कर्मयोगी श्री संत सावता माळी
श्री संत सावता महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रभावळीतील समकालीन महान संत होते. 'कर्मे इशू भजावा ।' या माउलींच्या ओवीप्रमाणे जीवन जगणारे होते. त्यांचा काल साधारणपणे इ.स. १२५० ते समाधी इ.स.१२९५ असा मानला जातो. अरण, तालुका-माढा, जिल्हा-सोलापूर हे त्यांचे गाव होय. सावता माळी यांनी आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगात वापरले आहेत. लोकभाषेचा वापर केला तरच या सामान्य समाजाला तत्त्वज्ञानाची उमज येते, अन्यथा ते बोजड होते. तत्कालीन मराठी काव्यामध्ये, भाषेत नव्या शब्दांची, नव्या अलंकाराची भर पडली. सावता महाराजांचे अभंग काशीबा गुरव यांनी लिहून ठेवले.
'साव' म्हणजे शुद्ध, पवित्र. महाराज नावाप्रमाणे होते. 'स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयाव: ॥' या गीतेतील श्लोकाप्रमाणे त्यांची जीवनशैली होती. आपल्या वाट्याला आलेले कर्म यथासांग करावे, त्यात टाळाटाळ करणे म्हणजे अधर्म होय. म्हणून त्यांनी कधीही पंढरपूरची वारीही केली नाही. कारण अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. 'वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी' ही त्यांची प्रतिज्ञा होती. 'स्वकर्मात व्हावे रत । मोक्ष मिळे हातो हात ।' 'सावत्याने केला मळा । विठ्ठल देखियला डोळा ।' अनासक्त वृत्तीने, ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो. 'प्रपंच साधूंनी परमार्थ केला । तो नर भला भला रे भला भला ॥', असे एका कवीने म्हटले आहे. ते सावता महाराजांच्या जीवनात यथार्थ लागू पडते. यातून त्यांची जीवननिष्ठा दिसून येते. छांदोग्य उपनिषदात नारद-सनत्कुमारांच्या संवादात असे म्हटले आहे कि 'यो वै भूमा तत्सुखं नाल्पे सुखमस्ति, भूमैव सुखं भूमा त्वेव विजिज्ञासितव्य: ।'. व्यापकत्वातच सुख आहे. अल्पत्वत सुख नसते आणि व्यापक एक ब्रह्म आहे. तदभिन्न सर्व मिथ्या असते. तो परमात्मा सर्वत्र आहे. फक्त तशी दृष्टी असावी लागते. प्रत्येक भूतमात्रात एक भगवंतच आहे. हे एकदा कळले कि मग त्याने मंदिरात जावो अथवा न जावो. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात, 'मग तू राहे भलत्या ठायी । जनी वनी खाटे भुई ॥'. तो कुठेही राहिला तरी त्याच्या जीवन्मुक्तीमध्ये काहीही फरक पडत नाही. वारी करूनही जर आत्मदृष्टी आली नाही तर ती वारी म्हणजे फक्त येरझार ठरते. 'मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव । देव अशाने भेटायचा नाही रं । देव बाजाराचा भाजीपाला नाही रं ॥' हे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे म्हणणे एकदम खरे आहे, म्हणून सावता महाराज पंढरीला गेले नाही व त्यांना ती आवश्यकताही नव्हती. त्यांनी तो भाव त्यांच्या अभंगात प्रगट केला आहे.
'सावताने केला मळा, विठ्ठल पायी गोविला मळा ॥' माळ्याच्या जातीत जन्माला आलेलो आहे. आमचे कर्तव्य म्हणजे शेती करणे, शेतकरी खरे तर अन्नदाता आहे. तो बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवतो व प्रथम प्राधान्य शेतीला देतो. अगदी तुकाराम महाराजही म्हणतात, 'मढे झाकोनिया करिती पेरणी । कुणबियाची वाणी लवलाही ॥' कर्तव्य कर्म चुकवायचे नाही, ही संतांची ग्वाही आहे. सावता महाराजांनी शांतीररूपी शेवंती फुलवली, प्रेमरूपी जाई उगविली, लसूण-मिरची-कोथंबीरीमध्ये त्यांनी त्या व्यापक हरीला पाहिले. त्यांची पंढरी व्यापक होती. एकद्देशी नव्हती. तुका म्हणे, 'आम्हा ब्रह्माण्ड पंढरी ।'. सावता महाराजांनी जसा भौतिक मळा केला तसाच अध्यत्मिक क्षेत्रात भक्तीचा मळा केला व जगाला व्यापकत्वाचा आदर्श घालून दिला. ही त्यांची प्रतिभा अनुभूती होती. त्यामुळे त्यांना पंढरीला जाण्याची आवश्यकता नव्हती. अंधश्रद्धा त्यांनी मोडीत काढली. बळी देण्याची प्रथा त्यांनी बंद करायला लावली. सावता महाराजांच्या मळ्यात ज्ञानेश्वर महाराज व नामदेव महाराज आदि तत्कालीन सर्व संत यायचे व तेथे संत मेळावा भरायचा. अध्यात्मिक सवांद व्हावयाचे. नामदेव महाराजांचे कीर्तन महाराजांच्या मळ्यात होत होते. त्या सर्वांचा एकोपा होता. कोणत्याही प्रकारचा भेद नव्हता. किंबहुना शांतीचा संदेश या संत मेळाव्यातून जात असे. आता मात्र संत सुद्धा एकत्र येणे अवघड होत आहे. विविध पक्षाचे सुद्धा संत महंत झाले आहेत, हे दुर्दैव आहे.
भगवतगीतेमध्ये म्हंटले आहे, 'सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।' (२/३८) अगदी याचप्रमाणे सावता महाराज जीवनाचा सहज सोपा सिद्धांत सांगतात,
समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥१॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥१॥
कोणे दिवशीं बसून याचीं मन । कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य ।
कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण । कोठें साठवावें ॥ २ ॥
कोणे दिवशीं यम येती चालून । कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।
कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन । एकटें रहावें ॥ ३ ॥
कोणे दिवशीं होईल सद्गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥
तुकाराम महाराजही हेच सांगतात. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ॥' संतांची सर्वत्र एकवाक्यता असते. परंतु आता मात्र समाजात चित्र वेगळे दिसू लागले आहे. जातीयवाद भयानक वाढला आहे. सर्व क्षेत्रात जातीभेदाच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. अगदी संतांना सुद्धा जातीजातीमध्ये विभागून ठेवले आहे, हे विदारक आहे. 'संत दिसती वेगळालेले । परी ते स्वरूपी मिळाले ॥' वारकरी संतांनी एकात्मकतेचा संदेश दिला आहे.
श्री संत शिरोमणी सावता महाराज वयाची ४५ वर्षे या अवनितालावर राहिले व त्यांनी इ. स. १२९५ साली आषाढ कृ. १४(१०-८-१८) या दिवशी निजधाम गमन केले. अशा या कर्मयोगी महात्म्याला अंनत कोटी दंडवत.
(संपादित)
भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले
सौजन्य- दै. लोकमत
(Referenced page was accessed on 05 February 2023)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख