A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रेमपिसें भरलें अंगीं

प्रेमपिसें भरलें अंगीं ।
गीतेछंदे नाचों रंगीं ॥१॥

कोणे वेळे काय गाणें ।
हें तों भगवंता मी नेंणे ॥२॥

वारा धांवे भलतया ।
तैसी माझी रंग छाया ॥३॥

टाळमृदंग दक्षिणेकडे ।
आह्मी गातों पश्चिमेकडे ॥४॥

बोले बाळक बोबडें ।
तरी तें जननीये आवडे ॥५॥

नामा ह्मणे गा केशवा ।
जन्मोजन्मीं देईं सेवा ॥६॥