A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मधु मागशि माझ्या सख्या

मधु मागशि माझ्या सख्या, परि
मधुघटचि रिकामे पडति घरीं !

आजवरी कमळाच्या द्रोणीं
मधू पाजिला तुला भरोनी,
सेवा ही पूर्विची स्मरोनी
करिं न रोष सख्या, दया करीं.

नैवेद्याची एकच वाटी
अता दुधाची माझ्या गाठीं;
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगीं अंगणीं कशी तरी.

तरुण-तरुणिंची सलज्ज कुजबुज,
वृक्षझर्‍यांचे गूढ मधुर गुज,
संसाराचें मर्म हवें तुज,
मधु पिळण्या परि बळ न करीं !

ढळला रे ढळला दिन सखया !
संध्याछाया भिवविति हृदया,
आता मधुचें नांव कासया?
लागले नेत्र हे पैलतिरीं.
गीत - भा. रा. तांबे
संगीत - वसंत प्रभु
स्वराविष्कार- लता मंगेशकर
पं. कुमार गंधर्व
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - भीमपलास
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- १९३३, ग्वाल्हेर.
• स्वर- लता मंगेशकर, संगीत- वसंत प्रभू, राग- भीमपलास
• स्वर- पं. कुमार गंधर्व, संगीत- पं. कुमार गंधर्व, राग- बागेश्री
'तांबे गीत रजनी' या पं. कुमार गंधर्व यांच्या कार्यक्रमातून.

कासया - कशासाठी.
कोरांटी - एक प्रकारचे काटेरी फुलझाड.
नोंद
आपल्या प्रतिभेचा दीप आता म्लान होतो आहे, असे कवीस वाटता वाटता कितीतरी प्रकाश त्याने पाजळला आहे.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  लता मंगेशकर
  पं. कुमार गंधर्व