A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पटली नाही ओळख पुरती

पटली नाही ओळख पुरती अजुनी नवखेपणा
अन्‌ राया मला, मलाच अपुली म्हणा

सदा तुम्हा मी जीव लावते
हवे-नको ते तुम्हास पुसते
भोजन रुचकर रोज बनविते
तरी सख्या का अजुनी वाटतो सांगा नवखेपणा
अन्‌ राया मला, मलाच अपुली म्हणा

दिवे लावुनी वाट पाहते
शिणुनी येता पाय चेपते
दूध केशरी रात्री देते
कधी न येतो चुकुनी राजसा शब्द मुखातून उणा
अन्‌ राया मला, मलाच अपुली म्हणा

नको मला हो शालू शेला
वज्रटीक वा मोहनमाळा
सदा मनाला एकच चाळा
जवळी घेउनी कुरवाळा मज सोडा परकेपणा
अन्‌ राया मला, मलाच अपुली म्हणा