A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझ्या एका हाकेसाठी

तुझ्या एका हाकेसाठी । किती बघावी रे वाट ।
माझी अधीरता मोठी । तुझे मौनही अफाट ॥

तुझ्या एका हाकेसाठी । कान जिवाचे करीते ।
सारी कपाटे शब्दांची । रोज रोज धुंडाळिते ॥

तुझ्या एका हाकेसाठी । उभी कधीची दारात ।
तुझी चाहूलही नाही । होते माझीच वरात ॥

तुझ्या एका हाकेसाठी । हाक मीच का घालावी ।
सात सुरांची आरास । मीच मांडून मोडावी ॥

आले दिशा ओलांडून । दिली सोडून रहाटी ।
दंगा दारात हा माझा । तुझ्या एका हाकेसाठी ॥