कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात
तुडवुनी वन धुंडुनी नंदनवन
शोधुनी झाले अवघे त्रिभुवन
एक न उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात
नीलजळी यमुनेच्या साची
होडी सोडिली मी देहाची
गवसलास ना परि तू कान्हा लाटांच्या रासात
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | कुंदा बोकिल |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, भावगीत |
साच | - | खरे, सत्य / पावलाचा किंवा हालचालीचा आवाज. |
माझ्या बहुतेक सर्वच कविता आणि गीतांना विविध संदर्भाचे अलंकार लाभले आहेत. त्यातील काहींच्या जन्मकथा मनोरंजक आहेत. काहींच्या ब्रेल लिपीच्या माध्यमाने सातत्याने केलेल्या वाचनाने अंधमित्रांच्या आयुष्यात
सुरेख दिवस उजाडले आहेत, उजाडत आहेत. 'रामायणात माझ्या सीता कशास आली?' सारख्या कवितेच्या श्रवणाने, आपल्या पत्नीला कायमचे माहेरी पाठविणार्या पतीने पुन्हा आपल्या घरी नांदायला आणले आहे. 'मिटलेली मूठ तुझी जगी जन्मताना ! उघडी परि राहिली ती विश्व सोडताना' ही गीत-कविता ऐकून शाहू मोडकांसारख्या ज्योतिषाने दिलेल्या शुभेच्छा फलद्रूप झाल्या आहेत. 'कंठातच रुतल्या ताना' सारखे माझे गीत एकून शब्दभास्कर पु. भा.
भावे यांच्यासारखे शब्दप्रभु मला प्रसन्न झाले आहेत. 'पहाटेच्या गारव्यात गाठले थेऊर' ऐकून रणजित देसाईंनी मला माझ्या उमेदवारीच्या काळात खूपच प्रोत्साहन दिले आहे. माझी स्वत:ला आवडणारी गीते वारंवार नभोवाणीवरून प्रक्षेपित होत आहेत, ते ऐकून गुरुवर्य ग. दि. माडगूळकरांनी,
जय नाद निनादती अंबरे ।
जय श्री गंगाधर महाम्बरे ॥
असे गौरवोद्गार काढले आहेत.
अशाच या माझ्या गीत-कवितांमधील एक कविता आहे, 'निळासावळा नाथ'. सहा कडव्यांची ही कविता संग्रहात प्रथम प्रसिद्ध झालेली असली तरी १९५३-५४ च्या सुमाराला मुंबई आकाशवाणीवरून एका कविसंमेलना मी
ती प्रथम म्हटली होती. त्याची संहिता पुढील प्रमाणे,
निळासावळा नाथ । तशीही निळीसावळी रात ।
कोडे पडते तुला शोधिता कृष्णा अंधारात ॥धृ॥
तुडवुनि वन धुंडुनि नंदनवन । शोधुनि झाले अवघे त्रिभुवन ।
एक न उरले गोपीचे घर हाकेच्या टप्प्यात ॥१॥
नीलजली यमुनेच्या साची । होडी सोडली मी देहाची ।
गवसलास ना परि तू कान्हा लाटांच्या रासात ॥२॥
दुर्मुखलेली झाली धरती । दहा दिशांच्या भ्याल्या भिंती ।
निळावंतीची निळी ओढणी थरथरती क्षितिजात ॥३॥
समाधिस्त त्या निळसर तिमिरी । कळी खुलेना शशिची लाजरी ।
गोपुरी गोरज सखावळीतुन हरवली पाऊलवाट ॥४॥
पैलतटावर खिळवून लोचन । कल्पनेवरी तसे विसंबुन ।
निभावले ना गूढ निळेसे एक उरे हृदयात ॥५॥
थकल्या नेत्रा निळीसावळी । वत्सल निद्रा बघ कुरवाळी ।
भेटशील का निळ्या सावळ्या गहिर्या त्या स्वप्नात ॥६॥
'निळासावळा नाथ'ची जन्मकथा सांगण्यासाठी या कवितेच्या निर्मितीच्या जन्मवेळेपर्यंत आठवेल त्याप्रमाणे मागे जायला हवे.
'नाच रे मोरा' हे 'देवबाप्पा' या बोलपटाचे १९५३ हे प्रकाशन वर्ष असल्यामुळे 'निळासावळा नाथ'च्या पहिल्या दोन ओळी मी १९५३ मध्ये लिहिल्या होत्या, हे आज निश्चितपणे सांगता येईल. ती गीतजन्माची सर्व कथा आठवल्यावर आजही मी वेगळ्या सृष्टीत जातो. त्याचे असे झाले-
मुंबईतील कॅडेल रोडच्या कोपर्यावरील गोविंद भुवन या इमारतीत सुप्रसिद्ध नाटककार ह. वि. देसाई यांच्या निवासस्थानी त्यांच्या नाटकातील गीतलेखन करण्याच्या निमित्ताने माझे जाणे येणे असे. १९५३ च्या दिवाळीमध्ये या इमारतीच्या गच्चीवर मी लिहिलेल्या एका बालनाट्याचा प्रयोग होत होता. 'देवबाप्पा'तील बाल अभिनेत्री मेधा गुप्तेचे वडील सुप्रसिद्ध अभिनेते आणि रंगकर्मी प्रभाकर गुप्ते याच इमारतीत रहात होते. रात्री उशीरा बालनाट्याचा प्रयोग सुरू झाला आणि थोड्याच वेळात विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे तो प्रयोग बंद पडला. पूर्ववत् परिस्थिती येण्यासाठी थोडा वेळ वाट पहावी लागत होती. तेवढ्यात कुणीतरी प्रेक्षकात उपस्थित असलेल्या मुलांमुलींनी 'देवबाप्पा'तील गाणी म्हणावीत, अशी टूम काढली. 'मी नाही, तू म्हण.' करीत थोड्या वेळाने एक मुलगी गायला तयार झाली. ती गाऊ लागली. गदिमांचे नंतर खूप प्रसिद्ध झालेले 'करू देत शृंगार' हे गीत. तिचे वडील ध्वनिमुद्रित कंपनीत ध्वनिमुद्रण अधिकारी असल्यामुळे आणि साक्षात कविश्री ग. दि. माडगूळकर त्यांच्या घरी वारंवार येत असल्यामुळे, तिला त्या चित्रपटातील सर्व गीते आपल्या घरातलीच आहेत, असे वाटल्यास नवल नाही. गच्चीच्या कोपर्यावर दूर अंतरावर असलेल्या मला त्यावेळी त्या गीताचे शब्द स्पष्टपणे कळले नाहीत. परंतु त्यातील शब्दांचे वजन मात्र जाणवले. आकाशातील चंद्र आणि निळे निळे ढग पाहून माझ्या मनात एकदम ज्या दोन ओळी स्फुरल्या त्या होत्या - 'निळासावळा नाथ । तशीही निळीसावळी रात । कोडे पडले तुला शोधिता कृष्णा अंधारात ॥' पुढे प्रकाशराजाने कृपा केली. प्रयोग व्यवस्थित पार पडला. उजेडात सर्वांनी टाळ्या वाजवून त्या गायिकेचे कौतुक केले. त्या गायिकेचे नाव होते, सुलभा वसंतराव कामेरकर म्हणजे आजच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलभा देशपांडे.
'निळासावळा नाथ'च्या पहिल्या दोन ओळी लिहून झाल्या तरी संपूर्ण सहा कडव्यांची कविता नंतर केव्हा तरी पाच सहा दिवसांनी पूर्ण झाली होती. एकदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर कविवर्य राजा बढे यांनी सुप्रसिद्ध
संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याशी माझी ओळख करून दिली. त्याआधी खळ्यांनी 'दिन प्रथम नवा आज पाडवा' हे माझे गीत आकाशवाणीसाठी ध्वनीमुद्रित केलेले होते. खळ्यांनी या गीताला संगीत दिल्यावर प्रथम माणिक वर्मा यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित झाले होते.
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
बिजलीचा टाळ
सौजन्य- नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.