A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
थांब सुमंता थांबवि

राम चालले, तो तर सत्पथ
थांब सुमंता, थांबवि रे रथ

थांबा रामा, थांब जानकी
चरणधूळ द्या धरूं मस्तकीं
काय घडे हें आज अकल्पित !

रामराज्य या पुरीं यायचें
स्वप्‍न लोचनीं अजून कालचें
अवचित झाले भग्‍न मनोरथ

गगननील हे, उषःप्रभा ही
श्रीरघुनंदन, सीतामाई
चवदा वर्षें का अस्तंगत?

चवदा वर्षें छत्रहीनतां
चवदा वर्षें रात्रच आतां
उरेल नगरी का ही मूर्च्छित?

कुठें लपे ती दुष्ट कैकयी?
पहा म्हणावें हीन दशा ही
अनर्थ नच हा, तुझेंच चेष्टित

करि भरतातें नृप मातोश्री
रामा मागें निघे जयश्री
आज अयोध्या प्रथम पराजित

पिताहि मूर्च्छित, मूर्च्छित माता
सोडुन रामा, कोठें जातां?
सवें न्या तरी नगर निराश्रित

ये अश्रूंचा पट डोळ्यांवर
कोठें रथ तो? कोठें रघुवर
गळ्यांत रुतली वाणी कंपित