A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तिथे नांदे शंभू कैलासाचा

बारा पुण्यक्षेत्री बारा लिंगे बारा ज्योती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

दक्षशापे चंद्र पुरा कोमेजला
शिवकृपायोगे पुन्हा तेजाळला
ज्योतिर्लिंग हे पहिले, ब्रह्मदेवे स्थापियले
सोरटीचा सोमनाथ नामें याची ख्याती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

श्रीशैल गिरीशिखरी शिवतेज वास करी
सती चंद्रावतीसाठी इथे आले उमापती
शैलमल्लिकार्जुन गुण भक्तजन गाती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

दैत्य दूषण करी निर्दाळन हुंकाराने त्रिपुरारी
तोच रुद्र सहज होय गवळ्याचा कैवारी
तोच सांब झालासे महाकालेश्वर क्षिप्राकाठी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

ॐकार होऊन ये चंद्रमौली
विंध्याद्रीची कामना पूर्ण झाली
ॐकार तो जाण हा अमलेश्वर, हीच जाण शिवकुटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

रावणासी फसवुनी गजानने वसविले, ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ
देवांचेही धन्वंतरी ज्याच्यामधे प्रवेशले, ते हे ज्योतिर्लिंग वैजनाथ
छायेपरी जिथे आहे संगती पार्वती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

भीमनामे दानवाने बह्मदेवाच्या वराने
केले सार्‍या जगतासी त्राही त्राही त्राही
संहाराया त्या दैत्यासी घेई भीमस्वरुपासी
हर विश्व व्यापुनिया राही राही राही
भीमाशंकराचे ठायी नदी भीमा जन्म घेई
वनी डाकिनी या शंकराच्या अभिषेकासाठी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

जानकीने रचियले
वालुका लिंग हे श्रीरामाने स्थापियले
भाविकास साधकास नित्‌ देत आस
उभा सेतुबंधी रामेश्वरतटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

ब्रह्मवाणी ठरू नये खोटी याच्यासाठी इथे शिव भस्मसात झाले हो
त्याच भस्मातून फिरुनिया तेजाळून तिथे ज्योतिर्लिंग प्रकटले हो
अंघा नागनाथ जाणा वसे सदा येथ नागजनासाठी, तेच तया त्रिकाळी पूजिती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

कैलास सोडून ये सांब भोळा
भुलला कसा या वाराणशीला?
विश्वेश्वर शिवक्षेत्र सदैव स्मर
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

गोदावरीतटी एका ठायी नांदताती तिघे, ब्रह्मा विष्णु महेश
वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीस
भक्त लोटती भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास
त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

गंगाधरा, गिरिजावरा, अभयंकरा, नित्‌ त्या स्मरा
केदारनाथ, कर्पूरगौर, शिवनीलकंठ सूख शांती देत
भवदु:ख दूर करी विश्वनाथ, केदारनाथ केदारनाथ
परतत्त्व येथ पावेल शांती
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती

श्री घॄष्णेश्वर वेरूळ गावी, काय तयाची महती गावी
विरह न साहे कैलासाला, लेणे होऊन समीप आला
ग्रहणकाली शिवपावनवेडी शिवभक्तांची दाटी
तिथे नांदे शंभू कैलासाचा पती