A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रुणझुणत्या पांखरा (२)

रुणझुणत्या पांखरा, तू जा माझ्या माहेरा !

सांग जा आईला, तू सांग जा भाईला
सांग जा वहिनीला, तू सांग जा बहिणीला
गुणाची मी गुणवंती आवडते भरतारा !

चांदीच्या तोड्यांत बाई, चंदेरी साड्यांत
चौसोपी वाड्यात मी हिंडते माड्यांत
आनंदी ग नणंदा, माझा मायाळू सासरा !

हौसेने वागते मी, सेवेला जागते
गोडीनं नांदते मी सुख सारे भोगते
रुणझुणत्या पांखरा, तू जा माझ्या माहेरा !