आत्मरंगीं रंगलें मन ।
विश्वरंगिं रंगलें ॥
चरणिं नेत्र गुंतले ।
भृंग अंबुजांतले ।
भवतरंग भंगले ।
अंतरंग दंगलें ॥
गीत | - | गोविंदराव टेंबे |
संगीत | - | गोविंदराव टेंबे |
स्वराविष्कार | - | ∙ पं. भीमसेन जोशी ∙ पंडितराव नगरकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | तुलसीदास |
राग | - | पहाडी |
गीत प्रकार | - | राम निरंजन, नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत |
अंबुज | - | कमळ. |
भव | - | संसार. |
कला ही काव्याची पत्नी- अर्थात् काव्याच्या संसाराला शाभा देणारी सहचरी; आणि या दृष्टीनें पाहतां, सर्वस्वी कलाछंदानुवतीं काव्य कितीही हृदयंगम झालें तरी कवीला संतमालिकेंत बसविण्याचें सामर्थ्य त्या काव्यामध्यें नसतें कलेच्या शोभेबरोबर भक्कीचा भक्कम पाया असेल तरच त्या काव्यमंदिराला धर्मक्षेत्रांत कायमचें स्थान मिळते. वरील दोन्ही गुणांच्या मिलाफामुळें तुलसीरामायण हें महाकाव्य, उत्तरेंत धर्मग्रंथाच्या पदवीला पोहोंचलें आहे.
काव्य व कला यांचे अन्योन्य संबंध, तुलसीदास व त्यांची पत्नी या दोन प्रमुख भूमिकांच्या रूपानें दाखविण्याचा प्रस्तुत नाटकांत अल्प प्रयत्न केला आहे. प्रिय पत्नीचा वियोग अल्पकालही सहन न झाल्यामुळे, कलेच्या मंदिरांत कवि तुलसीदास बेभान होऊन भयंकर कालसर्पावरून चढून गेले व तेथें पत्नीच्या कानउघाडणीमुळें त्यांनीं तत्काळ संसाराचा त्याग केला इत्यादि कथा आबालवृद्धांच्या परिचयाची आहे. परंतु पुन्हा पतिपत्नीचा सहवास घडवून, अखेर रामायण महाकाव्याची पूर्तता कलेच्या आत्मयज्ञामुळे झाली असा एक नवीन वळसा वरील कथानकाला देण्याची कल्पना कै. राम गणेश गडकरी यांचे मनांत घोळत होती.
[१] एका चित्रकाराच्यामार्फत तुलसीदास व कलावती यांचा संगम घडवून आणणे;
[२] पत्नीच्या रक्तानें तुलसीदासांनीं रामायण समाप्त करणें;
[३] हास्यरसाकरितां, घटिकापात्र गळ्यांत बांधून फिरणारें एक विरोधी पात्र निर्माण करणें.
वरील तीन सूत्रमय वाक्यांत, कै. गडकरी यांनीं तुलसीदास नाटकाच्या कथानकाची त्रोटक कल्पना, प्रस्तुत लेखकाला दिली होती. तिला अनुसरून पत्नीच्या रक्ताने रामायण लिहिण्याचा अखेरचा बिंदु साधून नाटकाची रचना उलट्या क्रमानें करणें अपरिहार्य होतें. अर्थात्, रचनेसंबंधीं किंवा नाटकांतील इतर अंगासंबंधीं जे कांहीं गुणदोष असतील त्यांची जबाबदारी माझ्यावर आहे.
(संपादित)
गोविंद सदाशिव टेंबे
दि. १मे १९२८
'संगीत तुलसीदास' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- अनंत सखाराम गोखले (प्रकाशक)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.