A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शांत हो श्रीगुरुदत्ता

शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां ॥

तूं केवळ माता जनिता, सर्वथा तूं हितकर्ता ।
तूं आप्तस्वजन भ्राता, सर्वथा तूंचि त्राता ।
भयकर्ता तूं भयहर्ता, दंडधर्ता तूं परिपाता ।
तुजवांचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥

अपराधास्तव गुरुनाथा, जरि दंडा धरिसी यथार्था ।
तरि आम्हीं गाउनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा ।
तूं तथापि दंडिसि देवा, कोणाचा मग करुं धावा ।
सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥

तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि, आम्हांवरि नच संतापी ।
गच्छतः स्खलनं क्वापि, असें मानुनी नच होऊ कोपी ।
निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ॥

तव पदरीं असता त्राता, आडमार्गीं पाउल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता ।
निज बिरुदा आणुनि चित्ता, तूं पतितपावन दत्ता ।
वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तू गुरुदत्ता ॥

सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हें घरदार ।
तव पदी अर्पूं असार । संसाराहित हा भार ।
परि हरिसी करुणासिंधो, तूं दीनानाथ सुबंधो ।
आम्हां अघ लेश न बाधो । वासुदेव-प्रार्थित दत्ता ॥
गीत - श्री टेंबे महाराज
संगीत -
स्वर- आर‌. एन्‌. पराडकर
गीत प्रकार - दिगंबरा दिगंबरा, भक्तीगीत
अघ - पाप.
असार - नीरस / निष्फळ / पोकळ / नि:सत्त्व.
आर्त - दु:ख, पीडा.
ओपणे - अर्पण करणे / विकणे.
क्वापि - कुठेतरी.
जनिता - निर्माणकरता, बाप.
'शांत हो श्रीगुरुदत्ता' ही करुणा त्रिपदी टेंबे (प. प. श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी महाराज) स्वामींना का लिहावी लागली? वाचा त्यामागील गोष्ट !

श्रीदत्तगुरुंकडे करुणा भाकताना आपसूक करुणा त्रिदपीचे शब्द ओठावर येतात. ती का आणि कोणत्या अवस्थेत लिहिली व म्हटली गेली ते पाहणे महत्त्वाचे.

आपण मंदिरात देव दर्शनाला जातो, पण ते सोडून सगळ्या चुकीच्या, वाईट गोष्टींकडे लक्ष देत बसतो. ज्या सोयी सुविधा नाहीत त्याबद्दल बोलतो. जिथे तामझाम असेल तिथे त्या प्रशस्ततेचे कौतुक करतो आणि या नादात ज्याच्या ओढीने आलो आहोत त्या भगवंताच्या दर्शनाला दुय्यम स्थान देतो. मात्र तिथे जे जसे आहे, जे काही घडते आहे ते सर्व देवाच्या साक्षीने घडत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ते लक्षात ठेवले तर आपले लक्ष इतरत्र न जाता फक्त देवदर्शनाकडे जाईल आणि अन्य गोष्टी दुय्यम वाटू लागतील. याबाबतीत प. पु. श्री टेंबे स्वामी यांच्या बाबतीत घडलेला प्रसंग सांगितला जातो तो असा-

एकदा श्री टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता, कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले. प्रसादाचे ताट पाहून तेथील पुजार्‍याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्य भरलेले ताट त्वरित खाल्ले. तेंव्हा श्री टेंबे स्वामी फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पूजेस बसले.

पूजा संपल्यावर, 'श्री गुरु दत्तात्रेयांना' गाभार्‍यातून निघून जाताना त्यांनी पाहिले. त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्तात्रेयांनी दर्शन दिले नाही. ते बैचेन झाले. त्यांना कळले, मी पुजार्‍याला टाकून बोललो म्हणून श्री गुरु दत्तात्रेयांना राग आला असणार ! तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तसेच त्यांच्या मुखातून करुणा त्रिपदीचे बोल बाहेर पडले.

शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता

करुणा त्रिपदीचे हे बोल ऐकून श्री गुरु दत्तात्रेय श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले. तेव्हा श्री टेंबे स्वामी म्हणाले, "देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. तुला नैवेद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजार्‍याने तो खाऊन टाकला."

तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनी प्रश्न केला, "इथे सत्ता कोणाची?"

ह्या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, "देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते."

त्यावर श्री गुरु दत्तात्रेय म्हणाले, अरे, तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता, त्याच्यासाठी मी ते ताट पाठवले होते. ते त्याने खाल्ले. त्यात तुझे काय गेले? त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्तात्रेय अंतर्धान पावले.

या अध्यात्मिक मार्गात प्रामाणिकपणे वाटचाल करणार्‍या माणसाची देवाकडून, गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे. टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते. एका रागामुळे त्यांची ही अवस्था झाली. आपण तर सामान्य माणसं. आपण जर राग आवरु शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते.

आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी, त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते, तिथे काय घडते ते पाहू नये. तिथे चालणार्‍या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते. मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते. ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते, तेथे सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा.
(संपादित)

सौजन्य- दै. लोकसत्ता (९ नोव्हेंबर २०२३)
(Referenced page was accessed on 05 August 2024)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.