A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तळव्यावर मेंदीचा अजून

तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोला

गायिलेस डोळ्यांनी एक निळे गाणे
बट हळवी वार्‍यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला

पवनातुनी शीतलता दाटुनिया आली
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदे धुंद धुंद झाला

ही दुपार भिजलेली प्रीत चांदण्यात
मिटुनी पंख खग निवांत शांत तरूलतांत
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला