'मृण्मयी' ही इंदिरा संतांची सर्वाधिक प्रसिद्ध कविता आहे. कारण अनेक रसिकांनी, अभ्यासकांनी आणि समीक्षकांनी या कवितेचे सौंदर्य उलगडून पाहण्याचे प्रयत्न केलेले दिसतात. काव्यविषयक खाजगी चर्चांमधून, इतकेच नव्हे तर खाजगी पत्रव्यवहारांतूनही या कवितासंबंधाने बोलले, लिहिले गेले आहे. चित्रकार द. ग. गोडसे यांना कवितेच्या निर्मितिप्रक्रियेचा पुन:पुन्हा वेध घ्यावासा वाटला आहे. कारण या कवितेला एक रूपसौष्ठव आहे. ती नवनवीन लोभसवाणी दर्शने देत राहते आणि आस्वादकांना स्वत:कडे खेचत असते.
रक्तात मातीची ओढ आहे आणि मनास मातीचे ताजेपण आहे. याचे मुख्य कारण आपले अस्तित्व मातीतून उगवून वर आलेले आहे. आपले जीवन मातीचे आहे आणि मातीप्रमाणेच ते अपुरे म्हणजे विकासोन्मुख आहे.
माती ऋतुचक्र झेलत असते आणि त्या त्या ऋतूत स्वत:चा असा एक आविष्कार घडवीत असते. वर्षाऋतूत ती स्नानसमाधीत मग्न होते तर शरद ऋतूत ती दंवात भिजलेल्या प्राजक्तासारखी निथळत राहते. वसंत ऋतूमध्ये सर्वत्र फुललेली फुले ती अंगावर परिधान करते आणि ग्रीष्म ऋतूत आपला कचभार उदवून घेते, विजेचा केवडा वेणीवर तिरकस माळते. जणू प्रत्येक ऋतुला अनुकूल अशी क्रीडा ही मृण्मयी करत असते. एखाद्या रमणीने मनसोक्त स्नान करावे, मग आपले शरीर निथळत स्वत:च स्वत:च्या शरीराचे हलकेफुलकेपण अनुभवावे, हळुवारपणे अंग टिपावे, उंची वस्त्रप्रावरणे ल्यावीत, न्हाऊन मोकळा सोडलेला आपला केशसंभार नाजुकपणे उदवावा, सुरेख वेणी घालून तिच्यावर केवडा माळावा.. अशी साश्रूंगाराची क्रीडामालिका येथे गुंफली गेली आहे. एवढे झाल्यावर ती 'स्व' कडून 'तू' कडे वळते. नुसती वळते नव्हे तर -
आणिक तुझिया लाख स्मृतीचे
खेळवीत पदरांत काजवे,
उभें राहुनी असें अधांतरिं
तुजला ध्यावें, तुजला ध्यावें
अशा रीतीने प्रणयातील पूर्वस्मृतींशी खेळत त्याच्याच - आपल्या प्रियकराच्या ध्यानात निमग्न होते.
शेवटच्या कडव्यातील 'अधांतरि' हा शब्दप्रयोग अनेक आस्वादकांना वेगवेगळ्या स्वरूपाचे अर्थदान करताना दिसतो. प्रणयोत्सुक नवोढेने आपले 'मी'पण सोडले आहे आणि अपेक्षित असा प्रणयक्षण अद्यापि यावयाचा आहे, या दरम्यानचा अवकाश 'अधांतरि' या शब्दाने टिपला आहे, असे म्हणता येईल.
"इंदिराबाईंच्या प्रेमकवितेत प्रियकराचे चित्र नेहमीच धूसर, अस्पष्ट असते. त्यांची कविता मुख्यत: केंद्रित होते ती 'प्रेयसी'वर" हा प्रा. रमेश तेंडुलकरांचा अभिप्राय याही कवितेला जसाच्या तसा लागू होतो.
या कवितेत ऋतुचक्र फिरवलेले असले तरी शिशिर ऋतू येत नाही. याचे एक अत्यंत अन्वर्थक उत्तर डॉ. म. सु. पाटील यांनी शोधिलेले आहे. ते लिहितात, "येथील 'मी'ला आपले धरतीशी असलेले नाते जणू अंतर्ज्ञानाने प्रतीत होते. आपल्याला निसर्गाची इतकी ओढ का, याचा अन्वयार्थ 'मी'ला नव्याने लागतो. पुढे वर्षा, शरद, हेमंत, वसंत आणि ग्रीष्म या ऋतूंच्या बदलत्या चक्रानुसार 'मी'ची बदलती रूपे येतात. ती 'मी' एकीकडे स्त्री आहे आणि दुसरीकडे धरतीही आहे. ऋतुपरत्वे ती चिरसुंदरी नवनवीन रूपात नटते. ती चिरयौवना आहे. म्हणूनच येथे शिशिर आणि त्याची पानगळ येत नाही."
अर्थात 'मृण्मयी'च्या अर्थनिरूपणाची ही एक दिशा आहे. खरे तर ही कविता आपल्या स्वत:मध्ये अनेक अर्थ घेऊन उभी आहे. ती बहुप्रसवा माती आहे, खरोखरच मृण्मयी आहे, हेच खरे. म्हणूनच या कवितेचे 'मृण्मयी' हे शीर्षकदेखील या कवितेच्या सौंदर्याचा एक घटक आहे. सौंदर्यदानासाठी समुत्कंठित झालेली शुद्ध भावकविता म्हणून मराठी कवितेमध्ये 'मृण्मयी'चे स्थान फार वरचे आहे.
(संपादित)
डॉ. दत्तात्रय पुंडे, डॉ. स्नेहल तावरे
त्रिदल- बालकवी, कुसुमाग्रज आणि इंदिरा संत यांच्या निवडक कविता
सौजन्य- स्नेहवर्धन पब्लिशिंग हाऊस, पुणे.
* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
मृण्मयी
तो रावण कामी कपटी
तू वसलिस त्याच्या निकटी
नयनांसह पापी भृकुटी
मज वदवेना स्पष्ट याहुनी भलते
रावणवधानंतर त्याच्यासमोर उभ्या असलेल्या सीतेला सर्वांसमक्ष राम हे म्हणतो आहे. तिच्याविषयी नुसती शंका व्यक्त करून तो थांबत नाही, तो तिच्या-त्याच्यामधलं नातंच संपवून टाकतो आहे.
मी केले निजकार्यासी
दशदिशा मोकळ्या तुजसी
नच माग अनुज्ञा मजसी
सखि, सरले ते दोघांमधले नाते
वाल्मिकींचा राम मूळ रामकथेत जे म्हणाला आहे त्याचाच उच्चार ग. दि. माडगूळकरांच्या गीतरामायणातल्या रामाने केला आहे आणि हे ऐकल्यानंतर सीतेनं अग्नीप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्यापुढे दुसरा मार्गच नाही. निदान वाल्मिकींनी निर्माण केलेल्या सीतेपुढे तरी दुसरा मार्ग नाही. तिचं व्यक्तिमत्त्व, तिचं चरित्र आणि तिची प्रेमाची रीत पाहता तिनं स्वतःला संपवायचं ठरवलं, हे स्वाभाविकच झालं.
पण सीता तेव्हा संपली नाही. ती जळून गेली नाही. तिला आणखी पुष्कळ मोगायचं होतं. ती जिवंत राहिली आणि मग अग्नीनंच तिला जिवंत ठेवल्यावर रामानं तिचा पुन्हा स्वीकार केला. त्यानं म्हटलं,
लोकसाक्ष शुद्धी झाली सती जानकीची
स्वामिनी निरंतर माझी, सुता ही क्षमेची
माडगूळकरांसारखा श्रेष्ठ गीतकार शब्दांची निवड कशी करतो पहा ना. सीतेच्या संदर्भात संबंध रामायणात तिचं स्त्री असणं आणि स्त्रीविषयी तत्कालिन समाजाच्या अन्याय्य धारणा असणं, हे विलक्षण उत्पातकारी वास्तव ठरलं आहे. राम लोकराजा आहे आणि सीतेची शुद्ध लोकांसमक्ष होणं त्याला हवं आहे. म्हणून 'लोकसाक्ष शुद्धी !' एरवी सीता 'सती' आहे याची जाणीव त्याला आतून आहेच. शिवाय त्याचं-तिचं नातं संपवायचं म्हटलं तरी संपणार नाही. ती त्याच्या हृदयस्थ विश्वाची एकमेव 'स्वामिनी निरंतरच' असणार आहे. माडगूळकरांचा राम अगदी नेमके शब्द उच्चारतो आहे आणि सीतेचं वर्णन भूमिकन्या म्हणून करतो आहे.
