A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुटलेला अंबाडा बांधू दे

सुटलेला अंबाडा बांधू दे सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे सावरिया.

ओठावर लदबदली गुणगुण सावरिया
हलकीशी पैंजणात किलबिल सावरिया.

चळत चाळ पायाशी, गीत बिलग ओठांशी
घागर्‍यास सोसेना वारा रे सावरिया.
माझ्या कवितेचं आणि मंगेशकरांच्या संगीताचं नातं खूपच घट्ट. काही काळ थांबलो तरी मधेच केव्हातरी लहर येते आणि 'प्रभुकुंज'वरून फोन येतो. 'नवीन काही करूया.'

बोलताना मधेच काही गीतांच्या ओळी लतादीदींनी गाऊन दाखवल्या. त्या अगदी नव्या घाटाच्या, लोकगीताच्या वळणाच्या होत्या.
शक्कर का गारा बंधाई दे शिपाईजान
जिलबी की खिडकी बंधाई दे शिपाईजान

आणखी त्यांच्या आजीने गायलेल्या लोकजीवनातल्या लयीच्या काही ओळी. मला त्या साध्या लयीच्या पण गोड वाटल्या. संगीतशास्त्र कळत नाही तरी एकदा, पुन्हा एकदा ऐकल्यावर मी लिहू शकलो. तंतोतंत लिहू शकतो, असा आजवरचा अनुभव होता.
कथ्थक नृत्य, त्याजवळ जाणारं स्त्री-पुरुष दोघांचं एकत्र नृत्य मी एक-दोन कार्यक्रमात पाहिलं होतं. लावणीसारखं नाही. शृंगारचं, प्रीतीचं दोघांचं नृत्य. तशी कल्पना करून तेच दीदींनी सांगितलेलं वजन, चाल घेऊन व मला हवा तसा मोड देऊन मी कविता लिहिली-
सुटलेला अंबाडा बांधू दे सावरिया
चाफ्याची शुभ्र फुले माळ रे सावरिया.
(संपादित)

ना. धों. महानोर
कवितेतून गाण्याकडे
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.