A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले तो विस्फारून बघताना
कुणी पोटातून चिडताना कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ-फांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरुड बैसला नाही

धुतलेला सात्त्विक सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते अदृश्य, लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनातसुद्धा माझ्या कधी दंगा केला नाही

मज जन्म फळाचा मिळता मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी तर भेंडी झालो असतो
मज चिरताचिरता कोणी रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही ! आंबाही झालो नाही !