A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सर्पफणीवर कृष्ण नाचला

सर्पफणीवर कृष्ण नाचला यमुनेच्या डोही
अशी अलौकिक कथा कुणी कधी ऐकलीच नाही !

कालिंदीच्या पात्री होता डोह एक गूढ
त्याच्या विषयी भयद वदंता जनी होत्या रूढ
कालिया नामक नाग सकुल त्या जलाशयी राही !

बळीभद्राविण कृष्ण एकटा सवंगड्यासंगे
मुरली-वादन-क्रिडा यातच वनांतरी रंगे
निदाघसमयी चुकल्या कोठे वत्सासह गायी?

त्या गायी तर तृषार्त होत्या यमुनेवर गेल्या
काळ्या डोहावरी पोचल्या तृषार्तची मेल्या
धुंडायास्तव त्यास उडाली गोपांची घाई

गायीपाठी गोपबाळही त्या स्थळी गेले
जे गेले ते कृष्ण सवंगडी नदीतटी मेले
पाठीराखा कृष्ण दुरून हे मृत्यूसत्र पाही

कास घातली पीताम्बराची, अधर धरी ना ती
दंड थोपटी बाल मल्ल तो थक्क दिशा होती
सवेग चढला कदंबवृक्षी जळी उडी घेई

कृष्ण बुडाला कृष्ण बुडाला, व्रजी वार्ता आली
ऐकताच ते माय यशोदा मूर्छितसी झाली
राम-रोहिणी नंदाच्या ही बळ नुरले पायी

आणि अचानक जलपृष्ठावर चमत्कार झाला
सूर्यबिंबसे दिसले श्रीमुख, गोपसखा आला
अमृतदर्शन होता उठले वत्स-गोप-गायी