A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पराधीन आहे जगतीं

दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा

माय कैकयी ना दोषी, नव्हे दोषि तात
राज्यत्याग काननयात्रा, सर्व कर्मजात
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा

अंत उन्‍नतीचा पतनीं होइ या जगांत
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होतें, नेम हा जगाचा

जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत
काय शोक करिसी वेड्या, स्वप्‍निंच्या फळांचा?

तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनांत
अतर्क्य ना झालें काहीं, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्यांचा

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
वर्धमान तें तें चाले मार्ग रे क्षयाचा

दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाहिं गांठ
क्षणिक तेंवि आहे बाळा, मेळ माणसांचा

नको आंसु ढाळूं आतां, पूस लोचनांस
तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास
अयोध्येंत हो तूं राजा, रंक मी वनींचा

नको आग्रहानें मजसी परतवूंस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे हो‍उं रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करिं, कां वेष तापसाचा?

संपल्याविना हीं वर्षें दशोत्तरीं चार
अयोध्येस नाहीं येणें, सत्य हें त्रिवार
तूंच एक स्वामी आतां राज्यसंपदेचा

पुन्हां नका येउं कोणी दूर या वनांत
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनांत
मान वाढवी तूं लोकीं अयोध्यापुरीचा