स्वरुपाचे तुटती तारे कडारेकड विजवा पडतिल तुटून
( छबिदार सुरत फांकडी बुंद राखडी जडुन वर खडे
गुंफिली वेणि नागिणि लडा रे गालांवर दोहीकडे )[१]
पान खाउन ओठ करि लाल अंगावर शाल झळकती चुडे
गजगति चाले हळूहळू उरिं ग जोबन उमटले हुडे
वय अटकर बांधा लहान
हरपलों पाहुन भुकतहान
कर अर्पण पंचीप्राण
रणीं ग जाऊं कटून
गगनांत चांदणी ठळक मारिशी झळक उभि ग अंगणीं
किति नटुनथटुन मारिशील छनाछन नैनाच्या संगिणी
झालों घावाविण घायाळ
झोंबला विखारी व्याळ
जणुं टाहो करि कोयाळ
तूं नकळे घालशी माळ
कोणाला गे उठून
( घरिं चला राजअंबिरा गूणगंभिरा पाहिलें कसून
वचनाचा करावा मान करिन सन्मान पलंगी बसून
विठु परशरामाचा नक्षा चहुंकडे दक्ष पहा जा पुसून
गातो रामकृष्ण रामाचे तोड हे मूळ वस्तादापासून
नवशिके ठाउके बेसूर
चाल बदलुन गाती टौर
जशि अक्षतिजेची गौर
काय तिशीं झटून )[१]
गीत | - | शाहीर परशराम |
संगीत | - | नीळकंठ अभ्यंकर |
स्वराविष्कार | - | ∙ विश्वनाथ बागुल ∙ पं. वसंतराव देशपांडे, मधुबाला जव्हेरी ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | स्वरसम्राज्ञी |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत, चित्रगीत |
टीप - • [१] - पं. वसंतरावांच देशपांडे यांच्या स्वराविष्कारातील ओळी. • स्वर- विश्वनाथ बागूल, संगीत- नीळकंठ अभ्यंकर, नाटक- स्वरसम्राज्ञी. • स्वर- पं. वसंतराव देशपांडे, मधुबाला जव्हेरी, संगीत- वसंत पवार, चित्रपट- शाहीर परशराम. |
कोयाळ | - | कोकिळ. |
जोबन | - | तारुण्य. |
टौर | - | उडाणटप्पू. |
नवती | - | तरुणी / तारुण्य / नवी पालवी. |
व्याळ | - | साप. |
विखारी | - | विषारी. |
संगीन | - | व्यवस्थित / मजबूत, पक्का / बंदुकीच्या अग्रभागी लावण्याचे सुर्यासारखे शस्त्र. |
हुडा | - | बुरुज. |
टुमदार कुणाची छान नवति भरज्वान पुसा रे आलि कुठून
स्वरुपाचे तुटती तारे कडारेकड विजवा पडतिल तुटून
छबिदार सुरत फांकडी बुंद राखडी जडुन वर खडे
गुंफिली वेणि नागिणि लडा र गालांवर दोहीकडे
पान खाउन ओठ करि लाल अंगावर शाल झळकती चुडे
गजगति चाले हळु हळू उरिं ग जोबन उमटले हुडे
वय अटकर बांधा लहान
हरपलों पाहुन भुकतहान
कर अर्पण पंचीप्राण
रणीं ग जाऊं कटून
वय बारा-तेरांत ऐन आलि भरांत भुइ ग ठेंगणी
दंडिं बाजुबंद बाहुट्या सर पहुच्या हिरे जडले कंगणीं
गगनांत चांदणी ठळक मारिशी झळक उभि ग अंगणीं
किति नटुनथटुन मारिशील छनाछन नैनाच्या संगिणी
झालों घावाविण घायाळ
झोंबला विखारी व्याळ
जणुं टाहो करि कोयाळ
तूं नकळे घालशी माळ
कोणाला गे उठून
तो दूरदेश बंगाल मुलुख कंगाल गेलों सलासैल आलों करून
नाहिं धनदौलतिला कमी आणिले उंट मालाचे भरून
चाहिल तें माग या घडि देइन बिनधडी ताजवा धरून
तुझे भारोभार देईन सखे खैरात करीन तुजवरून
असा हेत मनामधिं धरून
राहिलों रुपाला भुलून
चार महिने तुजसाठिं ठरून
मजा [सखे] दे पटून
घरिं चला राजअंबिरा गूणगंभिरा पाहिलें कसून
वचनाचा करावा मान करिन सन्मान पलंगी बसून
विठु परशरामाचा नक्ष चहुंकडे दक्ष पहा जा पुसून
गातो रामकृष्ण रामाचे तोड मूळ वस्तादापासून
नवशिके ठाउके बेसूर
चाल बदलुन गाती टौर
घरोघरीं वाजविती डौर
जशि अक्षतिजेची गौर
काय तिशीं रे झटून
संदर्भ-
म. वा. धोंड
मर्हाटी लावणी
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.
