A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शंभो शंकरा करुणाकरा

शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा

अंधार हा लोपवा
द्यावा प्रकाश नवा
चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा, हे शिवा

सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो
हे भवतारक दु:खनिवारी शंभो

संमार्जिली अंगणे
पान्हावली गोधने
आसावला आसमंत अमृताने चिंब नाहवा, हे शिवा

सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो
हे भवतारक दु:खनिवारी शंभो

तू आपदा वारणारा
तू दु:खिता तारणारा
होई कृपावंत विश्वातले आर्त अभयंकरा शांतवा, हे शिवा

सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो
हे भवतारक दु:खनिवारी शंभो
अभयंकर - शंकराचे एक नाव.
आर्त - दु:ख, पीडा.
आसवणे - आतुर, उत्सुक, आशायुक्त.
चेतवणे - उद्दीपित करणे, पेटवणे.
त्रिपुरारी - दैत्य तारकासुराच्या पुत्रांनी- तारकाक्ष, कमलाक्ष व विद्युन्माली यांनी ३ अभेद्य शहरे ब्रह्मदेवाकडून मागून घेतली. ती सोने, रूपे व लोखंड यांची असून आकाश, अंतरिक्ष व पृथ्वी यावर अनुक्रमे व फिरती असत. तिन्ही मिळून त्रिपुर. ती शंकराने जाळली. म्हणून त्रिपुरारी.
भव - संसार.
शंभु - शंकर
संमार्जन - झाडणे / साफ करणे.
सांब - शंकर / भोळा मनुष्य.
दिग्‍दर्शक कमलाकर तोरणे यांच्या 'थोरली जाऊ' या चित्रपटात एक भूपाळी हवी होती. राम आणि कृष्णांना वर्षानुवर्ष जागवणार्‍या भूपाळ्या असंख्य आहेत. ते बहुधा कुंभकर्णाचे वडील भाऊच असले पाहिजेत. तेव्हा जागवण्यासाठी दुसरं एखादं दैवत शोधावं; कारण झोपलेल्या दैवतांची आपल्याकडे मुळीच वानवा नाही, असा एक विचार पुढे आला. तेव्हा शंकराची भूपाळी करायची कल्पना निघाली. तो खरं तर एक 'डेंजरस गेम !' रामकृष्णांची गोष्ट वेगळी. एक परम शांत तर दुसरा परम खेळकर. पण ह्या संतापी, अष्टौप्रहर तृतीय नेत्र नावाचं अण्वास्त्र जवळ ठेवणार्‍या दैवताशी खेळ होता. संताप सोडा, पण 'नजर'चुकीनेही त्याने नेहमीचे डोळे निद्रिस्त ठेवून कपाळावरची ती ज्वलंत स्टेपनी उघडली तर काय घ्या ! पण गाणं निर्विघ्‍न पार पडलं.. ह्या शीघ्रकोपींच्या विघ्‍नहर्त्या चिरंजिवांची कृपा.. दुसरं काय ! ह्यातला गमतीचा भाग सोडा, गाणं चांगलं होण्याचं मुख्य श्रेय संगीतकारांचंच. कारण भूपाळी प्रकरणात कवीला अधिक काम नसतं. संबोधन फक्त बदलायचं. बाकीचा मजकूर ठरलेलाच असतो.
(संपादित)

सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.