दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला
शिवप्रभूंची नजर फिरे अन् उठे मुलुख सारा
दिशा दिशा भेदीत धावल्या खड्गाच्या धारा
हे तुफान स्वातंत्र्याचे
हे उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र विजांचे
काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला
कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानांतुनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला खडा चौघडा झडे
शिंगांच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे
हे संजीवन प्राणांचे
हे रूप शक्तियुक्तीचे
हा तेजाचा झोत उफाळुन सृष्टीतून आला
गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशांतुन आल्या
शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
धिमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयांतुनी उमटला हर्षे जयजयकार
प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज
'शिवछत्रपतींचा जय हो !'
'श्रीजगदंबेचा जय हो !'
'या भरतभूमीचा जय हो !'
जयजयकारांतुनी उजळल्या शतकांच्या माला
गीत | - | शंकर वैद्य |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | लता मंगेशकर |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत, प्रभो शिवाजीराजा |
अरुण | - | तांबुस / पिंगट / पहाट, पहाटेचा तांबुस प्रकाश / सूर्यसारथी / सूर्य. |
कपार | - | खबदड. |
चिरा | - | बांधकामाचा दगड. |
ललकार | - | चढा स्वर / गर्जना. |
संजीवन | - | पुनुरुज्जीवन. |
वर्ष १९७४. सुरुवातीचे काही महिने सरले होते. शिवप्रेमींना आस लागली होती, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशेव्या राज्याभिषेक दिनाची. दि ६ जून रोजी काही कार्यक्रम, उपक्रम करावेत या प्रयत्नात अनेक जण होते. आपापल्या परीने कल्पना मांडत होते. आमचंही मंथन सुरू होतं. अशातच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मला सुचवलं की, या औचित्याने आपण छत्रपतींच्या इतिहासावर काहीतरी कार्यक्रम करू या. मी त्यांना महटलं, की कल्पना चांगली आहे; परंतु एक कार्यक्रम सादर करून उपयोग नाही. लोक विसरून जाणार. त्यापेक्षा शिवचरित्राचं कथन करणारी गीतं आपण करू. बाबासाहेबांनी ती कल्पना उचलून धरली. या चर्चेतून या ध्वनिफितीचं बीज रोवलं गेलं. त्यानंतर आम्ही सगळे झपाटल्यागत कामास लागलो.
मात्र, या ध्वनिफितीसाठी अनुरूप काव्य, गीतं शोधून काढणं हे कठीण काम होतं. मी एरवीही चांगल्या काव्यासाठी आग्रही व चोखंदळ असतो. इथे तर शिवचरित्राचा विषय होता. या कामी आमच्या मदतीला धावून आले ते गो. नी. दाण्डेकर. बाबासाहेबांप्रमाणे गो. नी. दाण्डेकर यांचाही मंगेशकर परिवाराशी स्नेह होता. गोनीदांचा व्यासंग मोठा. त्यामुळे या कामी मी त्यांना विनंती केली. शिवचरित्रामधील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित संतांनी-कवींनी जे लिहिलं असेल, त्यातील निवडक रचना निवडण्यास त्यांना सांगितलं. गोनीदांनी अल्पावधीतच मला १० गीतं दिली. त्या सर्व रचना उत्तमोत्तम होत्या.
यातील 'हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा' हे गीत मी आधीच निश्चित केलं होतं. स्वा. सावरकरांनी १९५७-५८ च्या सुमारास 'सागरा प्राण तळमळला' आणि 'हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा' या त्यांच्या दोन कविता मला स्वरबद्ध करण्यासाठी दिल्या होत्या. त्यातील 'सागरा प्राण तळमळला' ही कविता ध्वनिमुद्रित झाली होती. हे 'हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा' या कवितेसाठी मात्र योग जुळून येत नव्हता. तो 'शिवकल्याण राजा'च्या निमित्ताने साधला गेला. या गीताचा संदर्भ शिवकालीन नाही. तरीही त्यासाठी मी विशेष जागा निर्माण केली.
