A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रम्य ही स्वर्गाहून लंका

रम्य ही स्वर्गाहून लंका
हिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादविती डंका

सुवर्णकमलापरी ही नगरी
फुलून दरवळे निळ्या सागरी
त्या कमलावर चंद्र निजकरे करितो अभिषेका

लक्ष्मी-लंका दोघी भगिनी
उभय उपजल्या या जलधितुनी
या लंकेचे दासीपद तरी कमला घेईल का?
कमला - लक्ष्मी.
जलधी - समुद्र.
मी त्या वेळी वाडिया ब्रदर्स, मुंबई या चित्रपट संस्थेसाठी 'स्वयंवर झाले सीतेचे' हे चित्र दिग्दर्शित करीत होतो. या चित्राचे लेखक, गीतकार ग. दि. माडगूळकर होते आणि संगीत वसंत देसाई यांचे. या चित्रपटात रावणाची भूमिका महत्त्वपूर्ण होती. रावण हा ऋषीकुमार, सर्व विद्येत पारंगत होता. शस्त्रास्त्र शास्त्रात तो निपुण होता. गायनाचा त्याला शौक होता. त्याने तो उत्तम जोपासला होता. रावणाच्या तोंडी 'गदिमां'नी एक गीत लिहिले होते. अहंमन्य रावण या गीतात लंकेच्या ऐश्वर्याचे आणि ताकदीचे वर्णन करतो. रावणाचे हे गीत - 'रम्य ही स्वर्गाहून लंका' - भीमसेन जोशींसारख्या दमदार आवाजाच्या गायकाकडून गाऊन घ्यावे, असे होमी वाडिया, वसंत देसाई आणि मी ठरवले.

भीमसेन जोशींशी बोलणी करण्याचा सर्व अधिकार होमीशेठनी मला दिला. मी पुण्याला भीमसेन जोशींच्या घरी गेलो. समोर एका खुर्चीत भीमसेन बसले होते.
त्यांनी विचारले, "काय बाबा?" "वाडिया ब्रदर्ससाठी मी 'स्वयंवर झाले सीतेचे' हा चित्रपट दिग्दर्शित करत आहे. त्यातील रावण या व्यक्तिरेखेच्या तोंडी एक गीत आहे- "रम्य ही स्वर्गाहून लंका, ते आपण गावेत अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे." "गीत कोणी लिहिले आहे?" "ग. दि. माडगूळकरांनी. संगीत वसंत देसाई यांचे आहे." भीमसेनजी थोडा वेळ गप्प बसले. मग म्हणाले, "मला या गाण्याचे दीड हजार रुपये मिळाले तर मी गाईन."

भीमसेनजींच्या दमदार आवाजाची आणि आकर्षक गायनाची मला पूर्ण जाण होती. मी भीमसेनजींना दोन हजार दिले जातील, असे वचन दिले. भीमसेनजींच्या चेहर्‍यावरील चिंतेचं झाकोळ थोडं कमी झालं. त्यांना कसली चिंता होती, हे मात्र मी विचारले नाही. नंतर मला कळले, त्यांच्या पत्‍नी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या.

"रेकॉर्डिंगची तारीख कळव, मी मुंबईला येईन." असे म्हणून ते खुर्चीवरून उठले आणि स्वयंपाकघराकडे गेले.

रेकॉर्डिंगची तारिख ठरली. होमी वाडियांची फियाट गाडी घेऊन मी पुण्याला आलो आणि दुसर्‍या दिवशी सकाळी नऊ वाजता मुंबईतील दादर भागातील, पोर्तुगीज चर्चजवळील 'बॉम्बे लॅब'च्या रेकॉर्डिंग रूममध्ये पोहोचलो. वसंत देसाई आणि होमी वाडियांनी भीमसेनजींचे स्वागत केले. मी समोर पाहिले. रेकॉर्डिंग हॉलमध्ये पांढर्‍या शुभ्र गादी, तक्क्या, लोड यांच्या बैठकी चौफेर घातल्या होत्या. मी भीमसेनजींना गाण्याचा कागद दिला. वसंत देसाई म्हणाले, "मी बांधलेली चाल आपल्याला म्हणून दाखवतो." असे म्हणून वसंतरावांनी वाद्यमेळाला हात वर करून इशारा केला. वाद्ये वाजू लागली. वसंतरावांनी ध्रुपद आणि अंतर्‍याची चाल ऐकवली. भीमसेनजी त्या गीताच्या कागदाकडे लक्षपूर्वक पाहत तीन-चार मिनिटे चिंतनात गुंतून गेले. नंतर त्यांनी वसंत देसाईंकडे पाहिले आणि म्हणाले, "मी एकदा गाऊन दाखवतो, काही सुधारणा असल्यास सांगावी."
गीताच्या कागदाकडे पाहत भीमसेनजी बारीक आवाजात स्वत:शीच गुणगुणू लागले.

