A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
माझा हिंदुस्थान्‌

माझा हिंदुस्थान्‌ माझा माझा हिंदुस्थान्‌

हिमाचलाचें हीरकमंडित शिरभूषण भरदार्‌
वक्षावर गंगायमुनांचे रुळती मौक्तिकहार
कटीस तळपे मराठमोळ्या गोदेची तरवार्‌
महोदधीचें चरणाजवळीं गर्जतसें आव्हान्‌
माझा हिंदुस्थान्‌ !

इतिहासाच्या क्षितिजावरती उजळे वेदमशाल्‌
वागीश्वरिचें विहारमंदिर देखा येथ विशाल्‌
काल-सरोवरिं फुललें सुंदर सरोज ताजमहाल्‌
कैलासाच्या भव्य कलेचें आम्हांला वरदान्‌
माझा हिंदुस्थान्‌ !

पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनीं
गळ्यामधें गरिबांच्या गाजे संतांची वाणी
ज्योतीसम समरांत जळाली झांशीची राणी
त्या संतांचें, त्या वीरांचें प्रियतम तीर्थस्थान्‌
माझा हिंदुस्थान्‌ !

रात सरे, ये प्राचीवरती तेजाची रेषा
नव्या मनूचा घोष घुमे हा दुमदुमतात दिशा
जागृत झाल्या दलित जगाच्या बलशाली आशा
स्वातंत्रयाचें, समानतेचें उन्‍नत होय निशाण्‌
माझा हिंदुस्थान्‌ !