गोनीदांनी निवडलेल्या रचनांवर नजर टाकली तरी या ध्वनिफितीची श्रीमंती लक्षात यावी. समर्थ रामदास स्वामी यांच्या तीन रचना ('प्राणिमात्र झाले दु:खी', 'आनंदवनभुवनी' आणि 'निश्चयाचा महामेरू'), कवी भूषण यांच्या दोन कविता ('कुंद कहा पयवृंद कहा' आणि 'इंद्र जिमी जंभपर'), स्वा. सावरकर यांच्या दोन रचना ('जयदेव जयदेव जय जय शिवराया' आणि 'हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजीराजा'), राम गणेश गडकरी यांनी रचलेली 'गुणी बाळ असा' ही अंगाई आणि कुसुमाग्रज यांच्या 'सरणार कधी रण' व 'वेडात मराठे वीर दौडले सात' या दोन कविता- यांचा यामध्ये समावेश होता. कवी भूषण लिखित 'शिवा बावनी' मधील दोन रचना यात निवडल्या होत्या; मात्र त्यांचा अर्थ जाणून घेणं सोपं नव्हतं. हा अर्थ आम्हाला उलगडून सांगितला तो इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांनी.
संतमंडळी, तसंच जुन्या काळातील कवींनी नेहमीच छंद, वृत्त आदीचं भान राखून लेखन केलं आहे. त्यांच्या रचना स्वरबद्ध करताना निराळं समाधान लाभतं. या सर्व रचनांमध्येही ही वैशिष्ट्यं होती. या प्रत्येक गीताचा भाव, शिवचरित्रातील त्याचं स्थान विचारात घेऊन मी त्यांना साजेशा सुरावटी दिल्या. यातील वेगवेगळ्या प्रसंगांच्या नानाविध भावभावनांना परिपूर्ण न्याय देऊ शकेल, असा एकमेच स्वर म्हणजे लता मंगेशकर असल्याने, ही सर्व गाणी दीदीच गाईल, हे मी सुरुवातीलाच ठरवलं होतं, आणि निवेदनासाठी बाबासाहेबांना पर्याय नव्हता.
अशाप्रकारे आमचं अर्धअधिक काम पूर्ण झालं. आता प्रश्न होता तो ध्वनिमुद्रणाचा. या ध्वनिफितीचं काम खंडित स्वरूपात होऊ नये, असं आमचं सर्वांचंच मत होतं. त्यामुळे आम्ही एच.एम.व्हीकडून एक महिन्यासाठी स्टुडिओ मागून घेतला आणि प्रत्यक्ष ध्वनिमुद्रण सुरु झालं. संत, कवींच्या उत्कट रचना, त्यास अनुरूप चाली, बाबासाहेबांचं ओजस्वी निवेदन, दीदीचा दिव्य स्वर, कोरस, वाद्यमेळ यामुळे स्टुडिओतच भारावलेपण जाणवत होतं. एका पाठोपाठ एक गीत ध्वनिमुद्रित होत गेली. दीदीचे मोठेपण पुन्हा एकदा अधोरेखित झालं, 'जयदेव जयदेव जय जय शिवराया' या आरतीमधील आर्त साद, 'गुणी बाळ असा' या अंगाईमधील हळुवारपणा 'हे हिंदू नृसिंहा' यातील वीरश्रीची भावना, 'सरणार कधी रण' या काव्यातील व्यथितता, 'वेडात मराठे वीर दौडले सात' यामधील त्वेष, 'निश्वयाचा महामेरू' या रचनेतील धीरगंभीरता.. या विविध भावछटा तिच्या गळयातून सहज साकारल्या. दीदीने या गीतांना वेगळीच उंची दिली, यात शंका नाही.
