांचं कुठलही गाणं बघा, त्यांच्या गायकीत कुठलाही अभिनिवेष नसतो. शास्त्रीय संगीताचे खोलवर संस्कार झालेल्या गायकाला असा गळा हलका करून गाणं हे खूप अवघड असतं, पण माणिकबाईंना ते सहज साध्य झालं आणि म्हणून त्यांची गाणी रसिकांना आपली गाणी वाटली, गुणगुणावीशी वाटली. पण गुणगुणणे एवढंच ठीक आहे कारण ती रीतसर गाणं हे खूपच अवघड आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सुगम गायकीत सर्वसाधारणपणे आढळून येणारा उंच स्वराचा किंवा टिपेचा आवाज त्यांचा नव्हता. असं असूनही त्यांच्या नैसर्गिक आवाजाच्या व्याप्तीचा म्हणजे रेंजचा योग्य वापर त्यांनी केला आणि त्यांच्या संगीतकारांनी करून घेतला. त्यांचं गायन जसं सहज तसं त्यांचं वागणं, बोलणंही अतिशय नम्र, ज्याचा खास उल्लेख पुजारीजींनी केला आहे.
अशा या थोर गायिकेविषयी, त्यांच्या गाण्यांविषयी कितीही बोललं तरी ते अपुरच आहे. गाण्यामागच्या या काही गोष्टी महान संगीतकार दशरथ पुजारींनी सांगितल्या आणि वसंत वाळूंजकरांनी त्या शब्दांकित केल्या यासाठी त्यांचे शतशः आभार !
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.