होमीसेठचे सर्व कुटुंबीय, वसंत देसाईंचे गानक्षेत्रातील अनेक मित्र भीमसेनजींकडे टक लावून बघत होते. भीमसेनजींचे गुणगुणणे थांबले आणि हात वर करून ते वसंत देसाईंना म्हणाले, "तुमचा वाद्यमेळा सुरू करा, मी गीत म्हणून दाखवतो." वाद्यमेळा वाजू लागला आणि भीमसेनजी आपल्या दमदार आवाजात गाऊ लागले-
"रम्य ही स्वर्गाहून लंका,
हिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादविती डंका"

भीमसेनजींनी बघता बघता त्या गीतावर आपला कब्जा केला आणि संपूर्ण गीत त्यांनी ताना, पलटांसह गाऊन दाखविले. भोवताली बसलेल्या सर्व रसिक श्रोत्यांकडून "वाहवा ! वाहवा !" असा गजर झाला. वसंत देसाई पुढे झाले आणि त्यांनी भीमसेनजींशी हात मिळवले आणि म्हणाले, "व्वा, क्या बात है, रेकॉर्डिंग करूया?"
भीमसेनजी म्हणाले, "आणखी काही सुधारणा हव्यात का?"
वसंतरावांनी भीमसेनजींच्या हातात पुन्हा हात मिळवत सांगितले, "उत्तम गायलात आपण, दहा-पंधरा मिनिटांच्या विश्रांतीनंतर आपण गाणं रेकॉर्ड करू."

भीमसेनजी आसनावरून उठले त्यांनी मला जवळ बोलावले आणि म्हणाले, "चल बाबा आपण दहा -पंधरा मिनिटं चक्कर मारून येऊ." मी भीमसेनजींच्या बरोबर लिफ्टपर्यंत गेलो, तोच वसंतरावांनी हाक मारली. जवळ येऊन त्यांनी खुणेनेच मला सुचवले- भीमसेनजींना रोख. अजिबात घेऊ देऊ नकोस. मी मानेनेच आश्वासन दिले आणि भीमसेनजींबरोबर खाली रस्त्यावर आलो. ते तरातरा चालत पोर्तुगीज चर्चजवळ गेले. एका बोळात शिरले, एका घराशी आले. मी विचारले, "इकडे कुणाकडे जायचे?" त्यांनी उत्तर दिले नाही. माझा हात पकडून ते जिना चढू लागले. त्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरील एका दाराशी ते थांबले. मी भीमसेनजींचा हात धरत म्हणालो, "आपल्याला दहा-पंधरा मिनिटांत गाणे रेकॉर्ड करायचे आहे. तुम्ही काही घ्यायचं नाही."

"तू चूप रे, मला नको शिकवूस…" म्हणत भीमसेनजींनी समाधानी चेहर्‍याने त्यांना हवे ते केले. मग जॅकेटच्या खिशातील गाण्याचा कागद समोर धरून ते गुणगुणू लागले- "रम्य ही स्वर्गाहून लंका." हातवारे करत भीमसेनजी ते गाणं आपल्या घशावर ठसवत राहिले. मी पुन्हा त्यांचा हात धरला आणि म्हणालो, "गाण्याच्या रेकॉर्डिंगमध्ये काही घोटाळा झाला तर माझी आणि वसंत देसाईंची नाचक्की होईल."
तेव्हा ते दिलखुलास हसले. म्हणाले, "नाचक्की झाली तर माझी होईल." असं म्हणून ते उठले. म्हणाले, "चलो बाबा, तू चिंता मत कर." आम्ही एका पानाच्या ठेल्यापाशी थांबलो. भीमसेनजींनी उत्तम पान जमवले. सातारी जर्दा तोंडात टाकला. खरं तर मी मनोमन अस्वस्थ झालो होतो. आता गाण्याच्या रेकॉर्डिंगचे काय होणार, याची मला चिंता लागून राहिली होती.

आम्ही लिफ्टने रेकॉर्डिंग रूममध्ये आलो. वसंत देसाई सामोरे आले. त्यांच्या सगळं लक्षात आलंच. भीमसेनजी चालत बैठकीकडे गेले. वसंतराव थोड्या दबक्या आवाजात मला रागातच म्हणाले, "शेवटी व्हायचं ते झालं ना? तू त्यांना अडवलं का नाहीस?" तेवढ्यात बैठकीत माईकसमोर बसलेल्या भीमसेननी मोठा आवाज दिला, "वसंतराव, चला, गाणं रेकॉर्ड करा." वसंत देसाईंनी सगळया वादकांना इशारा केला आणि वाद्यमेळा वाजू लागला. भीमसेनजीनी आपल्या खड्या दमदार आवाजात गायला सुरुवात केली.
'रम्य ही स्वर्गाहून लंका…'

बघता बघता भीमसेनजी गाण्यात एवढे गुंगून गेले की सर्व रसिक श्रोते, वसंत देसाई आणि मी अचंब्याने गानसमाधीत व्यस्त असलेल्या भीमसेनजींकडे पाहतच राहिलो. भीमसेनजी एका दमात ते गीत गाऊन पुरे केले. रेकॉडिर्स्ट शर्माने हात वर करून 'इट्स ओके!', असे सांगितले. भोवतीच्या सर्व रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