माडगूळकर 'पृथ्वी' म्हणत नाहीत. 'भूमी' म्हणत नाहीत. 'धरा' म्हणत नाहीत. 'क्षमा' म्हणतात. केवळ रचनेची गरज म्हणून, वृत्तछंदांची मागणी म्हणून हा श्रेष्ठ कवी शब्दांचा वापर करत नाही. इथे आवर्जून तिचं भूमिकन्या असणं राम उल्लेखित करतो. कारण सीता भूमीचे गुण घेऊन आली आहे. ती धीराची आहे, स्थिर आहे, स्वतःविषयी ठाम आहे. ती सोशिक आहे आणि मुख्य म्हणजे ती क्षमाशील आहे.
एरवी राम तिला आधी जे बोलला होता ते भयंकर होतं. तिच्यासाठी कमालीचं अन्याय्य आणि दुःखद होतं. कुणीही तिच्यावर रावणाशी संबंध आल्याचा आरोप करणं तिला सहन होणारं नव्हे आणि इथे तर तिचा रामच तिला कलंक लावणारं बोलत होता. तेही एकांतात नव्हे; सर्वांसमक्ष ! एका कामासक्त पुरुषाच्या वासनेला रोखून धरण्याची एक लढाई त्याच्याच बंदिवासात राहून तिनं एकटीनं, निःशस्त्रपणे केली होती. असं असतानाही राम- तिचा राम तिचा त्याग करत होता आणि शेकडो माणसांसमोर तिला अपमानित करत होता. तरीही तिनं ते सगळे आरोप नाकारताना त्याला उलट अपमानित केलं नाही. शापलं नाही. सोडलंही नाही. ती खरोखर भूमिकन्या शोभली. भूमीचं दुसरं नाव 'क्षमा' असं आहे. इथे सीतेला 'क्षमेची' मुलगी म्हणताना न बोलताही केवढं बोलून गेले आहेत माडगूळकर !
आज मात्र गीतरामायणातली ही दोन्ही गीतं आठवताना किंवा मूळ रामायणातला तो अखेरचा भाग वाचत असताना मनाची फार तडफड होते. असं वाटतं की सीता जर भूमिकन्या आहे तर तिचा क्षमेचाच गुण का एवढा प्रकर्षानं उचलला तिनं? भूमीच्या पोटात सतत उकळणारा रसरसता लाव्हा का नाही उसळून आला वर? का नाही तडे गेले तिथे जमलेल्यांच्या अयोग्य, अन्याय आणि अपमानास्पद अशा तिच्याविषयीच्या धारणांना?
मल्लिका साराभाईसारखी जगप्रसिद्ध नृत्यांगना 'सीताज् डॉटर्स' सारख्या तिच्या नृत्यप्रयोगातून सीतेची तशी एक वेगळी झलक दाखवू पाहते.
'धरणीमाते, मला पोटात घे' असं आपल्या आईला पुन्हा पुन्हा म्हणताना ही थोरल्या आईची मुलगी तिचा प्रियकर आणि पती राम, तिच्या भोवतालचा समाज आणि त्याची तिच्याकडे बघण्याची दृष्टी, तिचं प्रेम आणि तिचं अस्तित्व यांच्या संबंधी दर वेळी जे भाष्य करते ते कमालीचं भेदक आहे. या कलावतीनं उभी केलेली सीता बुद्धिमानही आहे आणि संवेदनाशीलही आहे. ती मृण्मयी तर आहेच, पण मृण्मय असण्याचे तिचे गुणधर्म वेगळे आहेत.
बाई म्हणजे धरित्रीची लेक आहे, हे जाणता अजाणता कितीजणींनी जगलेलं सत्य आहे ! इंदिरा संतांनी बाईला 'वसुंधरेची लाही' म्हटलं आहे आणि त्यांची 'मृण्मयी' नावाची कविता तर बाईंच्या माती असण्याचीच कविता आहे.
रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन
रक्ताला रक्ताची ओढ असते म्हणतात. रक्तपेशींमधून येतात ते गुणधर्म आनुवंशिक असतात. ते बाहेरच्या संस्कारांवर अवलंबून नसतात. आतलीच गोष्ट असते ती. म्हणून जैविक आणि स्वभाविकही. बाईला मातीची ओढ आहे. ती अगदी नैसर्गिकपणेच आहे. तिच्या रक्तातच ती आहे आणि मनात आहे मातीचं ताजेपण.
