मूळ रचना
फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनि नारंगी ॥१॥
वारियानें कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले ॥।२॥
राधा पाहून भुलले हरी । बैल दुभे नंदाघरी ॥३॥
हरी पाहूनि भुलली चित्ता । राधा घुसळी डेरा रिता ॥४॥
मन मिनलेसें मना । एका भुलला जनार्दना ॥५॥
संपूर्ण कविता / मूळ रचना
भावार्थ-
यमुनेवरून येणारे वारे राधेच्या कानातील कुंडले हलवित आहेत. ती इकडेतिकडे पाहात डोळे उडवत मोडत चालते. राधेचे एकूण चालणेही मोहकच आहे. तिला पाहून श्रीहरी भुलले. मधुरा भक्तीचे हे अगदी सुरेख वर्णन आहे. शृंगारातील नर्मविनोद सुद्धा नाथमहाराजांनी येथे साधला आहे. राधेची भूल एवढी पडली की हरी बैलाचे दूध काढावयास गेला. हरी पाहून भुललेली राधिका आपल्या मंदिरी जाऊन रिकामाच डेरा घुसळु लागली. त्या दोघांची मने एकमएकांशी मिसळून गेली होती. प्रेमात मनाचेच तर महत्वाचे काम. जो मन जिंकतो तो प्रिय होतो आणि मन जिंकते ती प्रेमळा. हरी राधेला प्रिय आणि राधिका हरीला प्रेमळा. तिच्या हृदयात त्याचा ठाव व त्याच्या हृदयात हिचा भाव असे प्रेमाचे अगदी अद्वैत झालेले असते. या प्रेमाचा दंश झाला की राधा ही राधा राहात नाही आणि हरी आपले हरीपण विसरून जातो. ती स्वत:ला शोधायला निघते आणि हरीला सापडते आणि हरी तिला भेटायला निघतो तेव्हां स्वत:लाच हरवतोही.. सापडतोही.. आणि भगवान असल्यामुळे पुन्हा दशांगुळे उरतोही. अशा या भगवंताचे प्रेम राधिकेला लाभले हे तिचे भाग्य होय. याचे कारण तिनेही त्याला प्रेम अर्पिले होते. म्हणून हे तिचे प्रेमभाग्य होय असे म्हणावे लागेल.
एकनाथ महाराजांनी जनार्दनांना जसे सर्वस्व मन:पूर्वक अर्पण केलेले होते तसेच या दोघांनी एकमेकांना. जसा एकनाथ सद्गुरूला भुलला तसे हे दोघे एकमेकांस भुलले.
(संपादित)
व्यंकटेश कामतकर
सार्थ भारूडे
सौजन्य- धार्मिक प्रकाशन संस्था, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर भावार्थ
मधुरा भक्तीने जें रूप बंगाल-ओरिसामध्ये अंगिकारिले ते महाराष्ट्रीय संतांना बिलकूल पसंद नव्हते. त्यांनी विठ्ठलाला माउली म्हणून स्वीकारले. फारच कमी पदे अशी आहेत कीं ज्याना आज आपण अश्लील म्हणू. गाथा सप्तशतीतील गाथांशी नाते सांगणार्या या पदात दोन प्रेमिकांचे वर्णन आहे. दोघांचेही चित्त सैरभैर झाले आहे. खास ग्रामिण बाजामध्यें, नायिका ताक घुसळतीय; फक्त डेरा रिकामा आहे एवढेच ध्यानांत नाही ! गोपाळाचीही तीच गत. बिचारा दूध काढावयाला बसलाहे खरा पण गाई ऐवजी बैलापाशी ! प्रेमाची एवढी एकरूपता झाल्यावर असे होणारच. पण प्रेमिकांची अशी अवस्था झाली तरी रसिकाने त्यांतच वाहून जाऊ नये म्हणून एकनाथ लगेच आसूड उगारल्यासारखे सांगतात "एका भुलला जनार्दना". अरे, हे प्रेम माझे माझ्या गुरुवर आहे तसे आहे.
खास ग्रामिण ढंग ही ह्या पदाची खासियत. राधा उघड उघड डोळे "मोडत", नेत्र कटाक्ष टाकत चालली आहे, कानातले डूल वार्याने हलत आहेत असे म्हटले असले तरी आपण कल्पना करूं शकतो हा बहुदा ठुमकत चालण्याचा परिणाम असावा. दोघांनी एकमेकांना गल्लीमध्येच पाहीले असणार पण त्याचा असर काय झाला त्याचे वर्णन मात्र दोघे आपापल्या घरी पोचल्यानंतरचे आहे. दोन ठिकाणी असूनही दोघेही एकजीव झालेले आहेत.
शृंगाररसामध्ये डुंबलेल्या लावणीफडावर आणि भक्तरसांत चिंब झालेल्या भजनी मंडळात एकाच वेळी गायले जाण्याचे भाग्य अशा एखाद्याच रचनेला लाभते.
(संपादित)
शरद
* या लेखकाशी संपर्क साधावयाचा आहे. वाचकांपैकी कुणास माहिती असल्यास aathavanitli.gani@gmail.com या पत्त्यावर ईमेल करावे, ही विनंती.
सौजन्य- उपक्रम (http://mr.upakram.org) (६ मे, २०१०)
(Referenced page was accessed on 31 July 2016)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.