A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नमोस्तु गौतमा

बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि

ॐ नमो तथागता नमोस्तु गौतमा
ज्ञानदीप चेतवी, घालवी तमा

सदय हृदय अभयदान देई तू स्वये
अंतरंग शांत करीत जीवनात ये
सकल मलीन जाळण्यास भीमशक्ती दे
अखिल भुवन उजळण्यास प्रेमभक्ती दे
करी सशक्त करी समर्थ, हे नरोत्तमा

नवनवीन रूप धरून येई अज्ञता
बुद्धदेव भारतास द्या प्रबुद्धता
विषसमान विषमता न अजून लोपली
या जगास शिकवणूक दिव्य आपली
परम करूण लोचनांत दाटली क्षमा

धम्म शरण संघ शरण लोकसाधना
शुद्ध चित्त शुद्ध नीती शुद्ध भावना
नव युगात मिळवुयात जनसमानता
हाच धम्म हेच ध्येय येई मानता
भीमरूप धरून तूच शिकविले अम्हा
अज्ञ - मूर्ख, अजाण.
चेतणे - भडकणे.
तथागत - गौतम बुद्ध. (शाब्दिक अर्थ- हा शब्द पाली भाषेतील आहे ज्याचा अर्थ 'यथाचारी तथाभाषी'- म्हणजेच, ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे कृती करतो.)
धम्म - 'धम्म' हा पाली भाषेतील शब्द, 'धर्म' या 'योग्य व न्याय्य मार्ग' या संस्कृत शब्दावरून आला आहे.
प्रबुद्ध - प्रौढ, विद्वान.
बुद्ध - ज्ञाता, जागृत झालेला.
संघ - बुद्धांच्या शिष्यांचा आध्यात्मिक समाज.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.