तंव झालों प्रसंगी गुणातीत ॥१॥
मज रूप नाहीं, नांव सांगू काई ।
झाला बाई काई बोलूं नये ॥२॥
बोलतां आपली जिव्हा पैं खादली ।
खेचरी लागली पाहतां पाहतां ॥३॥
ह्मणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी ।
सुखासुखी मिठी पडली कैसी ॥४॥
गीत | - | संत गोरा कुंभार |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | रामदास कामत |
राग | - | शुद्ध सारंग |
गीत प्रकार | - | संतवाणी |
खादणे | - | खाणे. |
पैं | - | निश्चय्यार्थक. |
खेचरी मुद्रा-
खेचरी हा शब्द 'ख' आणि 'चरी' अशा दोन शब्दांनी बनलेला आहे. 'ख' या शब्दाने आकाश अर्थात मनाची निर्विकार अवस्था निर्देशित केली आहे. 'चरी' म्हणजे फिरणारी किंवा प्रवेश करणारी. थोडक्यात खेचरी म्हणजे आकाशात फिरणे. हे आकाशात फिरणे दोन स्तरावर घडत असते- शारीरिक आणि मानसिक. त्यापैकी शारीरिक स्तरावर जी क्रिया साधक करतो त्याला खेचरी मुद्रा म्हणतात. या क्रियेचा परिणाम स्वरूप मनाची जी निर्विचार अवस्था प्राप्त होते त्याला खेचरी अवस्था असे म्हणतात.
खेचरी मुद्रेमध्ये साधक आपली जीभ उलटी फिरवून, टाळूला भिडवून मागे नेतो.
संत गोरा कुंभार माउलीच्या अनेक अभंगांमधून तिचा आणि संत नामदेव माउलीचा संवाद प्रगट झाला आहे. हा संवाद आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. कारण संत गोरोबा माउलीला आपला आध्यात्मिक विकास साधायचा आहे. असाच एक संत गोरोबा माउलीच्या आध्यात्मिक विकासाचे दर्शन घडविणारा अभंग-
निर्गुणाचे भेटी, आलो सगुणासंगे ।
तंव झालों प्रसंगी, गुणातीत ॥
खरा परमात्मा हा निर्गुण, निराकार आहे. तो निर्गुण आहे. याचा अर्थ रज, तम, सत्त्व या गुणांच्या पलीकडे आहे. अशा या निर्गुण, निराकार परमात्भ्याच्या भेटीला गोरोबा माउली गेली. कशी गेली? सगुणासंगे ! म्हणजे सगुण, साकार परमात्म्याची उपासना करत करत ती निर्गुण, निराकार परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचली. एकदम कोणशी निर्गुण, निराकार परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचत नसतो. त्यापेक्षा परमेश्वराच्या सगुण, साकार स्वरूपाची उपासना करणे अधिक सोपे आणि आनंददायी असते. म्हणून गोरोबा माउली भगवंताच्या सगुण-साकार रूपाची उपासना करत करत निर्गुणाचे भेटी गेली. त्यामुळे तिला निर्गुण, निराकार परमात्मा सापडला ती त्याच्याशी एकरूप झाली. त्याच्यासारखीच निर्गुणातीत झाली. म्हणजे रज, तम, सत्त्व या सर्व गुणांच्या पलीकडे गेली. परमात्म्याशी एकरूप झाल्याने आता गोरोबा माउलीची अवस्था कशी झाली?
मज रूप नाहीं, नांव सांगू काई ।
झाला बाई काई, बोलूं नये ॥
गोरोबा माउलीची अवस्था आता न सांगण्यासारखी. काहीच्या बाही झाली आहे. भगवंताला ज्याप्रमाणे एक नाव नाही त्याप्रमाणे गोरोबा माउलीलाही एक नाव नाही. गोरोबा माउलीची अवस्था अगदी भगवंतासारखीच झाली आहे.
बोलतां आपली, जिव्हा पैं खादली ।
खेचरी लागली, पाहतां पाहतां ॥
आध्यात्मिक क्षेत्रात उच्चावस्थेला जाण्याचा आनंद खूप वेगळा असतो. तो शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. गोरोबा माउली तो आनंद व्यक्त करायला गेली तर जीभ अडते. खेचरी मुद्रा ही योगातील एक मुद्रा असते. या मुद्रेत जीभ टाळूला चिकटवली जाते. तशी आपल्या जीभेची अवस्था झाली आहे की काय, अशी शंका गोरोबा माउलीला येते.
ह्मणे गोरा कुंभार, नाम्या तुझी भेटी ।
सुखासुखी मिठी, पडली कैसी ॥
संत नामदेव माउलीची अवस्थाही यापेक्षा निराळी नाही. ती देखील सगुण, साकार भगवंताची उपासना करता करता निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत पोहोचली आहे. त्याच्याशी एकरूप झाली आहे. त्यामुळे तीही खूप उच्च दर्जाचा आनंद उपभोगते आहे.
डॉ. जोगेश्वर नांदुरकर
सौजन्य- दै. नवशक्ति (प्रकाशन दिनांक अनुपलब्ध.)
(Referenced page was accessed on 18 April 2017)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.