A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सखी एकलेपणाचा चल संपवू

सखी एकलेपणाचा चल संपवू सहारा
उत्फुल्ल यौवनाचा फुलबाग ये बहारा

हातात हात घेता फुलती गुलाब गाली
देती लबाड डोळे शब्दाविना इशारा

मुखचंद्र हासता भरती मनास येते
सांगे रहस्य सारे अंगावरी शहारा
त्यावेळी, म्हणजे ६० च्या दशकात नवीन नाटकं येत होती. संगीताच्या दृष्टीने सुद्धा जुन्या 'सौभद्र', 'स्वयंवर'पेक्षा वेगळं संगीत घेऊन ही नवीन नाटकं आली होती. 'कट्यार काळजात घुसली', 'हे बंध रेशमाचे', 'पाणिग्रहण', 'स्वरसम्राज्ञी', 'बावनखणी', अशी नाटकं येत होती आणि रंगभूमी चालूच होती.

जुन्या नाटकातलं संगीत हे कर्नाटकी संगीतातून आणि साक्या, दिंड्या, आर्या यातून निर्माण झालेलं होतं. त्याचप्रमाणे उत्तर हिंदुस्थानी गझल, बंदिशी, ठुमरी यावर ते आधारित असे. त्याचा पाया शुद्ध शास्त्रीय संगीताचा होता. तोच आधार कायम ठेवून पण त्याच्यामध्ये स्वतःची भर घालून नवीन नाटकांमध्ये संगीत दिलं गेलं. पाया मात्र पूर्ण शास्त्रीयच होता. बंदिशीप्रमाणे गायकी बदलत होती. हा होणारा बदल जाणवत होता. काळानुसार हा बदल अपरिहार्य असल्याने नवीन नाटकातल्या संगीताचा बाज बदलला पण मूळ पाया मात्र शास्त्रीयच राहिला.

या काळात पं. जितेंद्र अभिषेकी खूप कार्यरत होते. त्यांनी स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं आहे. मराठी नाट्य संगीतामध्ये त्यांना टाळून पुढे जाताच येणार नाही. त्यांच्या गायकीचा विचार केला तर पाया जुनाच होता पण त्यात स्वतःच्या सर्जनशीलतेची भर घालून त्यांनी वेगळी गायकी निर्माण केली, जी अतिशय आकर्षक, लालित्यपूर्ण, लोकांच्या हृदयाला भिडणारी होती. त्यामुळे अभिषेकीबुवांनी स्वतःचं युग निर्माण केलं, असं म्हणता येईल.

हे झालं संगीताच्या बाबतीत. पद रचनेच्या बाबतीतही मी असं म्हणेन की खूप बदल झाले. रूढार्थाने नाटककार नसलेल्या किंवा नाट्यपदं न लिहिणार्‍या लोकांनी त्याकाळी नाट्यपदं लिहिली. उदाहरणच द्यायचं तर शांताबाई शेळके यांनी 'हे बंध रेशमाचे' नाटकासाठी पदरचना केली. अशी पदरचना 'एकच प्याला' नाटकासाठी वि. सी. गुर्जर यांनीही केली होती. म्हणजे नाटककार एक आणि पदारचनाकार वेगळा. कथानकाला अनुरूप अशी पदरचना शांताबाईंनी केली. मुळातच त्या उत्कृष्ट कवयित्री होत्या. कथानकात नेमक्या कुठल्या प्रसंगाच्या वेळी पद हवं आहे, हे त्यांनी जाणून घेतलं. कथानक आणि त्यातले प्रवेश याचा अभ्यास केला आणि त्यानुसार पदं लिहिली. ती उत्तम ठरली.

त्याचप्रमाणे प्र. के. अत्रे यांनी सुद्धा त्याकाळी वैविध्यपूर्ण नाटकं रंगभूमीवर आणली. अत्र्यांचंच १९४६ सालचं 'पाणिग्रहण' हे नाटक, १९७१ साली अत्रे थिएटर्सने रंगभूमीवर पुनरुज्जीवित केलं. पदं अत्र्यांचीच होती. फक्त एकच 'सखी एकलेपणाचा' हे पद वसंत बापटांचं आहे. संगीतकार म्हणून त्यांनी श्रीनिवास खळे यांना पाचारण केलं. नवीन संचातल्या पाणिग्रहण नाटकाला खळ्यांच्या भावगीत अंगाच्या चाली आहेत. त्यामुळे या नाटकातल्या पदांच्या चाली वेगळ्या झाल्या आहेत.
(संपादित)

बकुळ पंडित
संगीत रंगभूमीचा मागोवा- स्वरनाट्य रसगंगा (अर्चना साने, यशश्री पुणेकर)
(शतकोत्तर रौप्य महोत्सव, विशेष प्रकाशन)
सौजन्य- भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.