वेडा झालों मी तव छंदें ॥१॥
गाइन ओविया पंढरीचा हा देव ।
आमुचा तो पांडुरंग ॥२॥
तुका म्हणे माझा सखा पांडुरंग ।
गाइन गोड मी हरिचें गीत ॥३॥
गीत | - | गो. ल. आपटे |
संगीत | - | पंडितराव नगरकर |
स्वर | - | पंडितराव नगरकर |
नाटक | - | देहूरोड |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
गातों नाचतों आनंदें ।
वेडा झालों मी तव छंदें ॥१॥
गाइन ओविया पंढरीचा देव ।
आमुचा तो जीव पांडुरंग ॥२॥
आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे ।
जो मी तुज पाहे पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे माझा सखा पांडुरंग ।
गाऊं गाऊं गोड हरिचें गीत ॥४॥
या पदाच्या शेवटच्या ओळीत 'तुका म्हणे' येत असलं तरी हा 'तुका ह्मणे' असा तुकाराम रचित संपूर्ण, एकसंध, अभंग नाही. या नाटकाच्या प्रस्तावनेत गो. ल. आपटे यांनी हे नाटक लिहितेसमयी बापूराव माने यांनी त्यांना तुकाराम गाथा वाचावयास दिली होती, असे नमूद केले आहे. तुकाराम गाथेतील वेगवेगळ्या पाच अभंगातील ओळींच्या छटा या नाट्यपदात दिसतात.
गाथेतील ते पाच अभंग ज्यांचा प्रभाव हे या पदरचनेवर पडला आहे, ते -
गातों नाचतों आनंदें । टाळघागरिया छंदें ॥१॥
तुझी तुज पुढें देवा । नेणों भावे कैसी सेवा ॥२॥
नेणों ताळ घात मात । भलते सवां पाय हात ॥३॥
लाज नाहीं शंका । प्रेम घाला ह्मणे तुका ॥४॥
गाइन ओंविया पंढरिचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥१॥
रंगलें हें चित्त माझें तया पायीं । ह्मणउनि घेइप हा चि लाहो ॥२॥
लाहो करीन मी हा चि संवसारीं । राम कृष्ण हरि नारायण ॥३॥
.
.
कृपाळू हा देव अनाथा कोंवसा । आह्मी त्याच्या आशा लागलोंसों ॥१००॥
लावियेले कासे येणें पांडुरंगें । तुका ह्मणे संगें संतांचिया ॥१०१॥
आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें ॥१॥
आतां दृष्टीपुढें ऐसा चि तूं राहीं । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥२॥
लाचावलें मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडीं ऐसें जालें ॥३॥
तुका ह्मणे आह्मी केली जे लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥४॥
हरिचिया भक्ता नाहीं भयचिंता । दुःख निवारिता नारायण ॥१॥
नलगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥२॥
असों द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळीच ॥३॥
तुका ह्मणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणें एकें ॥४॥
तुझें रूप पाहतां देवा । सुख जालें माझ्या जीवा ॥१॥
हें तों वाचे बोलवेना । काय सांगों नारायणा ॥२॥
जन्मोजन्मींचे सुकृत । तुझे पायीं रमे चित्त ॥३॥
जरी योगाचा अभ्यास । तेव्हां तुझा निजध्यास ॥४॥
तुका ह्मणे भक्त । गोड गाऊं हरिचें गीत ॥५॥
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.