A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मागूं नको सख्या जें

मागूं नको सख्या जें माझे न राहिलेलें;
ते एक स्वप्‍न होतें स्वप्‍नांत पाहिलेलें.

स्वप्‍नांतल्या करांनी स्वप्‍नातल्या तुला मीं
होतें न सांग का रे सर्वस्व वाहिलेलें?

स्वप्‍नांत वाहिलेलें म्हणुनी कसें असत्य?
स्वप्‍नास सत्य असतें सामील जाहलेलें.

स्वप्‍नांतल्या परीला स्वप्‍नांत फक्त पंख;
दिवसास पाय पंगू अन्‌ हात शापिलेले.

स्वप्‍नांतल्या परीला स्वप्‍नांत ठेवुनी जा;
हे नेत्र घेउनी जा स्वप्‍नांत नाहलेले.

जा नेत्र घेउनी जा स्वप्‍नांध पांगळीचे;
आतां पाहावयाचें कांही न राहिलेलें !
गीत - विंदा करंदीकर
संगीत - यशवंत देव
स्वर- पद्मजा फेणाणी-जोगळेकर
अल्बम - ही शुभ्र फुलांची ज्वाला
गीत प्रकार - कविता, कल्‍पनेचा कुंचला
  
टीप -
• काव्य रचना - १९६३.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  पद्मजा फेणाणी-जोगळेकर