सावधान होई मनुजा काळ चालला रे
दोन दिवस जीवन प्राण्या, दोन घडी ज्वानी
सौख्य जाण अळवावरचे चमकदार पाणी
जरठ काळ येता सारा खेळ संपला रे
गीत | - | जगदीश दळवी |
संगीत | - | सी. रामचंद्र |
स्वर | - | विश्वनाथ बागुल |
नाटक | - | लावणी भुललि अभंगाला |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
ईश्वर व्यक्ति नसून अनुभूति आहे. जिचें कोणतेंहि केंद्र नाहीं, जी सर्व सत्ता आहे. आणि सर्व सत्ता हेंच जिचे केंद्र आहे. अशा सर्वंकष प्रेमाची दिव्य अनुभूति म्हणजेच ईश्वर.
चंद्रयुगाच्या उंबरड्यावर उभें राहून मागे वळून पाहिले कीं विज्ञानाची प्रचंड प्रगति नजरेंत भरते, तर पुढें पाहिले कीं विज्ञानाच्या मर्यादाहि तितक्याच स्पष्टपणें जाणवू लागतात. आजचा मानव गोंधळलेला, दिशाहिन झालेला आहे. आपला आत्मा हरवून बसला आहे. कुठें जायचें याचा त्याला विसर पडला आहे. पण या त्याच्या विस्मृतीतच उद्याच्या आध्यात्मिक उत्क्रांतिची बीजें अनस्यूत आहेत.
शृंगार विरुद्ध आध्यात्म, असा संघर्ष योजून लावणी आणि अभंग याच्या माध्यमानें नाट्यप्रसंगाची निर्मिती आणि खुलावट करणें हे माझ्या सारख्या लेखकाच्या आवाक्या बाहेरचेंच काम ! पण प्रस्तुत विषयाची माझ्या मनावरची पकड मला स्वस्थ बसूं देईना. शिवाय ज्यांना ज्यांना मी ही कल्पना बोलून दाखविली त्यांनींहि याबद्दल आपली मुक्तपसंती दर्शविली. त्यामुळेंच हा आव्हानात्मक विषय हाताळण्याचें माझ्या हातून धाडस घडलें.
या नाटकाची कथा ऐतिहासिक असल्याचा लेखकाचा दावा नाहीं. तरीहि विषयाच्या मांडणीसाठी पेशवे कालीन परिस्थितीच्या आधाराने संभाव्य प्रसंग कल्पून नाट्यनिर्मिति केली आहे. नाटक व त्यांतील गाणी लिहून झाल्यावर त्यावर पुनर्संस्कार करतांना सुप्रसिद्ध नाट्यलेखक व दिग्दर्शक श्री. मो. ग. रांगणेकर आणि ख्यातनाम संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यानीं नाट्यविषयांत विशेष रूचि आणि जिव्हाळा प्रगट करून सौंदर्यवृद्धीसाठी अनेक स्थळेंहि दाखवून दिली. त्यापैकी माझ्या मर्यादित शब्दसामर्थ्याच्या पकडीत मला जेवढी पकडता आली तेवढ्यानाच मी शब्दरूप देऊ शकलो. या दोन मान्यवर आणि मातबर कलावंताचे माझ्यावरील ऋण शब्दातीत आहे.
नाटक यशस्वी करण्यासाठी अविश्रांत मेहनत करणार्या सर्व कलावंताना, सहकार्यांना व नेहमीच माझ्या नाटकाचे सहर्ष स्वागत करण्यार्या रसिकांना त्रिवार मुजरा करीत म्हणतो, असाच कृपालोभ असू द्यावा.
(संपादित)
जगदीश दळवी
दि. १५ फेब्रुवारी १९७२
'लावणी भुललि अभंगाला' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथामावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- ललित नाट्य प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.