कधीच जुनी नसते माती. नित्य नवीन घडवण्याची, जन्माला घालण्याची शक्ती असते तिच्यात आणि सतत काही ना काही घडतंही असतं तिच्यात, तिच्यामुळे, तिच्यावर! ती ताजी असते. नेहमीच ताजी. त्या मातीतून वरती आलेली स्त्री. तिचंही आयुष्य मातीचंच. ते अपुरं अधुरं आहे कारण जन्म-मृत्यूनं त्या आयुष्याचे आदि-अंत मर्यादित झाले आहेत. माती तर अनादी-अनंत आहे. आणि जीवन अधुरं आहे कारण त्या मातीची आभाळाशी भेट नाही. सूर्याशी भेट नाही. निराकाराच्या स्वामीशी भेट नाही. पण अधुरं असलं तरी ती ते जीवन मातीचे सगळे सोहळे मनमुक्त अनुभवणारं आहे.
कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधीमध्ये डुबावे
दंवात भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधि निथळावे
इंदिराबाईमधली बाई पृथ्वीची- मातीची होऊन जाते तेव्हा सहा ऋतूंचा मनभावन शृंगार करते. खास बाईला साजेल, भावेल असा शृंगार.
हेमंताचा ओढून शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे
कवी काळाच्या पलीकडे जाऊन एका भव्य जीवनजाणिवेशी तादात्म्य पावतो आणि त्याच वेळी त्याच्या काळाची एक लहानशी कडी त्याच्या पायात अडकून राहते. इंदिराबाईंच्या काळातल्या त्या 'छापील पातळा'चा धागा त्यांच्या पायात तसाच अडकला आहे. पण तरी नजर थोडी वर उचलली तर त्यांच्या कल्पनेचा दाट काळा केशसंभार ग्रीष्माच्या टोपलीवर पसरलेला दिसतो आणि त्यातून सुगंधी धूपाचा थरथरता दरवळही येत राहतो.
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
जर्द विजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर
अशी सजली आहे ती. मातीची ! माती होऊन अनुभवते आहे ऋतूंना आणि मग त्याचा ध्यास घेऊन अंतराळात अधांतरी फिरते आहे. अंधार आहे भोवती. अज्ञात अंधार. पण तिच्या पदरात 'त्याच्या' स्मृतीचे काजवे आहेत. अंधार उजळणारा इवलासा प्रकाश !
आणिक तुझिया लाख स्मृतीचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला ध्यावे, तुजला ध्यावे
आभाळ आणि माती म्हणा की सूर्य आणि पृथ्वी म्हणा की स्त्रीतत्व आणि पुरुषतत्व म्हणा, या दोघांमधल्या ओढीपाशी येऊन थांबते की मृण्मयी.
इंदिराबाईंची मृण्मयी आहे कुलवंत संयमानं आपला शृंगार आणि आपली ओढ व्यक्त करणारी. तिच्या शेजारी ठेवावीशी वाटते ती मातीची मस्ती सांगणारी पु. शि. रेगे यांची कविता. 'सहाजण सजण.'
सहाजण सजणऽ
ही भुलवित, झुलवित अजुनऽ
ही माती- ही पृथ्वी सहा ऋतूंना कशी भुलवते याचं खास रेगे शैलीतलं मिताक्षरी वर्णन आहे ते. सहाही ऋतूचं स्वभाव वेगळे. व्यक्तीमत्त्वं वेगळी. प्रेम करण्याची त्यांची रीत वेगळी आणि ती पृथ्वी तर तरुणपणाच्या मस्तीत आहे. आपल्या बाईपणाच्या मस्तीत आहे. सगळ्यांना भूल घालतेय ती, असा तिचा दिमाख आहे. आणि तिला माहीत आहे आपली ताकद. आपल्या आकर्षणाची जाणीव आहे तिला; पण ती कुणाच्याच आधीन होणारी नाही. कुणा एकाचं स्वामीत्व स्वीकारणारी नाही. ती आहे एक शक्तिमंत, स्वतंत्र स्त्री ! सहाजणांना भुलवणारी आणि झुलवणारीही.
स्त्रीतत्वा माती आपल्याला 'पृथ्वीच्या प्रेमगीता'तूनही भेटली आहेच ना. सूर्यावर प्रेम करताना इतर ग्रहतार्यांच्या प्रेमाकर्षणाला दूर सारणारी आणि 'नको शुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे' असं म्हणणारी माती.
(संपादित)
अरुणा ढेरे
कवितेच्या वाटेवर
सौजन्य- अभिजित प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख