राजसा, किती दिसांत लाभला निवांत संग !
त्या तिथे फुलाफुलात
पेंगते अजून रात;
हाय तू करू नकोस एवढ्यात स्वप्नभंग !
गारगार या हवेत
घेउनी मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग !
दूरदूर तारकांत
बैसली पहाट न्हात
सावकाश घे टिपून एक एक रूपरंग !
हे तुला कसे कळेल?
कोण एकटे जळेल?
सांग, का कधी खरेच एकटा जळे पतंग?
काय हा तुझाच श्वास?
दर्वळे इथे सुवास !
बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग !
गीत | - | सुरेश भट |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | लता मंगेशकर |
राग | - | भूपेश्वरी |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, भावगीत |
चेतवणे | - | उद्दीपित करणे, पेटवणे. |
असेच एक शब्दांचे जादुगार होऊन गेले, विदर्भाचे कविवर्य सुरेश भट आणि त्यांच्या एका सुंदर गीताचा हा किस्सा. हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेलं आणि लता मंगेशकरांनी गायलेलं ते गीत म्हणजे 'मालवून टाक दीप चेतवून अंगअंग..'
काही कवी असे आहेत, ज्यांना काव्याबरोबर संगीताचीही उत्तम जाण आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतले गीतकार नीरज हे त्यातलं एक नाव आहे. ज्यांनी 'प्रेमपुजारी' चिपटातलं 'शोखियोंमें घोला जाये..' सारखी अप्रतिम गीतं लिहिली. कवी प्रदीप जे उत्तम गायकही होते, 'देख तेरे संसारकी हालत क्या हो गयी भगवान' हे त्यांच्याच आवाजातलं गीत आहे. मराठीतले प्रसिद्ध कवी जगदीश खेबुडकर, जे त्यांच्या गाण्यांचा कार्यक्रम करायचे आणि त्यात गायचेही.
सुरेश भट हे त्यातलेच अजून एक नाव. एकदा संध्याकाळी ते फिरायला गेले असता एक तरुण बासरीवादक एका कट्ट्यावर बसून बासरी वाजवत होता. सूर भटियार रागातले होते. भटसाहेबांनी स्वत:च सांगितलं आहे, की ते सूर ऐकून मला ओळी सुचायला लागल्या- 'मालवून टाक दीप चेतवून अंगअंग.. राजसा, किती दिसांत लाभला निवांत संग..' नुसत्या ओळी सुचल्या नाहीत तर त्याची चालही त्यांना सुचली आणि ती बासरीचे सूर वाजत असलेल्या भटियार रागातली होती. गंमत अशी की ते गीत तिथेच थांबलं. गाण्याचे पाच अंतरे सुचून ते पूर्ण व्हायला भटसाहेबांना पुढचे सहा महिने लागले. कवीला कसली आली आहेत वेळेची बंधनं?
इतरही नामवंत कवींच्य बाबतीतही असं घडलेलं बहुश्रुत आहे. उशिरा पूर्ण झालेल्या ह्या गीताचं भाग्य असं थोर, की त्याला हृदयनाथ मंगेशकरांनी चाल लावली आनि एवढंच नाही, तर लता मंगेशकरांच्या आवाजात ते ध्वनिमुद्रित झालं. गीताचा आशय लक्षात घेऊन हृदयनाथांनी गीताच्या वाद्यवृंदात रुद्र वीणा एवढं एकच सूरवाद्य आणि कमीत कमी तालवाद्यं वापरली. आहेत. चाल मात्र भटसाहेबांच्या भटियार मधली नव्हती.. भटियार हा प्रभातकालीन राग आहे. लता मंगेशकर ते असं गायल्यात , की केवळ त्याच ते गाऊ शकतात. त्यांची गायकी, लयकारी, अभिव्यक्ती सगळंच अद्वितीय. भटसाहेबांच्या शब्दांना पूर्ण न्याय मिळाला आहे.
गीत अफाट लोकप्रिय ठरलं. सुरेश भटांचं आणि मंगेशकर कुटुंबाचं विशेष सायुज्य जुळून आलं आहे. त्यातलं प्रमुख कारण म्हणजे दोन्हीही प्रखर प्रतिभावान. 'मेंदीच्या पानांवर..', 'सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या..', 'उष:काल होता होता..', 'चांदण्यात फिरताना..', ही हृदयनाथांनी स्वरबद्ध केलेली गाणी भटसाहेबांचीच. आशा भोसलेंनी जाहीरपणे म्हंटलं आहे की, "भटसाहेबांनी लिहिलेल्या गाण्यांबद्द्ल मी पझेसिव्ह आहे. ती माझ्याशिवाय कोणीच म्हणू नये असं मला वाटतं.".. इतकी ती गाणी त्यांना प्रिय आहेत.
'मालवून टाक दीप..' सारख्या उत्कट, उन्मादक गीताचे शब्द उन्मुक्त आणि फटकळ स्वभावाच्या भटसाहेबांनी इतके तरल आणि संयत लिहिलेत, की अशा पद्धतीचं काव्य मराठी सुगम संगीतात एकमेवच असावं. गाण्याची शेवटची ओळ 'बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग..' म्हणजे तर मास्टर स्ट्रोक आहे.. आणि म्हणूनच भटसाहेब स्वत:बद्दलच म्हणताहेत, 'रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा.. गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा..'
* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
तुमच्या 'रंग माझा वेगळा' या कवितासंग्रहातला दुसरा भाग आहे तो कवितांचा. मी कविता आवडीने वाचते. गीतांशी तर गाण्यामुळे हरघडी संबंध येतो. गीते वाचताना मला ती त्यातल्या काव्यकल्पनांमुळे जशी आकर्षून घेतात, तसे त्यात दडलेले 'गाणे'ही मला सारखे जाणवत राहते. 'वाजवि मुरली देवकिनंदन', 'मालवून टाक दीप' ही तुमची गीते वाचताना मला त्यातले काव्य तर आवडलेच; पण त्यांची 'गेयता'ही मला हृदयंगम वाटली. काव्य आणि गीत यांना जोडणारा धागा गेयता हाच आहे. गीताची शब्दरचना निर्दोष असली, नादमधूर मृदू व्यंजनांनी युक्त असली, त्यातले खटके योग्य जागी येत असले, यमके व्यवस्थित आली तर असे गीत चाल बसवण्याच्या दृष्टीने संगीतदिग्दर्शकाला प्रेरणा देते. गायकालाही ते गीत गाताना मनाला मोठे समाधान वाटते. 'आज गोकुळात रंग', 'मेंदीच्या पानावर', 'मालवून टाक दीप' ही तुमची गीते ध्वनिमुद्रिकेसाठी गाताना मला हे समाधान आणि आनंद फार मोठ्या प्रमाणात लाभला.
चांगल्या गीताची माझ्या दृष्टीने एक कसोटी आहे. गीत इतके चांगले 'बांधलेले' असावे की ते 'बांधले' आहे हेही कुणाच्या ध्यानात येऊ नये. तुमची गीते रचनेच्या दृष्टीने इतकी देखणी व बांधेसूद आहेत की, ती या कसोटीला निष्चित उतरतात. गीत कोणते आणि काव्य कोणते, गीतकाराला कवी मानावे की नाही, या वादात माझ्यासारखीने पडू नये. पण उत्तम गीत हे मुळात उत्तम काव्यही असावे लागते, याबद्दल सहसा कुणाचा मतभेद होईल असे वाटत नाही. तसे पाहिले तर ज्ञानदेवांसारख्या महाकवीची 'मोगरा फुलला', 'पैल तो गे काऊ', 'घनु वाजे घुणघुणा' किंवा 'रूप पाहता लोचनी' ही गीतेच आहेत ना? पण त्यातले काव्य अस्सल नाही, असे कोण म्हणेल?
'मालवून टाक दीप' हे तुमचे गीत उत्तम काव्य म्हणूनही तितकेच परिणामकारक आहे. 'बोल रे हळू, उठेल चांदण्यावरी तरंग' यासारखी त्या गीतातली नाजूक आणि रम्य कल्पना गीत गाऊन झाल्यावरही दीर्घकाळ माझ्या मनात तरळत राहिली.
(संपादित)
लता मंगेशकर
'रंग माझा वेगळा' या सुरेश भट यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- साहित्य प्रसार केंद्र, नागपूर.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.