A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रपंच

मायबाप ! मायबाप !

माणूस होऊन जगणे थोडे जगून पहा
देवपणा तू सोडून खाली उतर जरा
मायबाप ! मायबाप !

तू नसल्याचा भास पसरला चहूकडे
दगडमातीच्या भिंतींमधुनी विहर जरा
मायबाप ! मायबाप !

सुखदु:खाचे झाले आता गाव जुने
या हसण्या-रडण्यामधुनी तू बहर जरा
मायबाप ! मायबाप !

या जगण्यातून काढून घे हे जहर जरा
उलट जरासा दु:खाचा हा प्रहर जरा
मायबाप ! मायबाप !

रडता रडता या ओठांवर कधीतरी
हसण्याचाही कर थोडासा कहर जरा
मायबाप ! मायबाप !

तेवत राहो माणुसकीचा एक दिवा
आठवणीतून माणूस होवो अमर जरा
मायबाप ! मायबाप !

अंगण होईल देव्हार्‍यासम पावन हे
वेलीवरल्या पानफुलांतून डवर जरा
मायबाप ! मायबाप !