परशरामाचा जन्म वावी येथे सन १७५४ झाला असं सांगतात. परशराम अत्यंत वयस्कर होऊन वयाच्या नव्वदाव्या वर्षी वारला. परशरामाचे मृत्यूसमयी सांगितलेले वय जर बरोबर असेल, तर ज्याअर्थी त्याचा मृत्यू इ. स. १८४४ साली झाला, त्याअर्थी त्यांचा जन्म सन १७५४ साली झाला, असे आपणाला म्हणता येईल.
परशराम आपला वडिलोपार्जित शिंप्याचा धंदा करीत होता, असे चरित्रकार सांगतात. 'सुई-दोर्याला हयात' या लावणीतही तो आपल्या पेशाचा उल्लेख करताना दिसतो. परशरामाचे वडील त्याच्या लहानपणीच वारले, असे सांगतात. पण त्यानंतर त्याच्या घरची आर्थिक स्थिती कशी काय होती, हे समजण्यासारखे नाही. परशराम लहानपणी आपला शिंप्याचा व्यवसाय शिकला. तसेच त्याने बाळबोध लिहिण्याचा व वाचण्याचा चांगला अभ्यास केला होता. परशरामाने मराठी महाभारत, रामायण, तुकाराम, नामदेवांच्या रचनांचे वाचन केलेले होते. त्याच्यात बहुश्रुतता होती. तत्कालीन लोककथा व लोकगीतांचा त्याला परिचय होता, परशरामाचा आवडता ग्रंथ ज्ञानेश्वरी होता, असे त्याच्या चरित्रातील कथांवरून दिसते.
वावी जवळच्या मंजूर गावानजिक जंगलात एक विठोभाचे पडके देऊळ होते, त्या देवळात जाऊन त्याने कडकडीत उपोषण केले. त्यावेळी त्याचे वय पंधरा-सोळा वर्षांचे असावे. तिथेच त्याला साक्षात्कार झाला, अशी आख्यायिका आहे. परशराम आपल्या प्रत्येक लावणीच्या शेवटी स्वत:च्या नावाच्या आधी 'नामी विठ्ठल' किंवा 'वरदी विठ्ठल' असा उल्लेख करतो. जंगलात ज्या विठ्ठलाचा साक्षात्कार त्याला झाला, त्या विठ्ठलाविषयी परम आदरभाव दाखविण्यासाठी परशराम असे उल्लेख करतो, असे एका दंतकथेवरून दिसते. दुसर्या एका दंतकथेत परशरामाचा एक मोक्षगुरू कुणी विठ्ठलखत्री किंवा विठोबाखत्री नावाची व्यक्ती होती. तिने परशरामाला लावण्या पोवाडे रचून नामसेवा करण्याचा आदेश दिला. त्यानुसार तो तशी नाममुद्रा वापरत होता.
परशरामाची रहाणी अगदी साधी होती. तो मितभाषी, विनयशील आणि बहुश्रूत होता. निर्व्यसनी आणि परदारा विन्मुख, असे त्याचे चारित्र्य होते. वर्णाने गोरा आणि देखणा होता. वास्तविक तमासगीरपेशा असूनही त्याला कोणते व्यसन नव्हते, हे लोकांच्या दृष्टीने आश्चर्य होते. मोठमोठ्या कार्यक्रमांच्या वेळी तो साधा जाडा भरडा पोशाख करीत असे.
परशरामाने तमाशाचा धंदा तरूण वयात सुरू केला असावा, असे दिसते. स्वत: लावण्या रचित असल्यामुळे रचनेचा प्रश्न त्याच्यापुढे नव्हता. प्रारंभीच्या काळात वीणेच्या साथीवर तो स्वत: लावण्या म्हणत होता. त्याचे गुरू बाबा भागवत यांच्या सहवासाने व संतवाङ्मयाच्या परिशीलनाने त्याच्या काव्यशक्तीला धुमारे फुटले. परशरामाच्या 'वरदी' अधिकारामुळे तो इतर शाहिरात अधिक मान्यता पावू लागला. शाहिरामध्ये कलगीतुरा असे पक्ष असतात. परशराम कलगीवाला असला तरी तो कलगी तुर्याचा समन्वय साधणारा आहे, असे त्याच्या लावणीवरून दिसते. परशराम ज्या परिसरात वावरत होता व आपली लावणी गात होता त्या परिसरात 'विद्वान' म्हणून ओळखला जाणे, अशक्य नव्हते.