ही दहा गीतं हातावेगळी झाल्यानंतर एक पेच निर्माण झाला. शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगाचं एकही गीत त्यात नव्हतं. गोनीदांनी जी गीतं निवडली त्यामध्ये तसं गीत त्यांना गवसलं नाही. त्यामुळे या ध्वनिफितीच्या मूळ संकल्पनेनुसार ते गीत यात असणारच नव्हतं. परंतु बाबासाहेब त्या गीतासाठी आग्रही होते. अगदी हटूनच बसले होते म्हणा. या ध्वनिफितीतील अन्य काव्यं जुन्या काळातील असल्याने आता नव्याने हे गीत कोणाकडून लिहून घ्यायला नको, असं माझं मत होतं. मात्र बाबासाहेव ऐकेनात. त्यांचा आग्रह पाहून मी तयार झालो. परंतु ते गीत लिहिणार कोण, हा प्रश्न होताच. बाबासाहेबांनी काही जुनी गीतं शोधली.
परंतु त्यातील एकही गीत मला भावलं नाही. शेवटी मी शांता शेळके यांना विचारलं, मात्र त्या याला नाही म्हणाल्या. मग स्वतः बाबासाहेबांनी एक गीत लिहिलं. परंतु तेही मला रुचलं नाही. आमच्या हातात केवळ एक दिवस होता. कारण दुसर्या दिवशी दीदी लंडन दौर्यावर जाणार होती. अखेर मी शंकर वैद्य यांना विनंती केली व कोण्त्याही स्थितीत या प्रसंगावर गीत लिहा, असं सांगितलं. त्यांनी रात्री बैठक जमवली व पहाटे ते गीत पूर्ण केलं. ती अप्रतिम रचना होती- 'शतकांच्या यज्ञांतून उठली एक केशरी ज्वाला, दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला..'
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे स्टुडिओत जमलो. आधी ध्वनिमुद्रित झालेल्या गीतांचे संकलन, बाबासाहेबांचं निवेदन व गीतांच्या कालावधीचा ताळमेळ, राज्याभिषेकाच्या गीताच्या कोरसची जमवाजमव, या सर्व कामात मी एवढा व्यग्र होतो की वैद्यांनी लिहिलेल्या गीतास स्वरबद्ध करण्याएवढा वेळ माइयाकडे नव्हता. त्यामुळे आमच्यासह स्टुडिओत उपस्थित असणारे माझे संगीतकार मित्र श्रीनिवास खळे यांना मी त्या गीतास चाल लावण्याची विनंती केली. खळ्यांनीही त्या गीतास लगेच सुंदररीत्या स्वरबद्ध केलं, ही आठवण मी इथे आवर्जून सांगू इच्छितो. दीदीनं ते गीत गायलं व ती विमानतळाच्या दिशेने गेलीही. अशाप्रकारे ती ध्वनिफीत पूर्ण झाली.
या ध्वनिफीतीच्या कव्हरसाठी आमच्या उषाताईने सुंदर चित्र काढलं आणि ध्वनिफितीचे नामकरण केलं ते लतादीदीने. 'निष्चयाचा महामेरू' या शिवस्तुतीच्या अखेरीस सलग तीनदा येणारे 'शिवकल्याण राजा' हे विशेषणच या ध्वनिफीतीसाठी योग्य आहे, असे तिनं सुचवलं. तिची ही कल्पना एकमताने मान्य झाली.
बाबासाहेबांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित दादरच्या शिवाजी उद्यानात एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात या ध्वनिफितीचं अनावरण करण्यात आलं. ही गीतं कमालीची गाजली. या ध्वनिफितीने शिवप्रेमींच्या मनात जे विशेष स्थान निर्माण केलं ते आजतागायत अढळ आहे. ही गीतं ५० वर्षानंतरही रोमांचकारी वाटतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज:पुंज व्यक्तिमत्त्व, त्यांचे असामान्य कर्तृत्व या ध्वनिफितीच्या माध्यमातून आम्ही सादर करू शकलो, याचं समाधान जगावेगळे आहे. या स्मृतीचे मूल्य शब्दातीत आहे.
(संपादित)
हृदयनाथ मंगेशकर
(मुलाखत व शब्दांकन अनिरुद्ध भातखंडे)
सौजन्य- दै. महाराष्ट्र टाइम्स (२ जून, २०२४)
(छापील आवृत्ती, मुंबई)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.