A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पंचतुंड नररुंडमालधर

पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधीं नमितों ।
विघ्‍नवर्गनग भग्‍न कराया विघ्‍नेश्वर गणपति मग तो ॥

कालिदासकविराजरचित हें गानीं शाकुंतल रचितों ।
जाणुनियां अवसान नसोनि हें महत्कृत्यभर शिरीं घेतों ॥

ईशवराचा लेश मिळे तरि मूढयत्‍न शेवटिं जातो ।
या न्यायें बलवत्कवि निजवाक्पुष्पीं रसिकार्चन करितो ॥
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर- स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.
नाटक - शाकुंतल
राग - अल्हैय्याबिलावल
ताल-धुमाळी
गीत प्रकार - प्रथम तुला वंदितो, नाट्यसंगीत, नांदी
  
टीप -
• बलवत्कवि- स्वत: आण्णासाहेब (बळवंत पांडुरंग) किर्लोस्कर
अर्चन - पूजा.
तुंड - तोंड.
मूढ - गोंधळलेला / अजाण.
रुंड - शिर, मुंडके.
रुंडमाला - शंकराच्या गळ्यात मुंडक्यांची माळ असते ती.
लेश - अल्प अंश.
श्रीमहाकवि कालिदास याच्या संस्कृत ग्रंथांची माहिती ज्यांना अजून झाली नाहीं, असे लोक फर थोडे सांपडतील. ह्या ग्रंथांची निरनिराळ्या भाषेंत भाषांतरें होऊन कवीच्या गुणांचा घोष सर्व देशांत आबालवृद्धांच्या तोंडीं ऐकूं येऊं लागला आहे. कालिदासानें केलेल्या- निदान आजपर्यंत तरी उपलब्ध असलेल्या- तीन नाटकांपैकीं 'अभिज्ञानशाकुंतल' हें नाटक फारच चांगलें साधलें आहे, असें सर्वांचें मत आहे. बाकीचीं 'विक्रमोर्वशीय' व 'मालविकाग्‍निमित्र' हीं दोन नाटकें चांगली तर आहेतच. परंतु 'शाकुंतला'च्या मानानें पाहतां त्यांची योग्यता कमी पडते. कालिदासाची कवित्वशक्ति जेव्हां पूर्ण विकास पावली नव्हती व कशालाही न भितां प्रसंगविशेषीं थेट अस्मानपर्यंत भरारी मारण्याची कला जेव्हां याच्या कल्पनाशक्तीला साधली नव्हती, अशा वेळीं वरील दोन नाटकें त्यानें लिहिलीं असावीं, असा पुष्कळ विद्वान् लोकांचा अभिप्राय आहे; व तो अभिप्राय या दोन ग्रंथांच्या अन्तः स्वरूपावरून पुष्कळ अंशीं खरा ठरतो.

अलीकडे इंग्रजी विद्येचा प्रसार आपल्या देशांत झाल्यापासून व संस्कृत भाषा पाठशालांत शिकविण्याचा प्रघात पडल्यापासून, संस्कृत ग्रंथकारांचीं पुस्तकें लोकांना विशेष माहीत होत चाललीं आहेत. सर वुइल्यम जोन्स यांना संस्कृत भाषेचा नाद असल्यामुळे त्यांनीं सुमारे ६०/७० वर्षांपूर्वी 'शाकुंतल' या नांवाच्या नाटकांत काय मजा आहे तें आपल्या देशबंधूंना कळवून दिलें. त्यावेळीं संस्कृत चांगलें जाणणारे असे इंग्रज लोक देशांत फारच थोडे होते; व सर वुइल्यम यांसही कालिदासाच्या सर्व खुब्या कळल्या असतील कीं नाहीं याची मोठीच शंका आहे. तथापि यांनी केलेल्या भाषांतरावरून परद्वीपस्थ लोक या पुस्तकावर इतके खुप झाले की लौकरच 'शाकुंतल' नाटकाची दुसर्‍या बर्‍याच भाषांतून भाषांतरें झालीं; व सर्व कविवृंदाचा मुकुटमणि होऊन बसलेला जो विख्यात शेक्सपियर, याच्याशीं कालिदासाची लोक तुलना करूं लागले; व 'कालिदास हा हिंदुस्थानांतील शेक्सपियर असें समजलें पाहिजे,' असा सर्वांचा अभिप्राय ठरला.

'शैवालें युक्त जैसें पंकज तें शोभतें' या कालिदासोक्त न्यायानेंच सर वुइल्यम यांनीं जरी कसें तरी 'शाकुंतला'चें भाषांतर केलें होतें तरी तितक्यानेंच कालिदासाची विशाल कवित्वशक्ति त्यांच्या देशबंधूंना कळून सर्व सहृदय वाचकांच्या वृत्ति आनंदमय झाल्या. विख्यात कवि गेटी (German poet Goethe) तर 'मधुर गायनाच्या नादीं वेडावुनि (तो) गेला'. त्यामुळे या नाटकाविषयी लिहितांना त्यानें अतिशय रमणीय पदार्थांचें अग्रस्थान 'शाकुंतला'ला दिलें. "जर तुम्हांला कोकिलरवांनीं रमणीय भासणार्‍या व आपल्या आल्हादकारक वस्तूंनीं सगळ्या लोकांचें मन मोडून टाकणार्‍या वसंतसमयाची गोडी घ्यावयाची असेल तर 'शकुंतला' घ्या म्हणजे सर्व मिळाल्यासारखें होईल." ही अव्वल इंग्रजीच्या वेळची संस्कृत भाषेची स्थिति होय. पुढे युरोपियन लोकांसही ती प्रत्यक्षरूपानें जसजशी जास्त कळूं लागली, तसतशी कालिदासाच्या अप्रतिम कवित्वाची परीक्षा चांगली होऊं लागून त्याच्या गुणांचा महिमा ज्यास्तच होत चालला आहे.

