A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सांग सख्या रे

सांग सख्या रे आहे का ती अजून तैशीच गर्द राईपरी?

सांग सख्या रे अजून का डोळ्यांतून तिचीया झुलते अंबर?
सांग अजूनही निजेभोवती तिच्या रातराणीचे अस्तर?
सांग अजूनही तशीच का ती अस्मानीच्या निळाईपरी?

फुले स्पर्शता येते का रे अजून बोटांमधुनी थरथर?
तिच्या स्वरांनी होते का रे सांज अवेळी अजून कातर?
अजूनही ती घुमते का रे वेळूमधल्या धुंद शिळेपरी?

वयास वळणावर नेणारा घाट तिचा तो अजून का रे?
सलज्‍ज हिरव्या कवितेजैसा थाट तिचा तो अजून का रे?
अजून का ती जाळत जाते रान कोवळे जणू वणव्यापरी?

सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळूपरी,
आणिक उमटुन गेली होती लाली अवघ्या तारुण्यावरी;
तिने ठेवला आहे का रे जपून क्षण तो मोरपिसापरी?

अता बोलणे आणि वागणे यातील फरकाइतुके अंतर-
पडले, तरीही जाणवते मज कवितेमधुनी तिचीच थरथर !
सांग तिला मी आठवतो का तिजवर रचलेल्या कवितेपरी?