भीमसेनजी नम्रपणे म्हणाले, "तुमच्या दृष्टीने हे गाणे ओके असले तरी मी पुन्हा गातो. एक अंतरा थोडा वेगळेपणाने गायचा आहे. तुम्हाला आवडेल तो 'टेक' वापरा", असे म्हणून भीमसेनजी पुन्हा खाली मान घालून गुणगुणू लागले. वसंतरावांनी पुन्हा वाद्यमेळ्याला हात केला. आणि त्याच जोशात आपल्या दमदार आवाजाने भीमसेनजीने दुसरा टेक पूर्ण केला. पुन्हा रसिक श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. वाडियाशेठनी पुढं होऊन भीमसेनजींच्या गळ्यात गुलाबाचा हार घातला. भीमसेनजींच्या दमदार गाण्याच्या सुगंधाने सर्व रसिकवृंद मुग्ध झाला होता. त्यांच्या मघाच्या कृतीचा कुठेही मागमूस नव्हता. सर्व रसिकांनी भीमसेनजींच्या भोवती गर्दी केली. अभिनंदनाचा वर्षाव केला. तेव्हा भीमसेन म्हणाले, "आपण आपल्या जागेवर बसा. मला थोडे गायचे आहे." त्यांनी वसंतराव देसाईंना आणि तबलजी आचरेकरांना खुणावलं. वसंतराव हामोर्निअम वाजवायला बसले. आचरेकर तबल्यावर बारीक आवाजात ठेका धरत तबल्याच्या खुंट्या पिळू लागले. भीमसेनजींनी स्वर ठीक लागला, असं खुणावलं. 'बाबुल मोरा' ही भैरवी त्यांनी गायला सुरुवात केली. या गाण्यात ते एवढे रंगून गेले, की रसिकांना आपण कुठे आहोत तेच कळेना. जवळपास पाऊणतास भीमसेनजी ही भैरवी गात राहिले. सारा श्रोतृवर्ग धुंद होऊन गेला. भीमसेनी स्वरसुगंधाने सारा रसिकवृंद मोहून गेला होता. वसंतराव देसाईंनी भीमसेनजींना गळा मिठी मारली. पाणावलेल्या डोळ्यांनी वसंतराव म्हणाले, "माझ्या गीतबांधणीचं चीज केलंत आपण." भीमसेनजींनी सर्वांच्याकडे हास्यमुदेने पाहिले. बटवा काढून डाव्या हातावर तंबाखू घेतली, चुन्याने मळली आणि तोंडात टाकली. सर्वांना हात जोडत ते म्हणाले, "आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा." लिफ्टपाशी आल्यावर वसंत देसाईंनी माझ्या हातात एक पाकिट दिले. ते भीमसेनजींना द्यायला सांगितले. आम्ही गाडीपाशी आलो. भीमसेनजी आणि मी गाडीत बसलो. त्यांनी ते पाकीट उघडले आणि पैशाकडे पाहून मला म्हणाले, "अरे, हे पैसे जास्त आहेत. आपले दोन हजारच ठरले होते. हे तर पाच हजार आहेत. यातले तीन हजार वर परत करून ये बघू." "अहो भीमसेनजी, तुम्ही गाणं रेकॉर्ड करून झाल्यानंतर 'बाबुल मोरा' ही भैरवी जवळपास तासभर गायलात आणि रसिकांना गुंगवून टाकलेत. वाडियाशेठनी हे अधिकचे पैसे आपल्या गाण्यावर मोहित होऊन… ''

"नाही, मी गायलो ते माझ्या हौसेसाठी. जा, हे पैसे परत करून ये…" भीमसेनजी म्हणाले.
मी वर येऊन वाडियाजींना भीमसेनजींचे म्हणणे सांगितले, तेव्हा ते म्हणाले, "बाबा, हे तीन हजार तुझ्याजवळच राहू देत. पुण्याला त्यांना पोहोचवेपर्यंत तू त्यांच्या मिनतवार्‍या कर आणि त्यांना हे अधिकचे पैसे घ्यायला लाव. यातच आम्हा सर्वांना आनंद आहे." मी अनेक तर्‍हेने भीमसेनजींना विनवले; पण त्यांनी ते अधिकचे पैसे नाकारले. खरं तर त्यांच्या घरात अडचण होती. त्यांची पत्‍नी हॉस्पिटलमध्ये होती. पण नाही, त्या सच्च्या कलावंताने मला शेवटपर्यंत नकार दिला.

सच्च्या स्वरांचा, पक्क्या शब्दांचा तो 'स्वरभास्कर' आज आपल्यात नाही; पण त्यांचे स्वर गगन भरून गुंजत राहतील आणि आपले कान तृप्त होतील !
(संपादित)

म. गो. उर्फ बाबा पाठक
सौजन्य- दै. महाराष्ट्र टाईम्स (३० जानेवारी, २०११)
(Referenced page was accessed on 17 April 2022)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.