भोगि पुष्पमाला; अभिनव कुसुम मधुपा
सहज सुखविति नूतन शृंगाराला ॥
भ्रमर सुरस वनिं दिसला कमला टाकुनि;
कच अदय भयद झाला; कोमेजलें सुमनदल,
दुखवि मजला ॥
गीत | - | कृ. प्र. खाडिलकर |
संगीत | - | गंधर्व नाटक मंडळी, हिराबाई बडोदेकर |
स्वराविष्कार | - | ∙ बालगंधर्व ∙ मधुवंती दांडेकर ∙ आशा खाडिलकर ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
नाटक | - | विद्याहरण |
राग | - | देस, सोरठ |
ताल | - | एक्का |
चाल | - | पिया कर धर देखो, धरकत है मोरि छतिया |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
कच | - | केस / बृहस्पतीपुत्र. हा पुष्कळ दिवस शुक्राचार्यांजवळ राहून संजीवनी विद्या शिकला. शुक्राचार्यांच्या कन्येचे, देवयानीचे, याच्यावर प्रेम होते. |
गुंजारव | - | भुंग्याचा गुणगुण नाद. |
भयद | - | भिती उत्पन्न करणारा. |
मधुकर | - | भ्रमर, भुंगा. |
मधुप | - | भुंगा, भ्रमर. |
सुमन | - | फूल. |
सुरस | - | मधुर. |
बालगंधर्व तर स्वरांचे सम्राट. सुरांच्या माध्यमातून अभिनय करीत. शब्दांचा उच्चार इतका लाडिक-लडिवाळपणे करीत की, आवाजाच्या मृदु-मुलायम स्पर्शाने पद-रचनेचा ओबड-धोबडपणा नकळत गाळून पडे.
शास्त्री सांगतात, विद्याहरण नाटकातलं 'मधुकर वन वन फिरत करी' हे गाणं, 'पिया कर धर देखो, धरकत है मोरी छतिया ।' या हिंदी पदाच्या चालीवर बसविलेलं होतं. हिंन्दी पदाच्या शब्दांतच नाद-माधुर्य होतं. मराठी गीत त्या मानाने थोडं खडबडीत वाटायचं. बालगंधर्वांनी आपल्या लडिवाळ उच्चारशैलीने आणि स्वरातल्या लवचिकपणाने ह्या गाण्याचा कायापालट केला. हिंदी पदाइतकेच, शब्द, माधुर्याने भिजून बाहेर पडत.
त्या काळात सगळीच नाटकं रात्री रंगवीत असत. पण अशी ही रात्र, दीनानाथांच्या आणि बालगंधर्वांच्या, संगीत आणि जुगलबंदीने नटलेली रात्र, एकदा तरी रंगायला हवी होतं.
दीनानाथांच्या मृत्यूनंतर नाट्यसृष्टीविषयी शास्त्रींना वाटणारी जवळीक संपली. शिवाय, एका दृष्टीने, नाट्यसृष्टीत मन्वंतर सुरु होतं. त्यातहि आनंद होता. पण तो तिर्हाईताचा आनंद होता. जुन्या युगाची परिसमाप्ती झाली, ह्यात खेद किंवा खंत नव्हती, पण जवळीक नाहीशी झाली होती एवढं खरं.
(संपादित)
शंकर बाळाजी शास्त्री यांच्या पत्नी प्रा. तारा शास्त्री यांनी लिहिलेल्या 'स्मृतिरंजन' लेखातून.
तरुण भारत, नागपूर; दीपावली विशेषांक १९७२.
सौजन्य- दै. तरुण भारत, सिद्धार्थ शंकर शास्त्री.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.