परशरामाची लोकप्रियता त्याच्या परिसरात व इतरत्र झपाट्याने वाढत गेली. वीणा हाती घेऊन पदांच्या सुंदर चालीने कर्णमधुर अशा गोड सुरांत तो लावण्या म्हणे. तमाशात स्वत:च्याच लावण्या तो म्हणे. त्याच्या लावण्या ऐकण्यासाठी हजारो लोकांचा जमाव जमत असे. प्रारंभीच्या काळात त्याच्या तमाशात नारयण नाचत असे. नारयणाने पुढे वेगळा तमाशा उभा केला. त्यानंतर भवानी तेली नावाचा पोर्या त्याला मिळाला. त्याच्या आईबापांनी त्याला वावीस दरवर्षी दहा रुपये पगारावर नाचण्याच्या कामी ठेवले. तीन-चार वर्षे नाचण्याचा धंदा केल्यावर तो स्त्रियांची सोंगे आणू लागला. नंतर पुरुषाची सोंगे आणू लागला. असे सांगतात की परशरामाच्या तमाशात पुरुषाने स्त्रीचे सोंग घेण्याची पहिली प्रथा पडली.
तो काळ दुसर्या बाजीरावाचा होता. इ. स. १८०८ साली परशरामाचा तमाशा पुण्यास आला असावा, असे दिसते. कारण परशरामाच्या तमाशातील नाच्या भवानी तेली उर्फ बाकेराव याला ५०० आणि १५०० रुपयांच्या देणग्या बाजीरावाने एका मुठीने दिल्याच्या नोंदी आहेत. व्यक्तिश: परशरामाला काय बक्षीस मिळाले, ते उपलब्ध नाही. श्रीमंत पेशवे सरकार्ची स्वारी एकदा कोपरगावी आली. सगनभाऊ, होनाजीबाळा, धोंडी मेहत्या, बापु डेंग्या, मार्तंड इत्यादी तमासगीर स्वारीबरोबर होते. स्वारीचा मुक्काम बेटात होता. त्रिंबक डेंगळ्याने वावीस जासूस पाठवून परशरामास तमाशासह कोपरगावी बोलावून घेतले. परशराम आल्यावर क्रमाक्रमाने तमाशांची सुरुवात झाली. होनाजी (बाळा) याने गंगेवर केलेल्या लावणीचे एक कडवे तिथे कागदावरून वाचले. परशरामाने गंगेची लावणी करून म्हणून दाखविली.
परशरामाच्या वाङ्मयीन गुणविशेषासंबंधी विचार करता, त्याला अपूर्व कल्पनाशक्ती वा भाषा वैभव होते, असे म्हणता येणार नाही. तो सांकेतिक परिभाषा व कल्पनांचा खेळ फारसा करत नाही. तो वास्तव लोकजीवनाशी समरस झालेला आहे. त्यामुळे त्याची चित्रे वास्त्वाशी प्रामाणिक आहेत. त्यामुळे ती कृत्रिम न वाटता अधिकच जिवंत वाटतात.
लावणीत शृंगाररस प्रधान लावण्यांचे प्रमाण अधिक, हे सर्वश्रुत आहे. तारुण्याने मुसमुसलेली लावणीतील स्त्री, तिचे हावभाव, शृंगारचेष्टा हे लावणीचे खास आकर्षण. परशरामाने लावणीत रेखाटलेली स्त्री अनेक रूपात आणि अनेक अवस्थेत दिसते.
अशीच एक युवती नटूनथटून चाललेली आहे. तिच्या दर्शनाने घायाळ झालेला एक इच्छुक वर्णन करतो,
टुमदार कुणाची छान नवति भरज्वान पुसा रे आलि कुठून
स्वरुपाचे तुटती तारे कडारेकड विजवा पडतिल तुटून
परशरामाची नेमके चित्ररेखाटण्याची ताकद आपल्या लक्षात येते. भाषेला प्रसादगुण लाभला आहे. शब्द उच्चारल्याबरोबर अर्थ उलगडत जातो. वाद्याच्या नादात हावभावासह ही रचना गायली गेली असेल, त्यावेळी प्रेक्षकांची मने जिंकली असतील, यात शंका नाही. परशराम थोडक्या शब्दांत किती सांगून जातो पहा-
गगनांत चांदणी ठळक मारिशी झळक उभि ग अंगणीं
किति नटुनथटुन मारिशील छनाछन नैनाच्या संगिणी
(संपादित)
गंगाधर नारायण मोरजे
'शाहीर वरदी परशराम' या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- देवीलक्ष्मी प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.