A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रानारानांत गेलि बाइ शीळ

रानारानांत गेलि बाइ शीळ !

राया, तुला रे, काळयेळ नाहीं !
राया, तुला रे, ताळमेळ नाहीं !
थोर, राया, तुझं रे, कुळशीळ !

वाहे झरा ग झुळझुळ वाणी;
तिथं वार्‍याचिं गोडगोड गाणीं :
तिथं राया, तुं उभा असशील !

तिथं रायाचे पिकले मळे;
वरी आकाश शोभे निळे :
शरदाच्या ढगाचि त्याला झील

येड्यावानी फिरे रानोवना :
जसा कांही ग मोहन कान्हा !
हासे, जसा ग राम घननीळ !
गीत - ना. घ. देशपांडे
संगीत - जी. एन्‌. जोशी
स्वर- जी. एन्‌. जोशी
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- सप्‍टेंबर १९२९.
झील - तेज / चकाकी.
भावगीत गायनाच्या सुरूवातीला नाटयसंगीताचा बराच प्रभाव चालींवरती होता. नाटकात, बोलपटात काम करणारीच मंडळी यात असल्याने हे साहजिकच होतं. पुरुष गायकच सुरुवातीला होते. गोविंद नारायण जोशी (१९०६ - १९९४) हे मुळचे विदर्भातले, खामगावचे ! जी. एन. जोशी म्हणूनच ते ओळखले जात. पुणे व नागपूर इथे शिकून बी.ए. आणि एल.एल.बी. होऊन मुंबईस आले. वकिली सोडून कलेच्या क्षेत्रात रमले. शिकत असतांनाच नाटकांतून काम करण्याची मोठीच हौस त्यांना होती. गाण्याची आवड व तालीम लहानपणापासूनच मिळालेली. विदर्भातल्याच मेहेकर येथील ना. घ. देशपांडे ह्यांनी सप्टेंबर १९२९ मध्ये 'शीळ' ही कविता लिहिली. पारंपरिक चालीमध्ये जी. एन. जोशी आपल्या जलशांत, गाण्याच्या कार्यक्रमात ती म्हणत असत. रेडियोवर ही गात असत. एका बैठकीत ग्रामोफोन कंपनीच्या रमाकांत रुपजी ह्यांनी हे काव्यगायन ऐकले व ध्वनिमुद्रणासाठी आमंत्रण दिलं. दोन गाणी मुद्रित करायची असं ठरलं होतं. सायंकाळी चार वाजता सुरु झालेलं ध्वनिमुद्रण पहाटे चारला संपलं व आठ गाणी झाली.

'शीळ' गाणं १९३१ पासून घरोघर जावून पोहोचलं. जी. एन. जोशी ह्या एका गाण्यामुळे लोकप्रिय झाले. ग्रामोफोन कंपनीनं त्यांना मानानं नोकरी दिली. पुढे त्यांनी अनेक गाणी केली. शास्त्रीय, सुगम व भावगीतांच्या पन्‍नासेक ध्वनिमुद्रिका (शंभर गाणी) त्यांनी १९५० पर्यंत केल्या. प्रत्येक रेकॉर्डच्या लेबलवरती 'जी. एन. जोशी, बी.ए.एल.एल.बी.' असं छापलेलं आढळतं. गंगुबाई हनगळ, सरोज बोरकर ह्यांच्याबरोबर ते द्वंद्वगीते गायले. 'डोळे हे जुल्मी गडे', 'प्रेम कोणीही करेना, कां अशी फिर्याद खोटी', 'आलात ते कशाला, प्रिय जाहला कशाला', 'फार नको वाकू जरि उंच बांधा', 'गोरी धीरे चलो', 'जाके मथुरा या कान्हाने', 'अजहून आये श्याम' ही त्यातली काही गाजलेली गाणी.

कंपनीचे अधिकारी या नात्यानं त्यांनी सुमारे चाळीस वर्षे अनेकांची ध्वनीमुद्रणं केली. त्या अनुभवांचं एक पुस्तक - 'स्वरगंगेच्या तीरी' लिहिलं. त्याचं इंग्रजी रुपांतरही प्रकाशित झालं. ह्या पुस्तकात ह्या 'शीळ' गाण्याविषयी पहिलं प्रकरण लिहिलं आहे. हे एक ग्रामीण प्रेमी जीवांचं प्रणयगीत आहे. खेडयातलं वातावरण हूबेहूब उभं केलं आहे. शहरी व ग्रामीण भागातल्या लोकांना हे गीत खूपच आवडलं. इतक्या प्रांजळपणानं ग्रामीण भागातील तरुणीनं प्रथमच आपली प्रेम भावना कवितेमधून व्यक्त केली असावी. गंमतीची गोष्ट म्हणजे हे गाणं स्त्रीच्या आवाजात मुद्रित व्हायला हवं होतं, पण झालं मात्र पुरुषाच्या आवाजात ! अर्थात स्त्रियांच्या भूमिका पुरुषांनीच करायच्या त्या काळात हे कुणाला खटकलं सुद्धा नाही.
(संपादित)

सुरेश चांदवणकर
सौजन्य- marathiworld.com
(Referenced page was accessed on 28 August 2016)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.