तर अशा सर्वविख्यात कवीच्या सर्वमान्य नाटकाचें भाषांतर करण्याचें रा. किर्लोस्कर यांनीं मनांत आणिलें, हें एक त्यांचें पुस्तक वाखाणलें जाण्याचे कारण होय. 'शाकुंतल' नाटकाचीं भाषांतरें अनेक भाषांतून झाली आहेत, खुद्द मराठीतच दोन-तीन झालीं आहेत. पण रा. अण्णा किर्लोस्कर यांनीं भाषांतराचा जो प्रकार काढला तो पूर्वीच्याहून भिन्‍न आहे. त्यांनी इंग्रजीत जसे 'ऑपरा' असतात तशा प्रकारचें संगीतबद्ध 'शाकुंतला'चें भाषांतर केलें, व त्याचे प्रयोग येथील व इतर गांवच्या लोकांस त्यांनी अनेक वेळा करून दाखविले. रा. किर्लोस्कर यांच्या भाषांतरामध्ये जरी कांहीं कांहीं चुका असल्या तरी कालिदासाच्या रसाळ वाणीचा दुसर्‍या परंतु चारुतर रूपानें सर्व जनांना त्यांनीं आस्वाद करून दिला व मराठी भाषेंतील नाटकांत आजपर्यंत फारसा उपयोगांत नसलेला रागबद्ध संगीताचा प्रकार त्यांनी प्रचारांत आणिला, याबद्दल त्यांचे सर्वांनी आभार मानिले पाहिजेत.

आतां खुद्द 'संगीत शाकुंतल' नाटकाकडे वळूं. शाकुंतल नाटकाचें संविधानक फार सोपें असन मनोवेधक आहे. भारतांतील कथेत असें आहे कीं, जेव्हां राजानें शकुंतलेचा अव्हेर केला व मुलासमवेत ती आली असून तिला आपल्या घरांत घेतलें नाहीं तेव्हां आकाशवाणी झाली. त्यावरून राजानें आपल्या प्रियेस घरांत घेतलें. या साध्या कथाभागांत फारशी खुबी नाहीं, म्हणून कालिदासानें दुर्वासऋषीचा शाप व आंगठी नाहींशी होणें या दोन गोष्टी आपल्या अप्रतिम कल्पनाशक्तीच्या योगानें नाटकाच्या संविधानकांत नवीन घातल्या आणि त्यामुळे नाटकाला इतकी शोभा व मनोवेधकता आली आहे की, 'काव्येषु नाटकं रम्यं तत्रापि च शकुन्तला' या उक्तीची सर्वांशी सार्थकता होते. म्हणून 'संगीत शाकुंतल' पुस्तकाच्या संविधानकासंबंधानें फार लिहिणें नको. कालिदास हा तर कविश्रेष्ठ व रा. किर्लोस्कर हे संगीत कलेंतील मार्मिक; तेव्हां गुणद्वयं एकत्र जमल्यावर नाटक वाईट व्हावें कसें? या नाटकांत सर्वच चांगलें जमलें आहे. मूळचा कथाभाग चांगला; पद्यरचना सुगम; व राग फार गोड व त्या त्या रसाला योग्य; आणि सगळ्यांत विशेष गोष्ट ही की 'संगीत' नाटकाचा प्रकार पहिल्यानें या नाटकानेंच लोकांना दाखविला. तेव्हां-

वस्त्वेकैकमपीह वाञ्छितफलप्राप्तेः पदं किं पुनर्मदूभाग्योपचयादयं समुदितः सर्वो गुणानां गणः

या 'रत्‍नावली' नाटकांतील सूत्रधारोक्तीची कोणाला आठवण होणार नाहीं?

पद्यें वाचतांना संगीतानभिज्ञ मनुष्याला यतिभंग झाल्याचें बर्‍याच ठिकाणीं आढळून येईल. वास्तविक पाहतां तालसुरादींचा उपयोग न करतां जर पद्यें साध्या कवितेसारखीं वाचूं लागलों तर बर्‍याच स्थलीं यतिभंग होतों; पण तींच पद्यें प्रयोग करतांना तालसुरावर म्हटलीं म्हणजे तो दोष बहुतकरून दृष्टीस पडत नाहीं. 'संगीत शाकुंतल' हें पुस्तक जरी आर्यभूषण छापखान्याचें आहे तरी त्यांत मूळ ग्रंथकाराच्या भाषासरणींत किंवा शब्दरचनेंत आमच्यानें फेरबदल करवत नाहीं. हें लक्षांत आणून मूळची भाषा फारशी न बदलतां पूर्वीचे यतिभंग जितके दुरुस्त करतां आले, तितके केले आहेत.
(संपादित)

प्रकाशकाचे मनोगत
'संगीत शाकुंतल' या नाटकाच्या पुस्तकाच्या १९३० सालच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- अनंत विनायक पटवर्धन (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा.