A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माउलीच्या दुधापरी आले

माउलीच्या दुधापरी आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार.

तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्यांची साथ,
भरारतो रानवारा तसा झाडाझुडपांत !

पिऊनिया रानवारा खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप.

अवखळ बाळांपरी पक्षी खेळती मातींत,
उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत !

धारा वर्षतां वरुन बैल वशिंड हालवी
अवेळींच फुटे पान्हा गाय वत्साला बोलवी !

गांवानेंच उंच केला हाच दैवी प्रसाद,
भिजूनिया चिंब झाला गांवदेवीचा कळस.

निसर्गानें दिलें धन द्यावें दुसर्‍यां, जाणुनी,
झालीं छप्परें उदार आल्या पागोळ्या अंगणी !